सुश्री मंजुषा सुनीत मुळे
२० नोव्हेंबर – संपादकीय
आज २० नोव्हेंबर —-
साहित्यिक वर्तुळात “ एक असाधारण गद्य शिल्प “ अशी ज्यांची अगदी अनोखी ओळख होती, अशा श्री. वसंत पोतदार यांचा आज जन्मदिन. ( १९३७ — २००३ )
मराठी लेखक, कथाकथनकार, स्वातंत्र्य चळवळीचे इतिहासकार म्हणून प्रसिद्ध असलेले श्री. पोतदार, संगीत दिग्दर्शक सी. रामचंद्र यांच्याबरोबर त्यांचे स्वतःचे सहाय्यक म्हणून मुंबईत आले. श्री. पु.ल.देशपांडे यांच्याशी त्यांची गाठ पडली, आणि त्यांना जणू एक नवी वेगळी दिशा सापडली. पु.ल. यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी “ वंदे मातरम “ या क्रांतीगाथेवर आधारित एकपात्री प्रयोग भारतभर सादर केले. त्यानंतर, “सेर सिवराज“ (शिवाजी), “एका पुरुषोत्तमाची गाथा“ ( पु.ल. ), “योद्धा संन्यासी“ (विवेकानंद), महात्मा फुले, अशा थोर व्यक्तींच्या चरित्रांवर आधारित असणारे एकूण १० एकपात्री नाट्यप्रयोग ते सादर करत असत. विशेष म्हणजे, मराठीबरोबरच हिंदी आणि बंगाली या भाषांमध्येही हे प्रयोग ते सादर करत असत, आणि त्यासाठी तब्बल ४० वर्षे ते देशात आणि परदेशातही फिरत होते. “ आक्रंदन एका आत्म्याचे “ हे त्यांचे एकपात्री नाट्यही खूप गाजले होते.
मराठी-हिंदी-बंगाली या तिन्ही भाषेतल्या वर्तमानपत्रांमधूनही पोतदार यांनी भरपूर स्फुटलेखन केलेले होते. अग्निपुत्र, नाळ, अजब आजाद मर्द मिर्झा गालिब, अनिल विश्वास ते राहुलदेव बर्मन, तोचि साधू ओळखावा ( गाडगे महाराजांचे चरित्र ), योद्धा संन्यासी ( विवेकानंद ), एका पुरुषोत्तमाची गाथा हे पु.ल.देशपांडे यांचं चरित्र, नाझी भस्मासुर, पुन्हा फिरस्ता, रामबाग टोळी
(कथासंग्रह), वेध मराठी नाट्यसंगीताचा, कुमार- हे कुमार गंधर्वांविषयीचे पुस्तक —- अशी अगदी वेगवेगळ्या विषयांवरची त्यांची सगळीच पुस्तके वाचकांमध्ये प्रसिद्ध ठरली होती.
‘अग्निपुत्र‘ या पुस्तकाचे विशेष हे की, चंद्रशेखर आझाद, जतींद्रनाथ दास, बटुकेश्वर दत्त, राजगुरू-सुखदेव- भगतसिंग, हे सर्वज्ञात वीर आणि माहोर, मलकापूरकर, वैशंपायन, यासारखे अज्ञात वीर, यांच्याबद्दलची नेमकी आणि तपशीलवार माहिती श्री. पोतदार यांनी त्यात नोंदवलेली आहे. यापैकी ‘ नाळ ‘ या पुस्तकाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार, ‘ कुमार ‘ला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार, आणि ‘ योद्धा संन्यासी ‘ ला मुंबई ग्रंथ संग्रहालयाचा पुरस्कार मिळाला होता.
असे विविधांगी लेखन करणारे श्री वसंत पोतदार यांना मनःपूर्वक नमस्कार
☆☆☆☆☆
सुप्रसिद्ध न्यायमूर्ती श्री. चंद्रशेखर धर्माधिकारी यांचाही आज जन्मदिन. ( २०/११/१९२७- ३/१/२०१९ )
मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश म्हणून प्रसिद्ध असलेले श्री. धर्माधिकारी, स्वातंत्र्यसैनिक आणि लेखक म्हणूनही सुपरिचित होते. स्वतः म. गांधी आणि त्यांच्या विचारांवर श्रद्धा बाळगत असतांनाच , त्या विचारांवर जिज्ञासूवृत्तीने, निरपेक्षपणे आणि तटस्थतेने, आजच्या संदर्भात विचार करायलाच हवा,असे ते आग्रहाने सांगत असत. अंतर्यात्रा, काळाची पाऊले, भारतीय संविधानाचे अधिष्ठान, मंझिल दूरच राहिली, माणूसनामा, मानवनिष्ठ अध्यात्म, समाजमन, सूर्योदयाची वाट पाहूया, अशी त्यांची मराठी पुस्तके, आणि, न्यायमूर्तीका हलफनामा, लोकतंत्र एवं राहोंके अन्वेषण, ही त्यांची हिंदी पुस्तके प्रकाशित झालेली आहेत.
२००४ साली “ पद्मभूषण “ पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या न्यायमूर्ती धर्माधिकारी यांना विनम्र अभिवादन.
☆☆☆☆☆
बोधनकार‘ या उपाधीनेच ख्यातनाम असलेले श्री. केशव सीताराम ठाकरे यांचा आज स्मृतिदिन. ( १७/९/१८८५–२०/११/१९७३ )
मराठी पत्रकार, वक्ते, समाजसुधारक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे पुढारी, अशा अनेक भूमिका पार पाडत असतांना, सामाजिक सुधारणा हेच त्यांनी आपल्या जीवनाचे ध्येय सतत नजरेसमोर ठेवलेले होते. आणि या ध्येयप्राप्तीसाठी त्यांनी कधीही आणि कोणतीही तडजोड केली नाही. त्यांचे आदर्श असणारे महात्मा फुले यांच्या समाजसुधारणेच्या संकल्पनांनी प्रेरित होऊन, फुले यांचा लढा पुढे चालवण्याचा त्यांनी निर्धार केला होता. त्या काळात प्रचलित असलेल्या अन्याय्य रूढी-परंपरा,जातीव्यवस्था, अस्पृश्यता, या समाजविघातक गोष्टी आणि त्यांचे समर्थन करणारे पुराणमतवादी, यांच्याशी अतिशय त्वेषाने लढतांना त्यांनी लेखन, वक्तृत्व, आणि प्रत्यक्ष कृती अशी तीनही शस्त्रे प्रभावीपणे वापरली. कर्मकांडे आणि धंदेवाईक भटभिक्षुकी व्यवस्था यावर एकीकडे टीका करत असतांनाच, संत एकनाथ महाराजांच्या जीवनावर “ खरा ब्राह्मण “ हे नाटक त्यांनी लिहिले, आणि खऱ्या ब्राह्मणाची भूमिका काय असावी हे स्पष्टपणे मांडले. स्वतः सुधारणावादी असणारे राजर्षी शाहू महाराज, ठाकरे यांना खूप मानत असत.
प्रबोधनकार हे एक उत्तम लेखक आणि इतिहास-संशोधकही होते. सारथी, लोकहितवादी, आणि प्रबोधन, या नियतकालिकांच्या माध्यमातून त्यांनी कायम आधुनिक विचारांचा अतिशय द्रष्टेपणाने प्रसार केला. आणि त्याच विचारांच्या अनुषंगाने अनेक पुस्तके लिहिली. ऊठ मऱ्हाठ्या ऊठ हा लेखसंग्रह, कुमारिकांचे शाप, देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे, देवांची परिषद,शेतकऱ्यांचे स्वराज्य, अशासारखी त्यांची वैचारिक पुस्तके, कोदंडाचा टणत्कार, ब्राह्मण्याचा साद्यन्त इतिहास, भिक्षुकशाहीचे बंड, प्रतापसिंह छत्रपती आणि रंगो बापूजी, अशी ऐतिहासिक संशोधनावर आधारित पुस्तके, संत गाडगेबाबा, तसेच पं. रमाबाई सरस्वती यांचे चरित्र, माझी जीवनगाथा हे आत्मचरित्र, संगीत विधिनिषेध, सीताशुद्धी, टाकलेले पोर, अशी नाटके, आणि हिंदू जनांचा ऱ्हास आणि अधःपात हे अनुवादित पुस्तक, असे त्यांचे विविध प्रकारचे विपुल साहित्य प्रसिद्ध झालेले आहे.
“ प्रबोधनकार ठाकरे समग्र वाङ्मय “ असा ५ खंडांमधला ग्रंथ महाराष्ट्र सरकारने प्रकाशित केलेला आहे, हे विशेषत्वाने सांगायला हवे.
‘ प्रबोधनकार ठाकरे विचार साहित्य संमेलन ‘ २०१३ आणि २०१४ साली पुण्यात भरवले गेले होते. मारवाडी फाऊंडेशनतर्फे त्यांच्या नावाने ‘ समाज प्रबोधन पुरस्कार ‘ दिला जातो, ही आवर्जून सांगायला हवी अशी आणखी एक गोष्ट.
“ प्रबोधन“ या संज्ञेला आपल्या कार्यकर्तृत्वाने जणू मूर्तरूप देणारे श्री. के.सी.ठाकरे यांना भावपूर्ण आदरांजली
☆☆☆☆☆
सुश्री मंजुषा सुनीत मुळे
ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
माहितीस्रोत :– इंटरनेट
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈