श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

?इंद्रधनुष्य? 

☆ भुलभुलैया… ☆ संग्राहक – श्रीमती अनिता जयंत खाडीलकर ☆ 

१३ ऑक्टोबर.. !

इतिहासातल्या ज्या ज्या घटनांनी जग बदललं, त्यातली एक घटना 1846 साली या दिवशी घडली होती.   

अनॅस्थेशीयाच्या शोधाअगोदर कोणतीही शस्त्रक्रिया करायची असेल तर एकतर त्या रुग्णाला चार दणकट माणसं धरुन ठेवत किंवा त्याच्या डोक्यात मारून त्याला बेशुद्ध केलं जाई. किंवा त्याला भरपूर दारू/अफू/मँड्रेक दिलं जाई.. पण हा सगळा मामला बेभरवशाचा असे. मध्येच शुद्धीवर येऊन रुग्ण गुरासारखा ओरडत असे. भुलीची अशी ‘खौफनाक’ परिस्थिती असल्याने त्याकाळी ऑपरेशन्स पण मर्यादित होत असत. अगदी जीवावर बेतल्याशिवाय कोणीही स्वतःवर सर्जरी करून घेत नव्हतं.. पण इतिहासातल्या या दिवशी ही परिस्थिती बदलली..

होरॅस वेल्स यांच्यानंतर ‘विल्यम थॉमस ग्रीन मॉर्टन’ असं लांबलचक नाव असलेल्या एका माणसानं तब्बल दोन वर्षे केलेल्या अनेक प्रयोगांनंतर मॅसेच्युसेटच्या जनरल हॉस्पिटलमध्यल्या बुल्फिन्च अँफीथिएटरमध्ये जाहीर डेमोन्स्ट्रेशन ठेवलं. ( त्याकाळी ऑपरेशन्स जाहीररित्या अँफी थिएटरमध्ये होत असत. म्हणून त्याला तेव्हा ‘ऑपरेशन थिएटर’ असं म्हणलं जात असे. तेव्हापासून आजतागायत ऑपरेशनच्या खोलीला ‘ऑपरेशन थिएटर’च म्हटलं जातं). त्या दिवशीचा तो भुलेचा जाहीर प्रयोग यशस्वी झाला.. तो दिवस होता १६ ऑक्टोबर १८४६…. आणि या दिवसापासून वैद्यकशास्त्रातील या नव्या पर्वाला सुरुवात झाली. We have conquered pain ! अशा अर्थाच्या हेडलाईन्सनी दुसऱ्या दिवशीचे सगळे न्यूजपेपर भरून गेले.. नंतर लंडन, पॅरिस, बर्लिन, पीटर्सबर्ग अशा अनेक ठिकाणी ‘इथर’ वापरून शस्त्रक्रिया झाल्या, आणि अनॅस्थेशियाच्या शोधावर शिक्कामोर्तब झाले.  

आणि मानवाने वेदनेवर विजय मिळवला !!

पुढे जसजसा खात्रीलायक भुलेच्या औषधांचा शोध लागला आणि हे शास्त्र विकसित होत गेलं, तसतशी सर्जरीने पण गरुडझेप घेतली.. आज अत्यंत गुंतागुंतीच्या आणि क्लिष्ट शस्त्रक्रिया लीलया पार पडतात याचे श्रेय निश्चितच, खात्रीलायक असलेल्या आणि जास्तीत जास्त अचूकतेकडे गेलेल्या अनेस्थेशीयाला आहे..

भूलतज्ञ होण्यासाठी MBBS नंतर 3 वर्षाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम (MD) आहे. यात रुग्ण ऑपरेशन थिएटरमध्ये आणल्यापासून ते बाहेर काढेपर्यंत त्याच्या हृदयाचे ठोके कमी जास्त करणे, त्याचा बीपी कंट्रोल करणे, त्याचे मेंदू/किडनी/लिव्हर यांच्या कामाचे रेकॉर्ड ठेवणे, सगळ्या सिस्टिम्सची काळजी घेणे आणि त्यांचे कार्य कंट्रोलमध्ये ठेवणे, याचं अत्यंत क्लिष्ट शिक्षण अंतर्भूत आहे. त्यात Critical care आणि Pain management ही आहे.. 

रुग्णाच्या बेशुद्धावस्थेत त्याचा श्वास बंद पडलेला असतो, तेव्हा भूलतज्ञच कृत्रिम श्वास देऊन त्याच्या जीवनरथाचा सारथी बनलेला असतो. आणि रुग्णाला आपल्या कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी झगडत असतो. पण रुग्णांच्या लेखी तो ‘गुमनाम’च असतो.. कित्येकांना आपलं ऑपरेशन कोणत्या डॉक्टरनं केलं त्यांचं नाव तर माहीत असतं, पण भूल कोणत्या डॉक्टरांनी दिली होती, हे मात्र बऱ्याच जणांना सांगता येत नाही.. मला सांगा, किती जणांना आपल्या भूलतज्ञाचं नाव माहिती आहे.?  आणि ऑपरेशननंतर कितीसे पेशंट ” मला ऑपरेशनच्या वेदना जाणवू न देणाऱ्या भूलतज्ञाचे आभार ” अशा शब्दांत भावना व्यक्त करतात बरं.?! 

आपण आपल्यासाठी अन्न निर्माण करणाऱ्या बळीराजाबद्दल कृतज्ञ असतो, सीमेवर आपलं रक्षण करणाऱ्या सैनिकांबद्दल हळवे असतो, पण आपल्याला ऑपरेशनदरम्यानच्या जीवघेण्या वेदनांपासून मुक्ती देणाऱ्या डॉक्टरांचे आभार मानायचे असतात, याबाबतीत मात्र एकंदरीत समाजातच उदासीनता दिसून येते.. यावर वर्तमानपत्रात ना कुणाचे लेख येतात.. ना कुठे भूलतज्ञाचा सत्कार होतो.. ना इतर डॉक्टरांसारखी प्रसिद्धी कोणा भूलतज्ञाच्या नशिबी असते..

मेडिकलच्या विद्यार्थ्यांचा देखील भूलशास्त्र विषय घेण्याकडे ओढा तसा कमीच असतो. कारण एकतर प्रसिद्धी मिळत नाही, त्यामानाने मोबदलाही मिळत नाही, पण उलट रिस्कचे आणि स्वतःवर येणाऱ्या स्ट्रेसचे प्रमाण खूपच जास्त असते !!

पण काहीही असलं तरी एक मात्र खरं की, इतर सगळे डॉक्टर्स हे जरी पेशंटला ‘ आजारातून बरं करणारे ‘ असले तरी, – भुलेदरम्यान जगण्या- मरण्याच्या सीमारेषेवर असणाऱ्या पेशंटला सहजगत्या ठीक ठेवणारे– वेळ आली तर पेशंटला मरणाच्या दारातून खेचून आणू शकणारे.. आणि पदोपदी पेशंटच्या आणि साक्षात यमाच्यामध्ये उभे राहणारे मात्र, फक्त आणि फक्त ‘ भूलतज्ञ ‘च असतात.. 

अशा या पडद्यामागच्या हिरोंचे आभार मानण्याचा आणि त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे..

या जागतिक भूलदिनाच्या सर्व मानवजातीला शुभेच्छा !!

 

संग्राहक : श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

सह्याद्री अपार्टमेंट, खाडीलकर गल्ली, बालगंधर्व नाट्यमंदिर समोर, ब्राह्मणपुरी, मिरज,जि. सांगली

मो 9689896341

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments