श्रीमती उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ नारायणी नमोsस्तुते – भाग ३ (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर 

(मागील भागात आपण पहिलं– साड्यांच्या व्यवस्थित घड्या करून दुसर्‍या दिवशी पुन्हा गिर्‍हाईकांना दाखवण्यासाठी नीट ठेवून द्याव्या लागत. या कामाला बर्‍याचदा वेळ लागायचा. मग रात्री सेल्समन तिथेच झोपत आता इथून पुढे)

एका रात्री नारायणभाऊला तिथे काही विचित्र अनुभव आला. मग त्याने तिथली नोकरी सोडून दिली. त्यानंतरचे काही दिवस खूप वाईट गेले. घर चालवण्यासाठी नारायणभाऊने किती किती, काय काय केलं! आता हळू हळू आम्ही तिघी बहिणीदेखील छोटी छोटी काम करू लागलो होतो. नारायणभाऊने आम्हा बहिणींना आई-वडलांची कमतरता कधीच भासू दिली नाही. पण हे करताना त्याने स्वत:वर खूपच अन्याय केला. विवाहाची वेळ निघून गेली, की खूप कठीण होऊन जातं. आता नाही, तरी थोडं आणखी वय झालं,  की सगळं आयुष्य एकट्याने काढायचं म्हणजे घनदाट जंगलात एकट्याने रात्र काढण्यासारखं होऊन जातं.’

`एकट्याने का?  आपण तिघी तिघी बहिणी आहात की!’

`आम्ही आहोत खर्‍या, पण लग्नानंतर कोणतीही बहीण भावासाठी काय करू शकणार? त्यावर आणि पुन्हा आम्ही तिघी बिना आई-बापाच्या. मी निदान छोटीशी का होईना, नोकरी करते. नमिता आणि नलिनी तर पूर्णपणे हाउसवाईफ आहेत. दोघींची जॉर्इंट फॅमिली. बारा-चौदा लोकांचं कुटुंब. दोघींच्या घरात भांडी घासायलासुद्धा बाई नाही. सर्व कामं दोघींच्याच शिरावर. दिवसभर खपत असतात,  तरी घरातले लोक पैज लावून जसे त्यांना टोचायला तयार असतात. कारण का,  तर त्यांच्या अपेक्षेप्रमाणे त्यांना हुंडा मिळाला नाही. तरीही आम्ही लग्न ठरताना सुरुवातीलाच आमच्या आर्थिक स्थितीची पूर्ण कल्पना त्यांना दिली होती. नारायणभाऊच्या पासबुकात जे जमा असायचं, ते सगळं आम्हा बहिणींच्या राखी-दिवाळीत खर्च होऊन जायचं. किती तरी वर्षं असंच चाललय. अशा परिस्थितीत त्यांना स्वत:बद्दल विचार करायलाच वेळ मिळाला नाही. आम्हा बहिणींच्या सासरी तो जेव्हा येतो,  तेव्हा काही ना काही घेऊन येतो आणि परत जाताना,  टोमण्यांमुळे चाळणी झालेलं मन,  अश्रूंनी भिजलेले डोळे आणि दु:खाच्या ढगांनी जड झालेलं काळीज घेऊन परत जातो.’

`आपल्या चुलत बहिणीच्या विवाहाला नारायणभाऊ येणार नाहीत?’ मी जसा काही लांबच लांब चाललेल्या ट्रॅजिडी सीनला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न करतो.

`येणार का नाहीत? काही दिवसांसाठीच तो कलकत्त्याला गेलाय. फॅशन डिझाईनिंगचं ट्रेनिंग तिथे आहे. पण या विवाहात तो जास्त इन्व्हॉल्व होणार नाही…. आता आपल्यापासून काय लपवायचं काका! या विवाहाची सगळी जबाबादारी आम्ही तिघी बहिणींनी उचलायची ठरवलीय. नारायणभाऊ केवळ उपस्थित राहील. करणार काहीच नाही. पैशानेही नाही आणि कष्टानेही नाही. पैसे तर आम्ही आपल्यालाही खर्च करायला लावणार नाही, पण बाकी सगळ्याबाबतीत आपण असं समजा,  की आपल्या मुलीचंच लग्न आहे आणि तिच्या साखरपुड्यात आपण यायलाच हवं. येणार नं काका?’  खूप काळ पसरलेल्या गडद धुक्यानंतर जसा काही नहुषाच्या चेहर्‍यावर सूर्य उगवला होता.

क्रमशः….

मूळ हिंदी  कथा – ‘नारायणी नमोsस्तुते’  मूळ लेखक – भगवान वैद्य `प्रखर’

अनुवाद –  श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments