श्री सुहास रघुनाथ पंडित
इंद्रधनुष्य
☆ मावशी नावाचे सुख ☆ संग्राहक – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
मावशी बरोबरचं नातं खरंच खूप छान असतं . हे नातं भावनिक पातळीवर खूप आनंद देणारं असतं.
मावशी भरभरून प्रेम देते…
आपल्या जन्माआधीच, म्हणजे अगदी आपण आईच्या पोटात असतानाच मावशीची आणि आपली एक वेगळीच अदृश्य नाळ जोडलेली असते…
आपल्या जन्माने तिला झालेला आनंद अवर्णनीय असतो.
खरंच मावशी नेमकी कोण असते हो ???
आई नसताना तुमच्यासाठी तुमची हक्काची माया देणारी ,
मावशी.. ही तुमची प्रेमळ हाक ऐकताच तुम्हाला भरभरून प्रेम देणारी…
आपल्या आवडीचं , लपवून ठेवलेलं खाऊ घालणारी…
आपल्या लहानपणाची साक्षीदार , आपल्या लहानपणीच्या आठवणी तिच्याशिवाय पूर्ण होत नाहीत…
तिचं वाढणारं वय आणि त्यामुळे वाढणार्या जबाबदार्या आपल्याला तिच्यापासून दूर करतात , पण ते तुम्हाला आवडलेलं नसतं , तुमच्याही नकळत…
‘तू अगदी तुझ्या मावशी वर गेलायेस’… असं कोणी म्हटलं तर एक वेगळंच स्मित हसू आपल्या चेहर्यावर उमटतं…
अगदी आजही मावशीसाठी आपण कोण असतो ???
आपल्या जन्मापूर्वीपर्यंत तिला कदाचित लहान मुलं अजिबात आवडत नसावीत…!!!
पण , तरीही तुम्हाला पहिल्यावर तिच्या पोटात मायेचे झरे लोटतातच कसे ??? का कुणास ठाऊक…!!!
आपल्या लहानपणी तुमची केअरटेकर , तुमच्या आईची हक्काची असिस्टंट अशा जबाबदार्या तिने यथार्थ पार पाडलेल्या असतात…
आपल्यासाठी एखादं म्हणून गिफ्ट घ्यायला ती जाते … आणि प्रत्यक्षात … जे जे आवडेल ते ते तुमच्यासाठी ती घेऊन येते , अगदी सहज…
तुमची आवडनिवड मनापासून जपते अन् दर वाढदिवसाला काहीतरी तुमच्यासाठी स्पेशल गिफ्ट देते…
सर्वात महत्वाचं म्हणजे… तुमच्याप्रती तिची माया आटतंच नाही, तिचे स्वतःचे मूल झाल्यावरही…
आईएवढेच तुमचे लाड करणारी , कशाचीही अपेक्षा न ठेवणारी , तुमच्या आई-वडिलांची ती सावली असते…
संग्राहक : – सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈