सौ. दीपा नारायण पुजारी
जीवनरंग
☆ महत्वाकांक्षा….. भाग 2 ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆
(आता आईही जरा विचारात पडली. संध्याकाळी सुषमानं विचित्र पद्धतीनं लग्न ठरल्याची बातमी सांगितली होती तिला.) इथून पुढे —-
सीमा बाहेर जाण्यासाठी तयार व्हायला गेली आहे हे बघून सुषमानं विचारलं,
” काकू, तुम्ही सीमाचं लग्न करणार नाही वाटतं?”
या अनपेक्षीत प्रश्नानं आई गोंधळून गेली.
“का ग, तुझं ठरलंय वाटतं.”
“हो तर. . .
मग ती किल्ली दिल्यासारखी बोलायला लागली. . . . स्वतः चं लग्न ठरलं हे सांगण्याची ही कुठली अनोखी पद्धत!! कदाचित संकोच वाटला असेल. . . . पण हे काहीतरी भलतंच. . . आपल्या जीवश्चकंठश्च मैत्रिणीला तिनं ही गोड बातमी सांगू नये याचं आईला राहून राहून आश्चर्य वाटत राहिलं. एक विषाद दोघींच्या मनात भरून राहिला.
दिवस थांबत नाहीत. सीमाचं ही लग्न झालं. पाठची भावंडं, आई-वडील, मध्यम वर्गीय परिस्थिती हा सगळा विचार करून सीमा नोकरी, मुलं, सासू सासरे, यात गुरफटत गेली. नोकरीत वरिष्ठ पदावर गेली. लाघवी स्वभावामुळं माईंची; सासुबाईंची, मदत मिळवली. सासऱ्यांची कौतुकाची थाप होतीच. सुधीरचं प्रेम साथीला होतंच. पण . . एक सल रुतत होता, सतत टोचत होता.अशातच एक दिवस आईचा फोन आला. तिला रमाकाकूंकडून समजलं होतं. सुषमा कोल्हापुरात परत आली होती. विजयची सरकारी नोकरी. तो चांगला एवन ऑफिसर होता. त्याची तीन चार वर्षांनी बदली होत असे. सुषमाला वाटे एकाच गावात राहिलो तर आपली चांगली करिअर होईल. तिनं विजय बरोबर बदलीच्या गावी जाण्यास नकार दिला. पियूला, लेकीला घेऊन ती परत आली. एका खाजगी शाळेत काम करु लागली.
सीमा धावतच गेली सुषमाला भेटायला. रमाकाकू काळजीत होत्या.
“सीमा, बाई, तू समजाव ग तिला. बघ तुझं तरी ऐकते का. सोन्यासारखा संसार करायचा सोडून कसलं हे करिअरचं खुळ डोक्यात धरलंय.”
छे ! ऐकेल तर सुषमा कसली ! तिच्या उत्तरानं उलट सीमा मोडून गेली.
“तुला मुळी महत्त्वाकांक्षाच नाही.” या वाक्यानं आपली मैत्रीण हरवल्याची खंत घेऊन सीमा तिथून बाहेर पडली होती. पुढं सीमा कधीच विजय सोबत राहिली नाही. तोच बिचारा अधेमधे येत असे रजा काढून. दोन दिवस राहून पियूला भेटून जात असे. नंतर नंतर पियू आजीकडं म्हणजे रमाकाकूंकडंच राहू लागली. आपल्या मामीत आईला शोधू लागली. सुषमाचं डॉक्टर होण्याचं स्वप्न मात्र पियूनं पूर्ण केलं. चांगले मार्क्स मिळवून तिनं गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला.
रमाकाकूंच्या घरी पोहचेपर्यंत सीमाच्या डोळ्यासमोरून हा सगळा जीवनपट तरंगत गेला.
काकू तिची वाटच बघत असाव्यात. सीमाला बघताच त्यांनी डोळ्याला पदर लावला.
“काय झालं काकू? असा त्रास कशाला करुन घेताय?”
“मग काय करु? तूच सांग. ही मूर्ख मुलगी, स्वतः च्या हातानंच धोंडा पाडून घेतला बघ या बयेनं.”
“काकू, सुषा कुठंय?”
“जाऊ दे, जाऊ दे तिला कुठंतरी.”
“मला समजलं नाही काकू. असं झालंय तरी काय?”
“अगं विजयराव येऊन गेले परवा. राहिले होते आठवडाभर. हिला म्हणत होते, चल आता, सगळे मिळून राहू. काही दिवसांनी पियूचं लग्न होईल. चल ग माझ्याबरोबर.”
“मग? काय म्हणाली सुषमा?”, उत्तर माहिती असूनही सीमानं विचारलं.
“कुठलं काय. ही काही ऐकत नाही जावईबापूंचं.”
“पियूनं नाही का समजावलं?”
“नाही कसं. तिलाही वाटतच ना गं ,आपण आपल्या आईबाबांबरोबर आपल्या घरात राहावं.”
“पियूसाठीसुध्दा तयार नाही झाली ती?”
“कसलं काय. शेवटी कडाक्याचं भांडण झालं दोघांत.”
“भांडण? बापरे!”
पियूनं तर निक्षून सांगितलं तिला, ‘आई तू नाही आलीस तरी मी आपल्या घरीच जाणार.’
” आता तरी ऐकेल म्हणावं तर ते ही नाही.”
पियूच्या अल्टिमेटमला बधली नाही ही. सीमा विचार करत होती.
” काकू आहे कुठय ती? बाहेर गेलीय का?”
“कायमची बाहेर गेली म्हण.”
“काय?”
“अग मी मध्ये पडून समजावण्याचा प्रयत्न केला तर माझ्याशी सुध्दा भांडली बघ. मला म्हणाली,
‘एवढी जड झाले असेन तुम्हाला तर वेगळं घर करून राहीन मी एकटीच.’
मी गप्पच बसले मग.
दोन दिवसांनी खरंच सगळं सामान घेऊन गेली. कुठंतरी गगनगंगा अपार्टमेंट आहे बाराव्या गल्लीत, तिथं फ्लॅट घेतलाय म्हणे. . . ” थोडं थांबून त्या म्हणाल्या, ” पियू गळ्यात पडून रड रड रडली आणि गेली तिच्या बाबांच्या बरोबर.”
सुन्न होऊन सीमा काकूंकडं बघत बसली.
‘ तुला मुळी कसली महत्त्वाकांक्षाच नाही ‘,असं म्हणणारी सुषमा ! हुषारी, जिद्द याबरोबरच थोडासा विवेक किती गरजेचा आहे. स्वातंत्र्य मिळवून सुखी झाली– की आनंद गमावून दु:खी झाली? आपल्याला सापडलेलं समाधान तिच्यावर एवढं का बरं रुसलं?–
फुलेवाडीच्या बसमध्ये बसून घरी परतताना सीमा अस्वस्थ होती—–
समाप्त.
© सौ. दीपा नारायण पुजारी
इचलकरंजी
मो.नं. ९६६५६६९१४८
Email: [email protected]
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈