सौ. गौरी सुभाष गाडेकर
जीवनरंग
☆ एकुलती -भाग पहिला ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆
केतकीचं काय बिनसलं होतं, कोणास ठाऊक. सारखी भांडत असायची, भांडतच असायची कार्तिकबरोबर. पार डिव्होर्सपर्यंत पोहोचली होती मजल.
आताही रात्री घरी पोहोचायला उशीर झाला, तेव्हा कार्तिक खूप दमला होता. जेवण्याचंही त्राण नव्हतं त्याच्यात. पण मग “तू बाहेरून खाऊन आला आहेस.घरात बनवलेलं वाया जातं…..”वगैरे म्हणत केतकी भांडायला सुरुवात करणार, म्हणून तो जेवायला बसला.
“तू जेवलीस?” तोंडातून शब्द निघाल्यावर त्याच्या लक्षात आलं की आपण घोडचूक केलीय.
“मी तुझ्यासाठी थांबायचं सोडून दिलंय हल्ली. तू काय? मनात आलं, तर बाहेरूनच खाऊन येणार. बायको थांबली असेल जेवायची……”
केतकीची बडबड चालूच होती.
शेवटी असह्य झालं, तेव्हा कार्तिकचंही तोंड उघडलं, ” पुरे आता. गप्प बस. दमून घरी यावं, तर…… “
“मग यायचं ना वेळेवर. उशिरापर्यंत बाहेर वेळ काढत बसलं की…..”
” बाहेर वेळ कसला काढणार? ऑफिसमध्ये चिक्कार काम असतं. त्यामुळे थांबण्याशिवाय गत्यंतरच नसतं. “
“मी घरबशी गृहिणी असल्यासारखं बोलू नकोस हं. सांगून ठेवते. मीही नोकरी करते…..”
“माहीत आहे तुझी नोकरी.”
“नीट बोल हं माझ्याशी. असलं ऐकायची सवय नाहीय मला.”
” हो, हो. कशी असणार? लाडावलेली मुलगी तू. एकुलती एक म्हणून डोक्यावर बसवून ठेवलंय आईवडिलांनी. “
“मला अगदी कंटाळा आलाय, तुझी कुजकट बोलणी ऐकायचा. केव्हा एकदा त्या डिव्होर्सच्या फॉर्मॅलिटीज कम्प्लिट होतायत, असं झालंय.”
“पण तू तुझ्या आईबाबांना सांगितलंस का हे?”
“तू मला विचारत असतोस सारखा, ते तू तुझ्या घरच्यांना सांगितलंस का?”
“माझ्या घरच्यांना काय, नंतर सांगितलं तरी चालेल. इन फॅक्ट, एवढ्यात मी सांगणारच नाहीय त्यांना. तुझी गोष्ट वेगळी आहे. तुला माहेरी जाऊन राहायचं आहे. आणि तिथे राहायला जाण्यापूर्वी सगळ्या गोष्टी तुझ्या आईबाबांच्या कानावर घालणं आवश्यक आहे. पण तू तर टाळाटाळ करतेयस.”
“टाळाटाळ कशाला करणार?”
“मग का नाही सांगितलंस अजून? वरचेवर तर जात असतेस तिकडे.”
“या गोष्टी रागरंग बघून सांगायच्या असतात. कधी कोणी आलेलं असतं तिकडे, कधी बाबांची तब्येत बरी नसते, तर कधी आई नरमगरम असते.”
” हे तर चालूच राहणार ना. मला तर वाटतं, तुला रिकन्सिडर करायचं आहे. दॅट्स व्हाय यू आर बायिंग टाइम. “
“रिकन्सिडर माय फूट! उलट जेवढ्या लवकर तुझ्या कचाट्यातून सुटता येईल, तेवढं बरं. एक एक दिवस मोजतेय मी.”
“तेव्हा लग्नाच्या वेळीही मोजत होतीस एक एक दिवस.”
“माझ्यापेक्षा तुलाच जास्त घाई झाली होती तेव्हा.”
“मी मूर्ख होतो त्यावेळी.”
“होतो कशाला? अजूनही आहेस. अशा मूर्ख माणसाबरोबर आयुष्य नाही काढायचं मला. मध्ये ऍबॉर्शन झालं, तेव्हा खचून गेले होते मी. पण आता वाटतं, देव करतो, ते बऱ्यासाठी. उगीच त्या जिवाचीही परवड झाली असती.”
“…………..”
“उचकट ना आता तोंड. आता का गप्प बसलास?”
“मी क्रूर नाहीय तुझ्यासारखा, असल्या गोष्टीचा आनंद व्हायला.”
रोजच्यासारखं हे भांडण रात्री 2-2.30पर्यंत चाललं असतं. आणि मग कंटाळून कार्तिक गेस्टरूममध्ये झोपायला गेला असता. रोजच्यासारखाच.
पण आज अचानक केतकीच्या फोनची रिंग वाजली.
क्रमश:….
© सौ. गौरी सुभाष गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈