सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई
विविधा
☆ मुलांना कसे वाढवावे? भाग-1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆
(कौशिक प्रकाशन, सातारा, यांच्यातर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी झालेल्या निबंध स्पर्धेतील प्रथम पुरस्कार मिळालेला लेख.)
ईशावास्य उपनिषदामधे एक श्लोक आहे.—
कुर्वन्नेवेह कर्माणि जिजिविषेत् शतं समाः|
एवं त्वयि नान्यंथेतोsस्ति न कर्मं लिप्यते नरे ||
वाट्याला आलेली कर्मे करीतच शंभर वर्षे( पूर्ण आयुष्य) जगण्याची इच्छा धरावी. तसेच ‘उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात ‘ या महामृत्युंजय मंत्रात,आत्महत्या न करता, भोग भोगून अमृताच्या मार्गाने जावे असे म्हटले आहे. अध्यात्मातील असा विचार सांगण्याचं प्रयोजन काय ? तर सद्यस्थितीत ते सांगण्याची नितांत गरज भासायला लागली आहे. मुलांना कसे वाढवावे, याचा विचार करताना सध्या दिसणारे समाजाचे चित्र कसे आहे? ते तसे का आहे? आणि त्यावर कौटुंबिक, सामाजिक,आर्थिक, नैतिक उपाय काय? याचा विचार करावा लागेल.
अगदी माहितीतली उदाहरणे–हुशार सुजय चुकीच्या रिझल्टमुळे नापास झाल्याचं कळलं आणि त्याच रात्री त्याने झोपेच्या गोळ्या खाल्ल्या. सुदेश उत्तम मार्काने फार्मसी पास झाला, पण बरोबरीच्या मित्राला मार्क कमी पडूनही आरक्षणातून नोकरी मिळाली. आणि बेकार अवस्था असह्य होऊन सुदेशने घरातल्याच पंख्याला लटकवून घेतलं . सुधीर इंजिनीअरिंगला नापास झाला, आणि त्याने गच्चीतून उडी मारली. सावित्री परधर्मीय मुलाच्या प्रेमात पडली. पण नंतर त्याचा कावा लक्षात आल्यावर तिने रेल्वेखाली उडी घेतली. शाळेतील मुलं गट करुन शिक्षकांना धमकावतात. क्लबमध्ये जातात. अफू, चरस, गांजा, मेफ्रेडोन, यासारख्या अमली पदार्थांच्या आहारी जातात. जगाच्या कुठल्याही भागातून त्या वस्तू घरपोच मिळू शकतात. खेदजनक गोष्ट अशी की ,महाराष्ट्र याबाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. सहलीच्या नावाखाली समुद्र, पूर, धबधबा अशा ठिकाणी, दारू पिऊन, सेल्फीच्या नादात कित्येक जीवांचा बळी गेलाय. रेव्ह पार्ट्या, बर्थडे पार्ट्या, यासाठी लागणारा पैसा आणि त्या पैशासाठी वेगवेगळे विकृत मार्ग, अशी श्रुंखला सुरू होते. ब्लू व्हेल या गेमने तर पालकांची झोप उडवली होती. उच्चशिक्षित, उच्चपदस्थ, सुसंस्कृत घरातला म्हैसकर, चौदा वर्षांचा मनप्रीतसिंग , तामिळनाडूतला बारा वर्षांचा मुलगा, अशी बोलकी उदाहरणं
पालकांच्या चिंतेचा आणि चिंतनाचा विषय झाली आहेत. काळजीन पोखरुन काढलंय त्यांना ! डिजिटल क्रांतीनंतर आँनलाईन गेमच्या नादात जगात असंख्य बळी गेले आहेत. सुरुवातीला मोबाइल गेम, नंतर लॅपटॉप व आँनलाईन गेम यांचे व्यसन, आणि नंतर त्यातून सुटका नाही, असे दुष्टचक्र सुरू होते. ब्ल्यू व्हेल गेममधे तर हॉरर गोष्टींपासून सुरुवात होते. हातावर तीक्ष्ण हत्याराने माशाचा आकार, उंच इमारतीच्या कठड्यावर चढणे, आणि शेवटी पन्नासाव्या टास्कला विजय घोषित करून आत्महत्या—–या गेमचा निर्माता फिलिप बुडेकिन आता तुरुंगात आहे. पण समाज स्वच्छ करण्यासाठी ( जैविक कचरा ) हा गेम सुरू केल्याचे तो सांगतो. या खेळाने भारतातही हात पाय पसरले होते. पौगंडावस्थेतील अनेक मुलांना अस्वस्थता आणि नैराश्याचा आजार जडल्यासारखे झाले आहे.
मुलं अशी भन्नाट का वागतायत, याच्या कारणांच्या मुळाशी जाऊन विचार करायला हवाय. विभक्त कुटुंब पद्धती सुरु झाली आणि मुलांचा आधार हरवला गेला. आई आणि वडील दोघेही नोकरीला जातात.रात्री कंटाळून परत आल्यानंतर मुलांशी संवाद साधायला, त्यांच्यासाठी वेळ द्यायला ते कमी पडतात. कोणाचंच नियंत्रण नाही, इंटरनेट वर किती वेळ आणि काय पहातात हे कोण विचारणार ? लहान असताना पाळणाघर, नंतर शाळा, अशावेळी प्रेमाचा ओलावा शोधत शोधत गेमच्या आभासी दुनियेत रमायला लागतात. घरातील वातावरण जर तणावपूर्ण असेल, आई वडील जर सतत भांडत असतील तर मुले एकतर आक्रमक तरी होतात, नाहीतर बुजरी अबोल एकलकोंडी होतात. पौगंडावस्थेतील मन अत्यंत संवेदनशील असल्यामुळे चांगले किंवा वाईट लक्षात न घेता कोणत्यातरी आकर्षणाच्या मागे धावायला लागते, असं मानसोपचार तज्ञांचं मत आहे.
क्रमशः….
© सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई
बुधगावकर मळा रस्ता, मिरज.
मो. ९४०३५७०९८७
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈