श्री सुहास रघुनाथ पंडित
? ? बिपीन रावत आणि सहकारी ??
(अपघात दुर्घटना:08/12/2021)
डाव साधला काळाने अन्
विकट हासले कोणी
मातृभूमीचा एक हुंदका
ऐकू आला कानी.
विजयपताका लहरत होत्या
कोठून आले वादळ
कुशीत बसता कसे यान ते
बनले कर्दनकाळ.
वेढून सा-या सीमा होता
धाक,दरारा पसरत
सूर्य कसा हा लुप्त जाहला
भयाण अंधारात.
पंख छाटता जसा जटायू
हतबल झाला होता
मातृभूमीच्या अंकावरती
टेकविला हो माथा.
धन्य जाहली पंचभूते ती
सामावून घेतले
आई,तुझिया चरणावरती
वाहियली ही फुले.
© श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈