श्री अरविंद लिमये
जीवनरंग
☆ वाट चुकलेलं माकड… भाग-2 ☆ श्री अरविंद लिमये ☆
(पूर्वसूत्र-या सगळ्या गोंगाटाचा एकजीव होऊन कानावर येणारा आवाज एखाद्या जीवघेण्या ‘चित्कारा’सारखा काळीज कापणारा होता. कासावीस होत मी जागा झालो तेव्हा मध्यरात्र उलटून गेलेली होती..!)
ते एक स्वप्नच होतं. त्याला तसा नेमका अर्थ कुठून असायला? मनी वसत होतं तेच अशी सलग साखळी बनून स्वप्नी दिसलं होतं एवढंच. पण हे एवढंच होतं तर मग पहाट झाली, पक्ष्यांच्या किलबिलाटाने मला नेहमीसारखी जाग आली तेव्हा पक्ष्यांचा तो किलबिलाट मला पूर्ण जाग येण्यापूर्वीच्या क्षणभर स्वप्नातल्या त्या चित्कारासारखा कां वाटला होता ते मला तेव्हा तरी नीट उमगलं नव्हतं. पण काहीही असो पूर्ण जागा झाल्यावर याच किलबिलाटाने मी माणसात आलो. अर्धवट,अस्वस्थ झोपेमुळे आलेला थकवा पक्ष्यांचा तो आवाज ऐकून कुठल्याकुठे विरून गेला. एखाद्या गोड आवाजातल्या आर्जवी भूपाळीच्या शांत सुरांसारखी ती किलबिल माझ्या मनाला हळूवार पणानं कुरवाळत होती.
खूsप बरं वाटलं.
मनातलं माकड (बहुधा) निघून गेलं. दुसऱ्या रात्री त्यामुळेच मला शांत झोप लागली. मग रोज रात्री लागू लागली. ठरल्यासारखी पक्ष्यांची किलबिल ऐकून त्या झोपेतून पहाटेची जागसुद्धा तशीच नेमानं येत राहिली.
पण खूप दिवस उलटले आणि हा नित्यनेम चुकला. पुन्हा एक ओरखडा उठला.
विस्मरणात गेलेलं ते ‘पक्ष्यांचं’ झाड अचानक स्वप्नात जसंच्या तसं पुन्हा जसं लख्ख दिसलं होतं तसंच मनातून निघून गेलंय असं वाटणारं ते वाट चुकलेलं माकड पुन्हा आपलं डोकं वर काढणार याची मात्र तेव्हा मला कल्पना आलेली नव्हती.
आमच्या अपार्टमेंटच्या पूर्वेकडील कंपाऊंडच्या पलीकडे एका जुन्या वाड्याचं प्रशस्त परसदार होतं. त्या परसातल्या हिरव्या सोयऱ्यांबरोबर गुजगोष्टी करणाऱ्या पक्ष्यांची किलबिल आम्हाला रोज पहाटे हळुवार आग्रहानं जागवत होती..! पहाटे उठून स्वयंपाकघरातली पूर्वेकडची खिडकी उघडली की अलगद आत येणार्या वार्याच्या झुळूका त्याच परसातल्या सोनचाफ्याच्या सुगंधाने माखलेल्या असायच्या.ते साधं खिडकी उघडणंही इतकं सुगंधी आणि सुखकारक असायचं की कांही क्षणानंतर तो सुगंध विरून गेला तरीही ताज्या टवटवीत झालेल्या आमच्या मनात तो सोनचाफ्याच्या अत्तराचा फाया दिवसभर खोचलेला असायचा.
श्वासांइतकीच त्या सुखाचीही गरज निर्माण झालेल्या आम्हाला एका सकाळी खूप उशिरा जाग आली. अगदी उन्हं वर आल्यानंतर.पक्ष्यांची किलबिल ऐकूच न येण्याइतकी गाढ झोप लागलीच कशी याचं आश्चर्य करीत अंथरूण सोडलं. सवयीप्रमाणे स्वयंपाकघराची खिडकी उघडली आणि कांहीतरी चुकल्यासारखं मन सैरभैर झालं. काय चुकलं ते समजलंच नाही क्षणभर. मग लक्षात आलं, खिडकीतून आत येणारी गार वाऱ्याची झुळुक आज रोजच्यासारखी नाचत बागडत आलेली नव्हती. सोनचाफ्याचा सुगंध नसल्याने ती हिरमुसली होती !
झरकन् वळून दार उघडून पाहिलं तर परस ओकंबोकं दिसत होतं. परसातली सदाफुली, मोगरा, शेवंती, अबोली, कोरांटी, पारिजातक, लिंब सगळेच सगळेच निघून गेलेले. दुर्वांचा तजेलदार हिरवाकंच कोपराही हरवला होता.जाईजुईचे वेल निराधार अवस्थेत अदृश्य झाले होते. तिथं ही अशी बारीकसारीक झाडंझुडपं तर नव्हतीच पण आमचा सहृदय होऊन राहिलेला सोनचाफाही कुठे दिसत नव्हता.
नाही म्हणायला तोडायला अवघड असलेली दोन ताडमाड वाढलेली नारळाची झाडं, आंब्याचा एक डेरेदार वृक्ष आणि घरच्या कुणी म्हाताऱ्या बाईने हट्टच केल्यामुळे अद्याप जमीन घट्ट धरून थरथरणारी नुकतीच व्यालेली लेकुरवाळी केळ एवढं मात्र अजून सुरक्षित होतं.
मोठ्या वृक्षांचे मारेकरी जास्त मजुरीसाठी हटून बसले होते. त्यांच्याशी तडजोड झाली तेव्हा आंबा-नारळाची झाडंही भुईसपाट झाली.
आता उभी होती घरचंच कुणीतरी मेल्यासारखी उदास होऊन गेलेली ती लेकुरवाळी केळ. तिची पिल्लं मोठी झाली तशी तीही मरणाला सामोरी गेली..!
क्रमशः…
©️ अरविंद लिमये
सांगली
(९८२३७३८२८८)
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈