सौ. कल्पना मंगेश कुंभार
विविधा
☆ अशा सांजवेळी… ☆ सौ. कल्पना मंगेश कुंभार ☆
सांजवेळ…! ही वेळचं किती विचित्र आहे ना..??या वेळेच्याही दोन छटा आहेत..
एक आहे सुखाची,प्रसन्नतेची, हास्याची,शांततेची,आनंदाची, सकारात्मक…
आणि दुसरी आहे..दुःखाची, आठवणींची,मनात काहूर माजवणारी,कोणाच्या तरी प्रतिक्षेची,नकारात्मक….
सांजवेळ…!सांजवेळ येते ती शांतपणे…प्रसन्नतेचे वातावरण पसरत…देवापुढे सांजवात लावून..आपली संस्कृती जपत… शुभम् करोति.. चा संस्कार लहान बालकांमध्ये रुजवत..एखादया नव्या नवेली नवरीप्रमाणे लाजून चूर होऊन…म्हणूनच की काय..ती सूर्याची लाली पाहून वारा अधिकच गंधाळतो आणि सारा आसमंत शहारतो…
सांजवेळ…! प्रत्येकाला ओढ लागलेली असते घरी परतण्याची… सगळे ऑफिस, सगळ्या शाळा सुटलेल्या असतात आणिआई ,बाबा …मुले सगळेच घराच्या ओढीने घरी लवकर परतण्यासाठी धडपडत असतात.आकाशातील पक्षांचे थवेच्या थवे जणू अस्ताला जाणाऱ्या सूर्याला ” उद्या पुन्हा भेटू ” असे सांगून आपल्या पिल्लांच्या ओढीने घरी परतत असतात.ते दृश्यचं इतकं नयनरम्य असतं ना; की वाटतं आपणही पक्षी व्हावं आणि त्या पक्षांच्या थव्याबरोबर सूर्याची कोमल, सोनेरी किरणे पंखावर झेलत त्याला निरोप देऊन घरी उडत उडत परतावं….अशी ही किलबिलाटाने भारलेली मनमोहक सांजवेळ! पण….पण किती भुर्रकन उडून जाते ना…
अशा या सांजवेळेची दुसरी छटा… हवीहवीशी वाटणारी पण तितकीच नकोशीही…अगदी जीवघेणी..
सांजवेळ ..! हीच वेळ…हीच वेळ मनात उठवत असते काहूर..हीच वेळ..हीच वेळ जागे करू पहाते माणसाचे अंतर्मन…..अंतर्मनात दडलेल्या त्या….अनेक ‘आठवणी’…. मनाच्या हळव्या कोपऱ्यात जपलेले अनेक ‘क्षण ‘…काही गोड, हवेहवेसे.. तर काही कटू…काहूर माजवणारे…
या आठवणीमधील ‘ तो ‘
एक चेहरा…. जो आठवता मन जाते भारावून… आणि मग..तुला मनाला आवर घालणे कठीण होऊन बसते.अशा वेळी ही सांजवेळ जणू छळू लागते मनाला… दाटून येतो आठवांचा पाऊस आणि भिजवून चिंब चिंब करतो प्रत्येक क्षणाला.. हरवून जाते मन भूतकाळात….
भूतकाळातील ‘ तो ‘ किंवा ‘ ती ‘ …त्याच्याबरोबरच्या अनेक आठवणी….रुसवे फुगवे, एकत्र घालवलेले अनेक क्षण,मित्रमैत्रिणीचे चिडवणे…झालेली भांडणं…. धरलेला अबोला….रुसवा काढण्यासाठी केलेले प्रयत्न… तो लटका नाकावरचा राग…सगळं…अगदी सगळं आठवू लागतं आणि आपण स्वतः लाच विसरून जातो.कधी ओठावर गोड हसू उमटतं… तर कधीं नकळत पापण्या ओलावतात.अशी ही सांजवेळ……
सांजवेळ…! नव्या नवेली नवरीला क्षणात माहेरच्या अंगणात घेऊन जाते…तिची माहेराप्रतिची ओढ.. अशा एकाकी सांजवेळी उफाळून येते… मग तीही रमून जाते माहेरच्या कुशीत…आठवत रहाते तिचं बालपण… भावाबहिणीची लुटुपुटूची भांडणं… आईबाबांचे प्रेम….अगदी सगळं नजरेसमोरून जाऊ लागतं अगदी चित्रपटाप्रमाणे…मग दाटून आलेल्या या सांजवेळी तीही होते थोडी सैरभैर… पण इतक्यात लागते सख्याची चाहूल आणि त्याच्या ओढीने ती क्षणात सासरी परतते आणि रमून जाते तिच्या घरांत.. अशी ही सांजवेळ.. .जितके उलगडावे तिला तितके आपणच गुरफटून जाऊ तिच्यामध्ये…
सांजवेळ…! प्रत्येकाला पहायला लावते कोणाची तरी वाट..प्रत्येकजण असतो कोणाच्या तरी प्रतीक्षेत..पण….हवीहवीशी वाटणारी ती व्यक्ती जेव्हा येत नाही; तेंव्हा हीच सांजवेळ बनते भयाण.. भेसूर…
अशा या सांजवेळी मला कवी ग्रेस यांची एक कविता आठवते…
” भय इथले संपत नाही
मज तुझी आठवण होते..
मी संध्याकाळी गातो
तू मला शिकवले गे ते..”
किती आर्तता आहे ना या गाण्यात… जेवढे हृदयातून ऐकू तेवढेच त्या गाण्यात हरवून जातो आपण…
पण…ही दुसरी छटा आहे। म्हणूनच पहिल्या छटेलाही अर्थ आहे,नाही का??
“येते लाजून चूर होऊन
सूर्याची लाली गाली लेऊन पक्षांच्या पंखांवर स्वार होऊन
हवेत गारवा पसरवून
सगळीकडे दिव्यांची रोषणाई करून
अशी ही सांजवेळ….
पण…
जाते मात्र…
मनात काहूर माजवून
कोणाची तरी आठवण..
मनात ठेवून
डोळ्यांच्या पापण्या
ओल्या करून…
शांत सागरी
लाटा उठवून…
अशी ही सांजवेळ……
© सौ. कल्पना मंगेश कुंभार
शाळा : हुतात्मा बाबू गेनू विद्यामंदिर क्र 28, इचलकरंजी
मोबाईल : 9822038378
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈