श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

??

☆ संघर्ष – भाग-1 ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

वडिलांसोबत सायंकाळी आम्ही  जेव्हा बाजारात जात असू तेव्हा नानाजी टेलर यांचे दुकान हा थांबा निश्चित ठरलेला असायचा.

नानाजी टेलर अतिशय  जिव्हाळ्याने व आदराने आमच्या वडिलांचे स्वागत करायचा, विचाराने दोघेही आदर्शवादी असल्याने दोघांचेही खूप जमायचे. बाबा शिक्षक असल्यामुळे वर्तमानपत्र वाचन हा त्यांचा दिनक्रम असायचा. वाचलेल्या बातम्या ते नानाजींना सांगायचे नी मग त्यावर चर्चा रंगायची. आम्हाला या चर्चेतील काही समजायचं नाही, पण नानाजीच्या दुकानात जाणे आम्हाला आवडायचे. नानाजी टेलरचे दुकान म्हणजे काही ऐसपैस नी सुशोभित शो रूम नव्हती. दहा बाय बाराची एक खोली.  तिला उत्तर दक्षिण असे दोन्हीकडे रस्ते. त्यामुळे दोन्हीकडे दरवाजे. त्यात दोन शिलाई मशीन, एक कापड कटाईचा लाकडी पाट, कपडे ठेवण्याची एक लाकडी अलमारी आणि बसण्यासाठी ऐक बेंच, असा या दुकानाचा पसारा होता. पण त्यात नानाजी खूश असायचे. आम्हालाही या दुकानात बदल व्हावा असे वाटत नसे. तसे या दुकानात बसणे आम्हाला आवडण्याची इतरही अनेक कारणे होती.  त्यातील प्रमुख कारण म्हणजे नानाजींच्या दुकानाला लागून प्रसिद्ध कोहपरे यांचे हॉटेल होते. त्यांचा भटारखाना दुकानातून दिसायचा. त्यांचे कारागीर पदार्थ बनवायचे ते पाहणे आनंददायी वाटायचे. पदार्थांचा सुवास दुकानापर्यंत जाणवायचा.

वडिलांच्या कडक शिस्तीमुळे हॉटेलात जाणे आमच्यासाठी निषिद्ध गोष्ट होती. त्यामुळेही कदाचित बनणारे पदार्थ आनंद देऊन जायचे. एक किरकोळ शरीरयष्टीचा नोकर सतत खलबत्यात काहीतरी कुटत असायचा. बहुदा हॉटेलला लागणारे मसाले, अद्रक लसूण जिरे तो कुटत असावा. पण याव्यतिरिक्त काही इतर कामे करतांना मी त्याला पाहिले नाही. नानाजींच्या दुकानासमोर खाजांची सावकाराची पेढी होती. अनेक गरजू कर्जदार लोक तिथे बसून असायचे. त्यांचे चिंताग्रस्त चेहरे आम्हाला तेव्हाही जाणवायचे. त्यांची अगतिकता ,लुबाडणूक होते याची जाणीव आम्हाला त्यांच्या चेहऱ्यावर दिसायची. त्यामुळे कदाचित मला सावकार सिनेमातील कन्हय्यालाल किंवा जीवन या अभिनेत्यासारखा वाटायचा. समोर एक सोनाराचे दुकान होते. त्याच्या दुकानासमोर असलेल्या नालीतील माती साफ करून त्यातून सोने मिळविण्याचा प्रयास करणाऱ्या विशिष्ट जमातीच्या महिला नेहमी दिसायच्या.  त्यांच्या कडेवर  लहान मुले असायची. दिवसभर आपल्या कोहपऱ्यासारख्या पात्रातून पाण्याच्या सहाय्याने त्या माती गाळून सोने काढायच्या. त्यांच्या कार्याचे निरीक्षण करणे हे आमचे आनंददायी कार्य होते.

नानाजीं च्या दुकानात आलमारीलगत एक मोठी पिशवी ठेवलेली असायची. त्यात कापडाच्या चिंध्या असायच्या.  त्यांचा उपयोग  कापडी बाहुल्या बनविण्यासाठी व्हायचा.  माझी बहीण सोबत असली की तिची नजर त्या पिशवीवर असायची.  ,नानाजींचा मूड चांगला असला की तिला परवानगी मिळायची, नि रंगबिरंगी कापडी चिंध्यांवर ती खजिना मिळाल्यागत तुटून पडायची. नानाजींना कविता ऐकण्याची आवड होती आणि बाबांना कविता करण्याची. दोघेही एकत्र आले की रंग जमायचा. बाबांचे कविता ऐकवणे आणि नानाजींचे त्यांना दाद देणे, यात किती वेळ जातो याचे दोघांनाही भान नसायचे. आम्ही मात्र कंटाळून जात असू, अनेकदा बाजार बंद व्हायचा तरी दोघांचे चर्चासत्र थांबत नसे. नानाजींच्या दुकानात त्यांच्यासोबत त्यांचा शंकर हा मुलगाही काम करायचा. शंकर विवाहित व दोन मुलांचा पिता होता. नानाजी आणि शंकर यांचे कधी फारसे पटत नसे. तो व्यवहारवादी होता. त्याचा कल अधिक पैसे मिळविण्याकडे असायचा. विनाकारण दुकानात येऊन बसणारे व नानाजींशी चर्चा करणारे त्याच्या नजरेत बिनकामाचे असायचे. तो तसे बोलत नसे, पण त्याच्या देहबोलीतून ते जाणवायचे. मात्र त्याने आमच्या वडिलांचा कधी अपमान केला नाही. नानाजींशी त्याचे न पटण्याचे कारणही तसेच होते. 

क्रमशः….

©  श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

चंद्रपूर,  मो. 9822363911

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments