कवितेचा उत्सव
☆ एखादा सूर…. ☆ निरंजन उजगरे ☆
एखादा सूर जर भिडलाच काळजाला
तर निःसंकोचपणे वाहू द्यायचं असतं
पापण्यांना….
वाटा तर वेगळ्या होणारच
नाती तर पुसट होणारच
आठवणी तर सलणारच
आणि या सा-यांना
गुंफित जाणारा एखादा सूर
पापणीला साद घालणारच…..
हे भिडणारे सूर
ही छायागर्भ गाणी
अदृश्यातून जणू पाहतात कोणी…
तुमच्या आमच्या काटेरी आयुष्यावर
जमून आलेल्या या दवाच्या थेंबाना
आपण कधी नाकारायचं नसतं…
पापण्यांना निःसंकोच
वाहू द्यायचं असतं…
– निरंजन उजगरे
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈