श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

⭐ शि ट्टी ! ⭐ श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

“एक…. दोन…. तीन…. चार….

चार…. तीन…. दोन…. एक….”

लहानपणी शाळेत शारीरिक शिक्षणाच्या तासाला, एक, दोन, तीन, चार या ऑर्डरवर आणि नंतर गुरुजींनी त्याच ठेक्यात वाजवलेल्या शिट्टीच्या तालावर, माझ्या पिढीतल्या अनेकांना कवायत केल्याचे आठवत असेल !  एवढ्या लहानपणी शिट्टीशी येणारा आपला (निदान माझा तरी) तो तसा पहिलाच प्रसंग असावा ! गुरुजींच्या गळ्यात, रंगीत दोऱ्यात अडकवलेल्या, स्टीलच्या चकचकित शिट्टीचा आवाज अजूनही माझ्या कानात घुमतो आहे ! त्या काळी, ती इतक्या जोरात कशी वाजते, ह्याचेच अप्रूप वाटायचे ! पण या शिट्टीच्या आवाजाचे वर्णन आपल्या मराठी साहित्यात, फु s s s र s s s, फु s s s र s s s  असे करण्याचा पहिला मानकरी किंवा पहिली मानकरीण (शिट्टी हा स्त्री लिंगी शब्द असल्यामुळे आणि तिचा स्त्रियांशी जवळचा संबंध येतो हे नंतर वयात आल्यावर कळल्यामुळे, ही शंका मनांत डोकावली, इतकंच !) कोण असावा अथवा असावी, हा माझ्या मते संशोधनाचा विषय होईल !कारण बशीतून चहा पितांना काही जणांच्या तोंडातून येणाऱ्या आवाजाचे वर्णन सुद्धा अनेक विद्वान लेखक, लेखिकांनी फु s s s र s s s, फु s s s र s s s असेच केल्याचे आढळते ! आपली मराठी भाषा एवढी समृद्ध असतांना, दोन टोकाच्या, दोन वेगवेगळ्या आवाजांसाठी एकाच प्रकारची शब्द रचना वाचतांना, माझ्या कानांत नेहमी वेगळीच शिट्टी वाजते, एव्हढं मात्र खरं ! असो !

पुढे शालेय जीवन संपता संपता, कॉलेज प्रवेशाच्या आधी माझे बरेचसे मित्र वेग वेगळ्या प्रकारच्या शिट्ट्या, तोंडाने वाजवण्यात पारंगत झाले होते ! त्याचा काही मित्रांना कॉलेजच्या उर्वरित वर्षात चांगलाच उपयोग झाला ! कारण त्यांनी घातलेल्या शिट्टीरुपी कुहू कुहूला, त्यांच्या त्यांच्या मैनांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे, भविष्यात त्या पैकी काहींची लग्ने आपापल्या मैनांशी झाली ! पुढे हेच यशस्वी कोकीळ संसारात पडल्यावर, आपापल्या मैनांचा “अहो, जरा चार शिट्ट्या झाल्यावर आठवणीने कुकर खालचा गॅस बंद करा !” असा आदेश ऐकायची सवय त्यांना करून घ्यावी लागली, हा भाग निराळा ! पण कॉलेजातील काही उर्वरित कमनशिबी कोकीळ, मैनांना भुलवण्याच्या नादात शिट्ट्या वाजवून, वाजवून आपापल्या तोंडाची नुसतीच वाफ फुकट घालवत राहिले ! काही वात्रट मित्रांच्या म्हणण्यानुसार, त्या सगळ्या मित्रांच्या फुकट गेलेल्या वाफेच्या एकत्रित शक्तीवर, माथेरानला जाणाऱ्या आगगाडीचे छोटे इंजिन नक्कीच धावले असते म्हणे !

इंजिनावरून आठवण झाली. ज्या काळात आम्ही आत्ताच्या “ट्रेनला” आगगाडी म्हणायचो, त्या अठरा वीस डब्याच्या अजगरा सारख्या लांबच लांब मेल किंवा एक्सप्रेसमधून प्रवास करायची बरेच वेळा त्या काळी वेळ आली ! तेंव्हा त्या गाडीचा गार्ड, गाडी सुटतांना जी शिट्टी फुकायचा ती इतकी कर्कश्य असायची की, फलाटावरच्या हजारो लोकांचा गोंगाट भेदून, वीस डबे सोडून असलेल्या इंजिन ड्रायव्हरला बरोब्बर ऐकू येत असे ! मग तो इंजिन ड्रायव्हर सुद्धा ऑल क्लिअरचा हिरवा झेंडा गार्डच्या दिशेला फडकावून, एक दोन दणदणीत इंजिनाच्या शिट्ट्या देवून आगगाडी सुरु करत असे ! गेले ते दिवस उरल्या त्या फक्त आठवणीतल्या अशा शिट्ट्या !

फार फार वर्षांपूर्वी, म्हणजे असं बघा जेंव्हा पोलीस त्यांच्या निळ्या टोपी पासून निळी हाफपॅन्ट अशा गणवेषात होते, तेंव्हा त्यांची ती स्टीलची लांबूडकी शिट्टी नुसती ऐकून चोर एका जागी थिजून जात असत ! एवढी ताकद त्या काळी फक्त त्यांच्या शिट्टीत होती ! पण सध्या गणवेशापासून सारेच ‘खिशाचे गणित’ बदलले असल्यामुळे त्या पूर्वीच्या शिट्टीला सध्याच्या युनिफॉर्ममधे खिसाच नाही, मग ती शिट्टी तरी कशी असेल ? कालाय तस्मै नमः !

एखाद्या कलाकाराची रंगमंचीय कला पिटातल्या प्रेक्षकाला आवडल्यावर, त्या कलाकाराला वन्समोअरसाठी वाजणाऱ्या टाळयांच्या जोडीला, वाजणाऱ्या शिट्यांची जातकुळी फार म्हणजे फारच वेगळी असते मंडळी ! त्या टाळ्या, शिट्या ऐकून एखादा कलाकार प्रेक्षकांची वन्समोअरची हौस पुरवतो सुद्धा, पण त्या साऱ्या गदारोळात खऱ्या रसिक प्रेक्षकांची फारच गोची होऊन जाते ! रंगमंचीय कला अविष्काराला अशी दाद मी एकवेळ समजू शकतो, पण चित्रपटगृहात हिरोच्या एखाद्या डायलॉगवर किंवा हिरोईनच्या नाचावर, तो आवडला म्हणून कानठळ्या बसण्या इतक्या शिट्ट्या वाजवायच प्रयोजन, माझ्या सारख्या रसिक प्रेक्षकाच्या बुद्धीच्या आकलना पलीकडलं आहे !

सांप्रतकाळी समस्त महिला वर्ग, पुरुषांच्या बरोबरीने सर्वच क्षेत्रात यशस्वीपणे बरोबरी करत असतांना, या शिट्टी वाजवायच्या पुरुषांच्या पूर्वी पासून मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात कशा बरे मागे राहतील ? उदाहरणच द्यायच झालं, तर काही भगिनी शिट्टीवर वेगवेगळी गाणी म्हणण्याचे दोन अडीच तासाचे स्वतंत्र कार्यक्रमच सध्या सादर करत आहेत, हे आपल्याला ठाऊक असेलच !

मंडळी, सध्या मी शिट्टीचा जनक कोण ?  याच बरोबर ती शिट्टी पहिल्यांदा कोणी कशी वाजवली व त्याच्या आवाजाचे त्या काळी कोणावर कसे चांगले अथवा वाईट परिणाम झाले या विषयी संशोधन करत आहे ! पुढे मागे ‘शिट्टी’ विषयावरच एखादा प्रबंध लिहून, तो उत्तर प्रदेश मधल्या एखाद्या युनिव्हर्सिटीत सादर करून, डॉक्टरेट पदरात पाडून घ्यायचा विचार माझ्या डोक्यात शिट्टी वाजवून गेलाय एवढं मात्र नक्की !

ता. क. – उत्तर प्रदेशातल्या अनेकांनी “शिट्टी!” याच विषयावर आधीच डॉक्टरेट मिळवल्याचे कळले ! पण मी आशा सोडली नसून, मध्य प्रदेशातील एखाद्या युनिव्हर्सिटीत मी माझी “शिट्टी!” वाजवायचीच, असा निर्धार केला असून, आपल्या “शिट्टी” रुपी शुभेच्छांची या कामी मला नक्कीच मदत होईल !

© श्री प्रमोद वामन वर्तक

३०-११-२०२१

(सिंगापूर) +6594708959

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments