सुश्री दीप्ती कुलकर्णी
कवितेचा उत्सव
☆ वृक्षसंदेश… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी☆
उठ मानवा, शोध घेई रे, मनोमनी तू खरा
निसर्ग राजा, सखा-सोबती, दुजा न कोणी बरा.
शिवार फुलते, धरती नटते, हेमपुष्प जन्मते
वनचर, जलचर, खेचर, पन्नग विश्वची हे गाते.
फळाफुलांनी सुगंधित हा वायुही बोलतो
चराचराच्या तनामनाला स्पर्शुनी तो जातो
वृक्ष तोडुनी, शिकारीतुनी, काय तुला लाभते
उजाड धरती, दूषित प्रांगण, मूकपणे सांगते.
निसर्गाविना अपूर्ण मानव,अक्षय हे नाते
तयासवे रे परीपूर्ण तू, सत्यही साकारते.
वृक्ष लावुनी, तयासी जपुनी, वाढविता रे तुला
अक्षय ठेवा, शुद्ध जलासह, सापडेल रे मुला.
वृक्षा जपसी, कीर्ती पावसी, ताड-माड साक्षीला
वड-जांभुळ, अश्वत्थासह, आम्र येई दिमतीला.
नाजुक वेली, सान रोपटी, ठेवा पुष्पातला
गुंजारव भ्रमरासह येईल, मधुरस चाखायला.
छाया देईल, सौरभ देईल, तरु धरतीवरला
नको हरवू हे, प्रेमळ छत्र नि राख मान आपुला.
वृक्ष वल्ली या महान जगती, शिकवण देती तुला
परोपकारा धन्य मानुनी, मार्गा चल आपुल्या.
मार्गा चल आपुल्या.
© सुश्री दीप्ति कुलकर्णी
कोल्हापूर
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈