?  जीवनरंग ?

☆ सिंधू … अज्ञात ☆ प्रस्तुति – सुश्री मीनल केळकर ☆ 

सिंधू…

माझी पत्नी आतून ओरडली, ” आता किती वेळ तो पेपर वाचत बसणार आहात…? आता ठेवा तो पेपर आणि तुमच्या लाडक्या लेकीला खायला दिलंय ते संपवायला सांगा…! “

मामला गंभीर वळण घेणार असं दिसलं..!

मी पेपर बाजूला सारला आणि घटनास्थळी दाखल झालो…

सिंधू, माझी एकुलती एक लाडाची लेक रडवेली झालेली होती. डोळे पाण्याने काठोकाठ भरलेले. –तिच्या पुढे एक दही -भाताने पूर्ण भरलेला बाऊल होता. सिंधू, तिच्या वयाच्या मानाने शांत व समजुतदार, गोड आणि हुशार मुलगी होती.

मी बाऊल उचलला आणि म्हणालो, ” बाळ, तू चार घास खाशील का..? तुझ्या बाबासाठी…? ” सिंधू, माझी बाळी; थोड़ी नरमली; पालथ्या मुठीने डोळे पुसले आणि म्हणाली, ” चार घासच नाही, मी सगळ संपवीन—” थोडी घुटमळली आणि म्हणाली,

” बाबा, मी हे सगळं संपवलं  तर… तुम्ही मला मी मागीन ते द्याल..? “

” नक्की…!”

तिने पुढे केलेल्या गुलाबी हातात मी हात दिला आणि वचन पक्के केले.

पण आता मी थोडा गंभीर झालो. ” बाळ, पण तू कंप्यूटर किंवा दुसरं एखादं महागडं खेळणं मागशील, तर आत्ता बाबाकडे तेवढे पैसे नाहीयेत बेटा…! “

” नाही बाबा..! मला तसं काही नको आहे…! ” तिने मोठ्या मुश्किलीने तो दहीभात संपवला…

मला माझ्या पत्नीचा आणि आईचा खूप राग आला. एवढ्या छोट्या मुलीला कुणी एवढं खायला देतात…? ते पण तिला न आवडणारं…. पण मी गप्प बसलो. सगळं मोठ्या कष्टाने खाऊन संपविल्यावर हात धुऊन सिंधू माझ्यापाशी आली…डोळे अपेक्षेने मोठे करून–  

आमच्या सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे होत्या. ” बाबा, मी या रविवारी सगळे केस काढून टाकणार…! ” तिची ही मागणी होती…

” हा काय मूर्खपणा चाललाय…? काय वेड बीड लागलंय काय…? मुलीचे मुंडण…? अशक्य…! “

सौ. चा आवाज वाढत चालला होता…!

 ” आपल्या सगळ्या खानदानात असलं काही कुणी केलं  नाही…! ” आईने खडसावले.

“ती सारखी टिव्ही पहात असते… ! त्या टिव्हीमुळे आपली संस्कृती आणि संस्कार वाया चालले आहेत…! “

” बेटा, तू दुसरं काही का मागत नाहीस…? या तुझ्या कृत्यामुळे आम्ही सगळे दु:खी होऊ…! आम्हाला तुझ्याकडे तसं बघवेल का सांग…? सिंधू, बेटा आमचाही विचार कर…! ” मी विनवणीच्या स्वरात म्हटले…

” बाबा, तुम्ही पाहिलंत ना, मला तो दहीभात संपवणं  किती जड जात होतं ते…! ” आता ती रडायच्या बेतात होती– ” आणि तुम्ही मला त्या बदल्यात मी मागीन ते द्यायचं कबूल केलं होतं… आता तुम्ही मागे हटता आहात… मला कोणत्याही परिस्थितीत दिलेलं वचन पाळणा-या राजा हरिश्चंद्राची गोष्ट तुम्हीच सांगितली होती ना…आपण दिलेली वचने आपण पाळलीच पाहिजेत…! “

मला आता ठामपणा दाखवणे भाग होते…

” काय डोके- बिके फिरलेय काय..? ” आई आणि सौ. एकसुरात…

आता जर मी दिलेला शब्द पाळला नाही, तर सिंधू पण दिलेला शब्द तिच्या पुढल्या आयुष्यात पाळणार नाही—-

मी ठरविले, तिची मागणी पूरी केली जाईल…

—गुळगुळीत टक्कल केलेल्या सिंधूचा चेहरा गोल असल्याने आता तिचे डोळे खूप मोठे आणि सुंदर दिसत होते…

सोमवारी सकाळी मी तिला शाळेत सोडायला गेलो. मुंडण केलेली सिंधू शाळेत जाताना बघणे एक विलक्षण दृष्य होते . ती मागे वळली आणि टाटा केला.  मीही हसून टाटा केला…

तितक्यात  एक मुलगा कारमधून उतरला आणि त्याने तिला हाक मारली, ” सिंधू माझ्यासाठी थांब.” गंमत म्हणजे त्याचेही टक्कल केलेले होते.

‘ अच्छा, हे असं आहे तर ‘, मी मनात म्हणालो…

त्या कारमधून एक बाई उतरल्या आणि माझ्यापाशी आल्या..!  ” तुमची सिंधू किती गोड मुलगी आहे. तिच्यासोबत जातोय तो माझा मुलगा, हरीष. त्याला ल्यूकेमिया (Blood cancer) झालाय.  येणारा हुंदका त्यानी आवंढा गिळून दाबला आणि पुढे म्हणाल्या, ” गेला पूर्ण महिना तो शाळेत आला नाही. केमोथेरपि चालू होती. त्यामुळे त्याचे सगळे केस गळाले. तो नंतर शाळेत यायला तयारच नव्हता. कारण मुद्दाम नाही, तरी सहाजिकच मुले चिडवणार… सिंधू मागच्याच आठवड्यात त्याला भेटायला आली होती. तिने त्याला तयार केले की चिडवणा-यांचे मी पाहून घेइन.  पण तू शाळा नको बुडवूस —-मी कल्पनाही केली नव्हती की, ती माझ्या मुलासाठी आपले इतके सुंदर केस गमवायला तयार होईल…तुम्ही तिचे आईवडील किती भाग्यवान आहात. अशी निस्वार्थी आणि निरागस मुलगी तुम्हाला लाभली आहे…”

ऐकून मी स्तब्ध झालो. माझ्या डोळ्यातून अश्रू ओघळले. मी मनाशी म्हणत होतो…’ माझी छोटीशी परी मलाच शिकवते आहे– खरं निस्वार्थ प्रेम म्हणजे काय ते…’

—–या पृथ्वीवर ते सुखी नव्हेत, जे स्वत:ची मनमानी करतात.  सुखी तेच की जे दुस-यावर जिवापाड प्रेम करतात आणि त्यांच्यासाठी स्वत:ला बदलायलाही तयार होतात. ….

आपल्यालाही आपलं आयुष्य सिंधूसारखं बदलता यायला पाहिजे. …….जमेल का ? 

लेखक: अज्ञात…

संग्राहक :- मीनल केळकर 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments