श्री प्रमोद वामन वर्तक
विविधा
का टा ! श्री प्रमोद वामन वर्तक
“काटा रुते कुणाला, आक्रंदतात कोणी….”
हे गाणं ऐकायला आलं, की माझ्या मनांत विचार येतो, बेंबीच्या देठापासून ओरडण्याची पाळी, तो ‘काटा’ इतका रुतेल (कुठे, ते ज्याचे त्याने आपापल्या कल्पनाविलासाने रंगवायला, माझी काहीच हरकत नाही !) एवढी वेळच स्वतःवर का येऊ द्यायची म्हणतो मी ? आता ‘काटा’ म्हटला की तो टोचणारच, त्याचा तो स्वभावधर्मच नाही का ? मग तो आपला स्वभावधर्म कसा सोडेल ? अहो ‘काटा’ तर निर्जीव, इथे माणसा सारखा सजीव माणूस सुद्धा, मरेपर्यंत आपला स्वभावधर्म सोडत नाही, तर तो त्या निर्जीव ‘काट्याने’ तरी का बरे सोडावा म्हणतो मी ? आपणच त्याच्या पासून चार हात लांब रहायला नको का ? बाभळीच्या वनात शिरायच आणि काटे टोचले म्हणून गावभर बोंबलत फिरायचं, ह्यात कुठला आलाय शहाणपणा ?
गुलाबाच्या वाटीकेत टपोरे, मनमोहक रंगाचे गुलाब लागलेत म्हणून त्याला काटेच नसतील, असं कसं होईल ? उलट जितका गुलाब मोहक, सुगंधी तेवढे त्याला अणकुचिदार आणि जास्त काटे असं निसर्गाच जणू समीकरणच ठरून गेलं आहे म्हणा नां ! सध्या सायन्स नको तितकं पुढे गेलेलं असल्यामुळे, काही शास्त्रज्ञानी वेगवेगळ्या बिन काट्याच्या गुलाबाच्या जाती पैदा केल्या आहेत असं म्हणतात ! खरं खोटं तो फुलांचा राजाच जाणे !
जी गोष्ट सुंदर गुलाबांची तीच गोष्ट चवीच्या बाबतीत म्हणालं तर माशांची ! एखाद्या माशाच्या अंगात जेवढे जास्त काटे, तेवढा तो मासा चवीला लय भारी असं म्हणतात ! मी स्वतः कोब्रा असल्यामुळे, त्या लय भारी चवीच्या माशाच्या काट्याच्या वाट्याला कधी जायचा प्रसंग आला नाही ! हे आपलं माझ्या नॉन व्हेज खाणाऱ्या काही मित्रांकडून मिळालेलं फुकटच जनरल नॉलेज बरं का ! याच मित्रांच्या, काट्या सकट मासे खातांना कोणा कोणाच्या घशात कसा काटा अडकला, मग तो काटा काढायला काय, काय युक्त्या कराव्या लागल्या, याचे रसभरीत किस्से खूप ऐकले आणि मनसोक्त हसलो ! कोणी अशा वेळेस डझन डझन केळीच काय खाल्ली, कोणी दहा बारा ग्लास पाणीच काय प्यायले, एक ना अनेक ! पण मी म्हणतो, ऊस गोड लागला म्हणून जसा कोणी मुळासकट खात नाहीत, तसा मासा कितीही चविष्ट असला, तरी तो काट्या सकट खायच्या भानगडीत पडायचेच कशाला ? शेवटी काटा तो काटाच आणि तो सुद्धा घशा सारख्या नाजूक अवयवात अडकलाय, ही कल्पनाच माझ्या अंगावर काटा आणते बघा ! पण या अंगावरच्या काट्याच एक बरं असत मंडळी, तो ना कधी आपल्याला टोचत ना आपल्या शेजाऱ्याला !
“भय्या काटा मत मारो, काटा मत मारो, बरोबर वजन करो !” अस धेडगुजरी हिंदी आपण कधी, आपल्या बायको बरोबर भाजीला गेला असाल तर आणि तरच ऐकलं असण्याची शक्यता आहे ! एवढं त्या भय्यावर ओरडून सुद्धा तो काटा मारायचा आपला जन्मसिद्ध हक्क काही सोडत नाही तो नाहीच ! वर, मी काटा न मारता वजन केलं आहे, तुमचा विश्वास नसेल तर कुठल्याही भाजीवाल्याकडे जाऊन (उंदराला मांजर साक्षी !) वजन करा, कमी भरलं तर भाजी फुकट घेवून जा, असा घीसापिटा ठेवणींतला डायलॉग बायकोला ऐकवतो ! या वर, बायको पण, बघितलंत हाच भय्या किती प्रामाणिक आहे, असा चेहरा करून आपल्याकडे बघते आणि आपण पण तिला बरं वाटावं म्हणून, तोंड देखलं हसतो !
फार, फार पूर्वी पासून आपल्या “भारतात” कुठलीही एखादी खाण्याची वस्तू, ही स्वतःच्या हातानेच खायची चांगली आणि रास्त पद्धत होती ! आपल्यावर साहेब राज्य करून गेल्या नंतर, त्याने ज्या अनेक वाईट गोष्टी मागे ठेवल्या, त्यात काट्या चमच्याचा नंबर फार वरचा लागावा ! नंतरच्या स्वतंत्र “इंडियात” सगळ्याच हॉटेल मधून, मग या काट्या चमच्याने आपले स्थान कायमचे पक्के करून टाकले ! जेंव्हा केंव्हा माझी हॉटेलात जाण्याची वेळ येते, तेंव्हा मी पाहिलं काम काय करतो माहित आहे ? तर, माझ्या डिशच्या आजूबाजूची सगळी काटे, चमचे, सुऱ्या ही आयुध उचलून बाजूला ठेवतो ! मंडळी, स्वतःच्या हाताने उदरभरण करण्याची मौज काही औरच असते, या माझ्या मताशी बहुतेक मंडळी सहमत असावीत ! काय आहे ना, स्वतःच्या हाताने जेवल्या शिवाय मला जेवल्याच समाधान मिळत नाही, हे ही तितकंच खरं, मग तो काटा, चमचा सोन्याचा का असेना !
मंडळी, मी एक साधा सरळमार्गी, नाका समोर चालणारा मध्यमवर्गीय असल्यामुळे, माझं कोणाशीच वैर नाही ! त्यामुळे माझ्यावर कधी कोणासारखी, काट्याने काटा काढायची वेळ कधीच आली नाही आणि सध्याच माझं वय पहाता, अशी वेळ या पुढे यायची अजिबातच शक्यता नाही ! आणि तुम्हांला सांगतो, मुळात काट्याने काटा काढतात यावर माझा विश्वासच नाही ! कारण तसं करतांना मी कधी कोणाला बघितल्याचे आठवत पण नाही ! असो ! पण हां, काही जणांच्या टोचलेल्या काट्याचा नायटा होताना मात्र मी बघितलं आहे मंडळी !
शेवटी, आपण सर्व आपल्या जीवनात मार्गक्रमण करीत असलेल्या वाटेवर, कुठल्याही प्रकारच्या कंटकांचा त्रास आपल्याला कधीच होऊ देवू नकोस, अशी त्या जगदीशाच्या चरणी प्रार्थना करतो !
शुभं भवतु !
ता. क. – हा लेख वाचतांना कोणाच्या मनाला किंवा आणखी कुठे, कळत नकळत काटे टोचले असतील तर, त्याला मी जबाबदार नाही !
© श्री प्रमोद वामन वर्तक
१९-११-२०२१
(सिंगापूर) +6594708959
मो – 9892561086
ई-मेल – [email protected]
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈