सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई
इंद्रधनुष्य
☆ हैदराबाद मुक्ती-संग्राम – भाग-2 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆
(राष्ट्रसेविका समितीच्या यावर्षीच्या हस्तलिखितामघ्ये सुश्री पुष्पा प्रभुदेसाई यांच्या या लेखाची निवड झाल्याबद्दल ई – अभिव्यक्ती समूहातर्फे त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन, व पुढील साहित्य-वाटचालीसाठी शुभेच्छा.)
(न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर हैदराबाद मुक्ती लढ्याचे साक्षेपी अभ्यासक होते.) इथून पुढे —
निजामाने आंदोलने, चळवळी यावर दडपशाही आणि सैन्य दलाचा वापर सुरू केला. त्यासाठी त्यांनी, ‘ इत्तेहादुल मुस्लिमिन ‘ ही राजकीय संघटना, आणि ‘रझाकार ‘ हे सशस्त्र स्वयंसेवक दल स्थापन केले. आणि दहशत माजवायला, त्यांना प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली. रझाकार यांचा आक्रमक व क्रूर नेता ,लातूरचा ‘कासीम रिजवी’ याला हाताशी धरून, सांप्रदायिक भावनेला खतपाणी घालणाऱ्या वृत्तीला उत्तेजन दिलं. शेतातील उभी पिके कापणे, गोठ्यातील जनावरे पळवून नेणे, स्त्रियांना पळवून नेणे, बलात्कार करणे, पुढाऱ्यांचे खून करणे, किती किती म्हणून अमानुष अत्याचार चालले होते. 1946 ते 48 अशी 2 वर्षे जनतेने भीतीदायक वातावरणात काळरात्रीसारखी काढली .संस्थानात स्त्रियांचे स्थान बालविवाह ,बालविधवा, अज्ञान, निरक्षरता ,दारिद्र्य, अंधश्रद्धा यांनी बरबटलेले होते. अशा परिस्थितीतही ,अनेक कर्तबगार स्त्रियांनी या सत्याग्रहात उडी घेतली होती. दगडाबाई शेळके, वाघमारे ,कुँवर ,पोटेचा, वैशंपायन ,सुशिलाबाई दिवाण यांनी केलेला कामातील सहकार खूपच महत्वपूर्ण ठरला. पत्रके वाटणे ,ग्रंथालयाचे काम, सांस्कृतिक कार्यक्रमातून जनजागृती ,अशी कामे त्या करत. “हैदराबाद मुक्ती संग्रामातील महिलांचे योगदान” हा एक स्वतंत्र संग्राम म्हणून ओळखला जातो. मला अभिमानाने उल्लेख करावासा वाटतो की त्या काळी स्त्रीशिक्षणाच्या तळमळीने, सुशिलाबाई दिवाण यांनी लातूरला मुलींची शाळा सुरू केली. त्या माझ्या मैत्रिणीच्या आई होत. त्या शाळेच्या सुवर्णमहोत्सवाच्या समारंभात, त्यावेळचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री मनोहर जोशी यांनी व्यासपीठावरून उतरून, त्यांना नमस्कार करून, सत्कार करून, त्यांच्या कार्याची पोचपावती दिली .
कासीम रझवीचा हैदोस चालू होता. जवळा हे गावच्या गाव जाळून टाकलं. अनेक कुटुंबांनी स्थलांतर केलं. निजाम हा रेडिओ, वृत्तपत्रं, भाषणं, आदिद्वारे भारत विरोधी प्रचार करून, स्वतंत्र राष्ट्राच्या मागणीचा पुनरुच्चार करीत असल्याचं स्पष्ट झालं .माऊंटबॅटननेही पुढाकार घेतला. पण सगळे प्रयत्न निष्फळ ठरले .अखेर सैनिकी कारवाईचा गांभीर्याने विचार होऊ लागला. ही बातमी निजामाला समजली. त्याने अगोदरच, पोर्तुगाल आणि पाकिस्तानकडून हवाईमार्गाने, तीस लाख पौंड किमतीची शस्त्रास्त्रे खरेदी करून ठेवली होती. 29 नोव्हेंबर 1947 रोजी त्याच्यासोबत ‘ जैसे थे ‘ करार केला होता. ( भारताशी पूर्ववत् संबंध व संस्थानात शांतता राखावी .) तो करार धुडकावून ,त्याने पाकिस्तानकडे मदत मागितली. कराचीमध्ये आपल्या संस्थानाच्या प्रतिनिधीची नेमणूक केली. भारताचे 20 कोटीचे कर्जरोखे पाकिस्तानला कर्ज देण्यासाठी वापरले.
अखेरचा उपाय म्हणून 9 सप्टेंबर 1948 रोजी गृहमंत्री वल्लभभाई पटेल आणि पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पोलीस ॲक्शन घेण्याचा निर्णय घेतला. आता प्रत्यक्ष लढाई सुरू होणार होती .त्याच दरम्यान, मला माझ्या आईवडिलांनी घेतलेल्या अनुभवाचा अभिमानाने उल्लेख करावासा वाटतो. त्यावेळी मिरज लातूर रेल्वेमार्गावर ढोकी नावाचे स्टेशन होते. निजाम संस्थान, आणि भारताच्या सरहद्दीवरचे ते स्टेशन. माझे वडील तात्या तेथे स्टेशन मास्तर म्हणून रुजू होते. स्टेशनच्या संरक्षणासाठी इब्राहिम, रसूल आणि महंमद हे रखवालदार होते. अनेक स्टेशन मास्तरांनी, आपल्या कुटुंबांना गावी पाठवले होते. अपवाद माझी आई.! स्टेशन मध्ये रोज खुनाच्या, अंदाधुंदीच्या नवनवीन बातम्या यायच्या. गावचा पाटील किशनदास गरड साडी नेसून चुलीजवळ जाऊन बसला. रझाकारांनी ओढत त्याला बाहेर आणले. आणि त्याच वेषात खच्च केले. रेल्वे स्टेशनमध्ये आप्पा पोर्टरचा खून झाला. तात्या ‘नको नको रे ‘ म्हणत असता “आता तुम्हालाही फुंकून टाकू. गप्प बसा ” ,शब्द ऐकायला येऊ लागले. मुसलमान स्त्रिया बाळांना दूध मागण्यासाठी मागच्या अंगणात आल्या. जात धर्म न पाहता तंग वातावरणातही आईने माणुसकी जपली. म्हैस व्यालेली होती .लहान बाळांना का जात धर्म असतो ? असं म्हणून बाळांसाठी दूध देऊन त्यांना परत पाठवून दिलं .तात्याही गावकऱ्यांना शक्य होईल ती मदत करत होते. रोज सकाळी मागचे दार उघडून, आई जनावरांना गोठ्यात पाहून, हात जोडायची. दहा महिने दिवस दिवस मोजत काढले .अनुभव लिहू तितके कमी !
क्रमशः….
© सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई
बुधगावकर मळा रस्ता, मिरज.
मो. ९४०३५७०९८७
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈