श्री सुहास रघुनाथ पंडित
२१ डिसेम्बर – संपादकीय
कै. नरहर रघुनाथ फाटक
विचार प्रवाहाविरूद्ध विचार करणारे व स्वतंत्र प्रज्ञा असणारे ,मराठी संत साहित्याचे समीक्षक,पत्रकार,इतिहास संशोधक,चरित्र लेखक अशा विविध भूमिका बजावून मराठी साहित्यात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणारे न.र.फाटक यांचा आज स्मृतीदिन.(1979)
त्यांचे प्राथमिक शिक्षण भोर,अबू,ग्वाल्हेर,लाहोर असे अनेक ठिकाणी झाले.तत्वज्ञान आणि अर्थशास्त्र या विषयात त्यांनी अलाहाबाद विद्यापीठाची पदवी प्राप्त केली.शिवाय चित्रकल व संगीत या कलाही त्यांना अवगत होत्या.सुरूवातीला त्यांनी सहाय्यक शिक्षक या पदावर काम केले.नंतर विविधज्ञानविस्तार,इंदुप्रकाश, नवाकाळ,इ.
नियतकालिकांत संपादकीय विभागात काम केले.पुढे एस्.एन्.डी.टी. व रूईया काॅलेज मध्ये मराठीचे प्राध्यापक म्हणून काम केले.
त्यांनी अनेक संशोधनात्मक व चरित्रात्मक पुस्तकांचे लेखन केले आहे.अर्वाचीन महाराष्ट्रातील सहा थोर पुरूष,श्री एकनाथ वाड्मय व कार्य,कलावती कादंबरी,थोरांच्या आठवणी,पानिपतचा संग्राम भाग 1 व 2,भारतीय राष्ट्रवादाचा विकास ही त्यापैकी काही पुस्तके.न्यायमूर्ती म.गो.रानडे यांच्या चरित्राचे लेखन करून त्यानी चरित्र लेखनाला प्रारंभ केला.त्यानंतर कृ.प्र.खाडीलकर,यशवंतराव होळकर,लोकमान्य,श्री समर्थ रामदास, इ.चरित्रे लिहीली.त्यांनी गोपाळ कृष्ण गोखले यांच्या ‘आदर्श भारत सेवक’ या लिहीलेल्या चरित्राला साहित्य अकादमीचा 1970 चा पुरस्कार मिळाला आहे.
कै.फाटक यांचा अनेक संस्थांशी संबंध आलेला आहे.मराठी पत्रकार संघाचे ते पहिले अध्यक्ष होते.भारत इतिहास संशोधन मंडळ ,प्राज्ञ पाठशाला मंडळ,मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय,मुंबई मराठी साहित्य संघ,महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ अशा विविध ठिकाणी त्यांनी सदस्य किंवा पदाधिकारी या नात्याने काम केले आहे.
त्यांच्या या कार्य कर्तृत्वाला आज स्मृतीदिनी शतशः प्रणाम!
☆☆☆☆☆
श्री सुहास रघुनाथ पंडित
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ: विकिपीडिया, मराठी विश्वकोश.
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈