श्री सुजित कदम
साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #90
☆ गोष्ट..! ☆
माझा बाप
माझ्या लेकरांना मांडीवर घेऊन
गावकडच्या शेतातल्या खूप गोष्टी सांगतो..
तेव्हा माझी लेकरं
माझ्या बापाकड हट्ट करतात
राजा राणीची नाहीतर परीची
गोष्ट सांगा म्हणून तेव्हा..
बाप माझ्याकडं आणि मी बापाकड
एकटक पहात राहतो
मला…
कळत नाही लेकरांना
कसं सांगाव
की राजा राणीची आणि परीची
गोष्ट सांगायला
माझ्या बापान कधी अशी स्वप्न
पाहिलीच नाहीत..,
त्यान..
स्वप्न पाहिली ती फक्त..
शेतातल्या मातीची
पेरणीनंतरच्या पावसाची..,
त्याच्या लेखी
नांगर म्हणजेच राजा
अन् माती म्हणजेच राणी
मातीत डोलणारी पिक म्हणजेच
त्यान जिवापाड जपलेली परी…,
© सुजित कदम
पुणे, महाराष्ट्र
मो.७२७६२८२६२६
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈