श्रीमती उज्ज्वला केळकर
☆ बा.द.सातोस्कर….भाग 1 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
संपादकीयसाठी दिनविशेष बघताना दिसलं, २७ तारखेला बा. द. सातोस्कर यांचा स्मृतिदिन आहे. हे पाहिलं आणि आठवणींची पाखरं भिरीभिरी येऊन मनाच्या झाडावर उतरली आणि किलबिलत राहिली.
त्यांची माझी पहिली भेट झाली, गोव्यातील डिचोली येथे झालेल्या साहित्य संमेलनात. त्यापूर्वी माझी मामेबहीण लता हिच्याकडून त्यांच्याबद्दल खूप काही ऐकलं होतं. तेवढ्यानेही माझी छाती दडपून गेली होती. डिचोलीला लताच्या बालकविता- संग्रहाचे प्रकाशन होते. अध्यक्ष होते, पं महादेवशस्त्री जोशी. ते माझ्या मामांचे मित्रच. तिथे कार्यक्रमाच्या आधी लताने माझी बा. द. सातोस्कर यांच्याशी ओळख करून दिली आणि म्हणाली, ‘ ही माझी आत्येबहीण. हीसुद्धा कथा-कविता लिहिते.’ संमेलनाच्या दरम्यान मधल्या वेळेत त्यांच्याशी खूप गप्पा झाल्या. त्यांनी मोठ्या आत्मीयतेने माझी चौकशी केली. मी काय काय लिहिलं, कुठे कुठे छापून आलं, वगैरे विचारलं. मोठ्या (कर्तृत्वाने) लोकांशी बोलताना मी फारशी मोकळी होत नाही. त्यांच्याशी बोलताना मला दडपणच येतं. धाकुटेपणाची ( कर्तृत्वाच्या दृष्टीने) भावना मनाला वेढून रहाते. पण सातोस्करांचं मोठेपण असं की, ते मधलं औपचारिकतेचं अंतर तोडून दादा स्वत:च धाकुटेपणाजवळ आले. दादा म्हणजे सातोस्कर. जवळचे, परिचित त्यांना दादा म्हणत. मीही मग त्यांना दादा म्हणू लागले. त्यानंतर दादांनी मला मुलगीच मानलं आणि तसं घोषितही केलं. त्यानंतर सांगलीला आल्यावर त्यांचा आणि माझा पत्रव्यवहार वाढला. मी नवीन काही लिहिलं की त्यांना वाचायला पाठवावं असा त्यांचा आग्रह असे. हा पत्रव्यवहार प्रामुख्याने माझ्या बाजूने पाठवलेल्या कविता, मांडलेल्या कथा- कल्पना किंवा मग सगळीच कथा, लिहिलेले लेख या संदर्भात असे. तर त्यांच्या बाजूने त्यांच्या नवीन लेखनाच्या योजना किंवा साहित्य क्षेत्रातील विविध घटनांची माहिती, या संदर्भात असे.
पुढच्या वर्षी मंगेशीला साहित्य संमेलन झालं. अध्यक्ष होते, बा. द. सातोस्कर. एका परिसंवादात बोलण्यासाठी मला त्यांनी निमंत्रित केलं. संमेलनाला सुरुवात होण्यापूर्वी एका खोलीत दादा, गंगाधर गाडगीळ, जितेंद्र अभिषेकी , कृ. ब. निकुंब इ. थोर थोर मंडळी बसली होती. मला बघताच दादांनी मला आत बोलावलं. बस म्हणाले. मग त्यांनी ‘ ही माझी मुलगी, उज्ज्वला केळकर. ही सुद्धा लिहिते, बरं का! आणि चांगलं लिहिते.’ अशी माझी ओळख करून दिली. मला अतिशय संकोच वाटला. अनेक वर्षे शारदेची उपासना करणार्या व्यक्तीने, तितक्याच तोलामोलाच्या व्यक्तींपुढे माझं कौतुक करावं, याची एकीकडे अपूर्वाई वाटत असताना, दुसरीकडे संकोचही वाटत होता. त्याचवेळी त्यांच्या एका मित्राने चेष्टेने विचारलं , ‘ आम्हाला माहीत नसलेली ही मुलगी तुला केंव्हा झाली? ’ दादा सहजपणे म्हणाले. ‘ डिचोलीच्या साहित्य संमेलनात. तिथेच तिची आणि माझी ओळख झाली.’
बा. द. सातोस्कर यांच्याशी नाते जुळले आणि गोवा हे माझे माहेर झाले. शाळा- कॉलेजात आणि नंतरही बा.भ. बोरकरांच्या कविता वाचताना, त्यातील निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेताना गोवा माझी स्वप्नभूमी झाली होती. आता ते माझं माहेर झालं. त्यावेळी दादांनी मला घरी येण्याचा खूप आग्रह केला होता. पण मला वेळ नव्हता. दुसर्या दिवशीचं परतीचं माझं रिझर्वेशन झालं होतं.
त्यानंतर मी ४-५ वेळा गोव्याला गेले, तेव्हा तेव्हा त्यांच्याकडे, मी आणि माझी बहीण लता गेलो. पणजीपासून १५-१६ कि.मीटर अंतरावर असलेल्या करंजाळे इथे ‘स्वप्नगंध’ हे काव्यात्मक नाव असलेली त्यांची टुमदार बंगली होती. घराच्या मागच्या बाजूला मांडवी नदीचे बॅक वॉटर. भोवताली स्निग्ध शांतता. अतिशय रम्य जागी त्यांची छोटी बंगली होती आणि बंगलीत होते स्वागतशील आई आणि दादा. त्यांच्या घरी जेव्हा जेव्हा मी जाई, तेव्हा तेव्हा मला आमच्या कॉलेजमधील विजय सुराणाने लिहिलेल्या ओळी आठवत-
‘असं माहेर ग माझं गाढ सुखाची सावली ।
क्षणभरी पहुडाया अनंताने हांतरली।।
क्रमश:….
©️ श्रीमती उज्ज्वला केळकर
संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈