सौ. स्वाती रामचंद्र कोरे
कवितेचा उत्सव
☆ थंडीची चाहूल ☆ सौ. स्वाती रामचंद्र कोरे ☆
सरे.. रिमझिम धारा
लागे..थंडीची चाहूल
दिवाळीसोबत… टाके
थंडी..हळूच पाऊल..१
बळीराजा.. आनंदून
करी..रब्बीची लागण
काळया.. आईच्या गर्भात
नव बीज.. अंकुरण….२
झाडाखाली.. दिसे सडा
जर्द.. पिवळ्या पानांचा
हुडहुडी.. भरण्याचा
ऋतू हा.. पानगळीचा..३
पाला.. पाचोळा सारा
होई…शेकोटीत गोळा
फड…रंगती गप्पांचे
मिळे.. आनंद वेगळा…४
बाळराजे.. पाळण्यात
निजे…शाल लपेटूनी
उबदार.. गोधडीत
आजीच्याच…आठवणी..५
सुका मेवा..पेरू,बोरे
तीळ.. शेंगदाणा चिक्की
शरीराची.. जपणूक
व्यायामाने.. होते नक्की..६
वाटे..हवासा गारवा
ऋतू..गुलाबी भेटीचा
शहारल्या..स्पर्शातून
धुंद..क्षण जपण्याचा..७
© सौ. स्वाती रामचंद्र कोरे
भिवघाट.तालुका, खानापूर,जिल्हा सांगली
मो.9096818972
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈