श्रीमती उज्ज्वला केळकर
वाचताना वेचलेले
☆ अप्रूप पाखरे – 26– रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
[१२१]
फुलांमधून दरवळणारी
प्रकाशातून चांचमणारी
तुझी ही मधुर कुजबूज
तिचे साधे साधे अर्थ
कळतात आता मला
पण
वेदनेतून उमटणारे
मृत्यूमधून गराजणारे
तुझे शब्द … गूढ… गहिरे… गहन
ते वाचायला शिकव ना मला
[१२२]
पाय हरवून बसलेले
हे उंच उंच सुळके
शाईचा डाग बनून गोठलेले
हे विशाल वृक्ष
रुणझुणणार्या काळोखाच्या
अंधुक पडद्याआडून
किती अद्भूत दिसतय हे सारं
सकाळ होईपर्यंत
पाहीन मी वाट
कारण
गरजणार्या लख्ख प्रकाशात
दर्शन घ्यायचय मला
तुझ्या या नगराचं
[१२३]
आकाशातले तारे
खुडण्यासाठी
हात लांबवणारी
छोटी… भोळी पोरं
तशा या टेकड्या….
[१२४]
अर्धवट जागं होऊन
कुणा निरागस बाळानं
पहावं आईला
पहाटेच्या धूसर उजेडात
आणि हसून इवलं
पुन्हा झोपून जावं
तसं पाहिलाय मी तुला…..
मूळ रचना – स्व. रविंद्रनाथ टैगोर
मराठी अनुवाद – रेणू देशपांडे (माधुरी द्रवीड)
प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर
176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈