श्री आनंदहरी

? मनमंजुषेतून ?

☆ केल्याने होत आहे रे… ‘बालसखा’ ची निर्मिती श्री आनंदहरि  

आयुष्य हे अनाकलनीय असते असे म्हणले तर ते फारसे चुकीचे होईल असे वाटत नाही.. एखादी गोष्ट ठरवूनही, प्रयत्न करूनही साध्य होतेच, घडतेच असे नाही. तसेच ध्यानी-मनी नसताना एखादी चांगली गोष्ट मात्र घडून जाते, साध्य होते… ‘ बालसखा ‘ या बाल-कुमारांच्या साहित्याने आणि चित्रांनी नटलेल्या दिवाळी-बालदिन अंकाबाबत असेच झाले.

इस्लामपूर येथील आमच्या ‘नटरंग ‘ या नाट्यसमुहाचे प्रमुख अमृत शिंगण यांचा ३० ऑक्टोबरला फोन आला. ख्यालीखुशाली विचारून झाली आणि त्यांनी अचानक विचारले,

‘एखादा छोटासा दिवाळी अंक काढता येईल काय ? ‘ 

या प्रश्नाने मनात उलट सुलट विचार सुरू झाले…  छोटासा दिवाळी अंक काढण्याचा विषय आणि दिवाळी तर तोंडावर आलेली ? सहज दिनदर्शिका पाहिली.. ३० ऑक्टोबरला ठळक अक्षरात नमूद असणाऱ्या तिथीवर नजर गेली.. सफला एकादशी.. मुहूर्त.. तिथी याचा कधीच विचार करत नसतानाही सहज मनात आले- ‘प्रयत्न करायला’ काय हरकत आहे ? लगेच चर्चाही झाली. शब्दशिल्प प्रकाशनच्या दिलीप क्षीरसागर सरांची सक्रीय साथही लाभली. 

लहान मुलांच्या साहित्यलेखनाला, चित्रकलेला एक व्यासपीठ मिळावे म्हणून बाल-कुमारांच्या साहित्याने आणि चित्रांनी सजलेला छोटासा दिवाळी-बालदिन अंक, नटरंग ग्रुप, इस्लामपूर आणि शब्दशिल्प प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने, प्रकाशित करण्याचे निश्चित झाले. आणि नामकरण ही झाले ‘बालसखा ‘ 

‘बालसखा ‘ बालदिनी प्रकाशित करण्याचे निश्चीतही झाले…हातात केवळ १५ दिवसांचा अवधी होता.. छपाई, बांधणीसाठी आठ दिवस लागणार होते. चर्चा झाली, सगळे ठरले त्यावेळी अचानक  ‘त्रिशूल ‘ चित्रपटातील अमिताभ बच्चन यांचा प्रसिद्ध संवाद आठवला,

“मै पांच लाख का सौदा करने आया हूँ, मगर इस वक्त मेरी जेब में पांच फुटी कवडियां भी नही है !” 

स्थिती साधारण तशीच होती. त्याच दिवशी सर्व साहित्य समूहावर मुलांनी स्वलिखित साहित्य, चित्र पाठवण्याचे आवाहन पाठवले. दोन दिवसांतच मिरज येथील बालकवयित्री हर्षदा महेशकुमार कोष्टी हिची कविता आणि नागपूर येथून बालचित्रकार तन्मय सिताराम माटे आणि पुण्याहून ईशान्वी कुलकर्णी यांची चित्रे आली. मनाला हुरूप आला. नंतर साहित्य, चित्रे येतच राहिली…  ‘ बालसखा ‘अंकातील साहित्यकृतीसाठीची चित्रे-रेखाटने इस्लामपूर येथील नववीमध्ये शिकणाऱ्या कु.वैष्णवी टिळे हिने रेखाटायलाही सुरवात केली आणि चित्रकार गणेश पोतदार यांनी अल्पावधीतच अतिशय सुंदर मुखपृष्ठचित्र दिले.

वेळापत्रक आखले होते त्यानुसार ३२ पृष्ठांचा ‘ बालसखा ‘अंक तयार होऊन छापायला गेला. नियत वेळेनंतर आलेले साहित्य, चित्रे समाविष्ट करता आली नाहीत. अगदी कमी वेळेत ‘बालसखा’ अंकाची निर्मिती झाली असल्याने काही त्रुटी राहणे साहजिकच होते.. पण  पुढील वर्षी नियोजनबद्ध, पुरेसा अवधी घेऊन याहून अधिक पृष्ठांचा ‘ बालसखा ‘अंक प्रकाशित करण्याचे निश्चितही झाले. एवढ्या कमी कालावधीतही सांगली जिल्ह्याबरोबरच सातारा, सिंधुदुर्ग, पुणे, नागपूर जिल्ह्यातून बाल-कुमारांचे साहित्य, चित्रे प्राप्त झाली, प्रसिद्ध करता आली याचा आनंद झाला. 

ठरवल्याप्रमाणे १४ नोव्हेंबरला बालदिनादिवशी ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य विश्वासराव सायनाकर सर, वाचन चळवळीत अग्रभागी असणारे नामवंत साहित्यिक, वक्ते प्रा. संजय थोरात, प्रसिद्ध कवी आणि ‘प्रतिभा’ दिवाळी अंकाचे संपादक धर्मवीर पाटील, मुक्तांगणचे विनोद मोहिते यांच्यासमवेत प्रातिनिधिक बाल-कुमार साहित्यिक-चित्रकारांच्या हस्ते आणि बाल-कुमार व त्यांच्या पालकांच्या तसेच अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत ‘ बालसखा ‘ चा प्रकाशन सोहळा संपन्न झाला.  

‘बालसखा’ चा निर्मिती प्रवास आठवताना, अंक पाहताना शालेय जीवनात गुरुजनांनी मनावर चांगलाच बिंबवलेला सुविचार आठवतो, 

केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे..!

 

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments