सौ कुंदा कुलकर्णी
मनमंजुषेतून
☆ मी रिटायर होते… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ☆
न स्त्री-स्वातंत्र्यमर्हति
एकविसाव्या शतकातही स्त्रिया हेच भोगती
पण मी मात्र ठरवलं—
आपण रिटायर व्हायचंच (1)
सासुबाई म्हणाल्या, काय हा अगोचरपणा,
नात सून आली तरी ताठ त्यांचा कणा
तू सून माझी झालीस आता “सासू”
रिटायरपणाचं तुझ्या येतंय मला हासू (2)
दीर जाऊ म्हणाले दिवाळी तर होऊ दे
फराळ तुमचा असतो खमंग
स्तुतीने त्यांच्या भुलले नाही
साऱ्याचाच मला आला आहे उबग (3)
नणंद म्हणाली “थांब ग वहिनी “
तुझ्याविना सुने आहे माहेर
पेलवत नाहीत बाई आता
तिचे शालजोडीतले आहेर (4)
भाचा भाची म्हणाले “मामी
येतेस नेहमी कामी धामी “
नका देवू उसना सन्मान
निर्णय पक्का उघडा कान (5)
लेक आली, जावई म्हणाले
तुमच्या हातची चवच आगळी
पाऊल थोsडस्स अडखळलं
दारात उभी पाहून सगळी (6)
मुलगा आला सून म्हणाली
काय चुकलं ते तर सांगा
नका करू घाई फार
थोडे दिवस आणखी थांबा (7)
हयांना देखील बधले नाही,
मागे वळून पाहिले नाही
सर्वांसाठी झिजले आजवर
अंगाची होते लाही लाही (8)
धापा टाकत “नात” आली
“आजी” म्हणून मिठी मारली
सोडून मला गेलीस तर
शपथ तुला आहे म्हणाली (9)
खाणार नाही पिणार नाही
गोष्टींवाचून झोपणार नाही
आळीमिळी गुपचिळी
मुळीसुद्धा बोलणार नाही (10)
शहाणी माझी आजी
मला म्हणते हट्टी
शपथ नाही सुटली तर
तुझी माझी कायम कट्टी (11)
निरागस अश्रूंनी तिच्या
मन माझं विरघळलं
पापे घेता “शप्पथ सुटली”
नकळत पाऊल मागे वळलं (12)
© सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये
क्यू 17, मौर्य विहार, सहजानंद सोसायटी जवळ कोथरूड पुणे
मो. 9527460290
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈