श्री आनंदहरी

? जीवनरंग ❤️

☆ शिवकळा – भाग-5 ☆ श्री आनंदहरी 

आपल्या परागंदा झालेल्या नवऱ्याबद्दल माहेरी जाऊन गोदामावशीला  विचारावे असे एक-दोनदा तिच्या मनात येऊन गेले होते पण तिने एखाद्या असहाय्य क्षणी मनात आलेला तो विचार मनातून काढून टाकला होता कारण तिचा त्या साऱ्यावर जराही विश्वास नव्हता पण माणूस हताश झाला की कुणावरही आणि कशावरही विश्वास ठेवतो हे तिला ठाऊक होते.. ती हताश झाली होती, असहाय्य होती पण तरीही तिचा त्यासाऱ्यांवर, कशावरंच विश्वास नव्हता.

तिला हताश होऊन, रडत राहून चालणार नाही याची तिला जाणीव झाली आणि तिने डोळे पुसले. तिची, तिच्या आयुष्याची लढाई तिलाच एकटीला लढावी लागणार आहे हे तिला कळून चुकले होते. ती स्वतःला सावरून विचार करत राहिली. विचारात, रात्र सरुन कधी उजाडले हे तिलाही उमगले नाही. उजाडले तेंव्हाची ती, आधल्या रात्रीची ती राहिली नव्हती.

दोन दिवसांनी मंगळवारी ती कोतमाईच्या शिवारात भांगलायला निघाली होती. एरवी जाताजाता बाहेरूनच हात जोडून लगबगीनं नमस्कार करणारी ती कोतमाईच्या देवळात गेली. तिने भक्तिभावानं नमस्कार केला. देवीपुढे असलेल्या करंड्यातले हळद-कुंकू देवीला वाहिलं , स्वतःच्या कपाळाला लावलं आणि देवीजवळ काहीतरी मागणं मागत असल्यासारखी दोन-तीन मिनिटे हात जोडून, डोळे मिटून शांत उभी राहिली. थोडावेळ देवीसमोर डोळे मिटून बसली आणि उठून, पुन्हा एकदा नमस्कार करून शांत मनाने बाहेर आली. ती बाहेर आली तेव्हा ती स्वतः अंतर्बाह्य शांतता अनुभवत होती. तिचा चेहराही काहीसा वेगळाच दिसत होता.

ती झपाझप चालत कोतमाईच्या शिवारात आली. बायका भांगलणीला पातीवर बसत होत्या . त्या बायकांच्या पलीकडल्या कडेच्या पातीवर ती भांगलायला बसली. नेहमीप्रमाणे तिचं खुरपं भराभर चालत होतेच पण यावेळी हाताबरोबर  मनात विचारही चालू होते. दुपारची सुट्टी झाली . सगळ्या बायका बांधावर आंब्याखाली भाकरी खायला गोळा झाल्या. भाकरीच्या धडप्याची गाठ सोडता सोडता खालच्या आळीच्या रखमाक्का तिला म्हणाल्या,

“काय गं आज लईच येगळी दिसतीयास ? “

स्वतःच्या भाकरीचा तुकडा मोडता मोडता ती काहीच न बोलता नुसतीच हसली.

जेवणाच्या सुट्टीनंतर परत भांगलणीला जुपी झाली. दिवस मावळतीला गेला तशी भांगलणीच्या पुठ्ठयातील दोन-तीन बायकांनी ‘ कुणाची पात भांगलून लवकर होतेय ‘ याची गंमतीगंमतीत स्पर्धा लावली . प्रत्येकीचा हात झपाझप चालत होता. कुणाला बोलायलाच काय पण इकडेतिकडे बघायलाही सवड नव्हती. रखमाक्काचं लक्ष सहज तिच्याकडं गेलं अन त्यांच्याही नकळत त्या जरा मोठ्यानं बोलून गेल्या,

“आगं बया ss हिला आनी काय झालंया ?”

त्यांच्या त्या बोलण्यानं सगळ्यांचे हात थांबले आणि तिच्याकडे लक्ष गेलं. ती घुमायला लागली होती.

तिच्या अंगात देवीचं वारं आलंय, शिवकळा आलीय हे म्हाताऱ्या, अनुभवी रखमाक्कांच्या लगेच लक्षात आले होते. त्यांनी पुढे होऊन तिला नमस्कार केला तसा सगळ्यांनीही नमस्कार केला. बऱ्याच वेळाने वारं गेल्यावर रखमाक्का तिला घेऊन तिच्या घरी गेल्या होत्या. ती घरात परतेपर्यंत साऱ्या गावात तिच्या अंगात शिवकळा आल्याची बातमी पोहोचली होती,

मंगळवारी आणि शुक्रवारी तिच्या घरात बाया -माणसांची गर्दी होऊ लागली. घरात देवीचं ठाणं आले आणि तिला हवे होतं तसे सारेच बदलत गेले. तिच्या कपाळावरची कुंकुवाची जागा  मळवटाने घेतली. वेणी-अंबाड्याऐवजी तिचे केस मोकळे झाले .या साऱ्यामुळे  तिचे गोरेपण जास्तच खुलले  पण तिच्या अंगात देवीचा वास असल्याने तिच्याकडे बघणाऱ्या बऱ्याचशा लोकांची नजर बदलली होती. काहीतरी कारण काढून घरी येणाऱ्या आणि उगाच रेंगाळणाऱ्या बापयांना आपोआप पायबंद बसला होता . तिच्याकडे बघणाऱ्या लोचट नजरा कमी झाल्या होत्या. तिच्याबद्दल काहीसा भक्तिभाव, काहीसं भय निर्माण झालं होतं आणि तिच्या मनात असणारे  भय मात्र खूपच कमी झाले होते. तिच्या अवतीभवतीचा आणि घरातला बायकांचा वावर वाढला होता. तिला सुरक्षित वाटू लागले होते. ती निर्धास्थ आणि निश्चिन्त झाली होती.

ज्याच्यावर तिचा विश्वास होता तो नवरा तिला एकटे टाकून निघून गेला होता पण ज्यावर तिचा कधीच विश्वास नव्हता ती देवीच्या  शिवकळा, तिचा विश्वास नसला तरी, तिच्या मदतीला धावून आली होती .

समाप्त

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments