श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर
कवितेचा उत्सव
☆ धागे…. ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆
लोक ते माझेच होते
काचते धागेच होते
उध्दटांच्या त्या ‘अरे’ ला
शब्दही ‘का..रे..’च होते
दाटले अश्रू सुखांनी
हाय! ते खारेच होते
झोपली गात्रे थकूनी
श्वास हे जागेच होते
प्रश्र्न ते सोपे; परंतू
उत्तरांनी पेच होते
सोबतचे ऐनवेळी
राहिले मागेच होते
हाक मी होती दिली अन्
पांगले सारेच होते
शांततेच्या अंतरंगी
वादळी वारेच होते
गर्द रात्री साथ द्याया
दूरचे तारेच होते
जे खरे होते यशश्री
नेहमी साधेच होते
रंक वा राजा असू दे
शेवटी प्यादेच होते
पाठ राखाया सुखाची
दुःख हे आलेच होते
जे दरिद्री ते; मनाचे
आपल्या राजेच होते
© श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर
संपर्क : ओंकार अपार्टमेंट, डी बिल्डिंग, शनिवार पेठ, आशा टाकिज जवळ, मिरज
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈