श्रीमती उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ नारायणी नमोsस्तुते – भाग ५ (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर 

(मागील भागात आपण पहिलं– एवढ्यात नारायणीकडे लक्ष वेधत नहुषा म्हणाली, `काका अजूनही आपण आपल्या नारायणभाऊंना ओळखलं नाहीत?’ आता इथून पुढे)

नारायणीनं घुंघट काढून पदर खांद्यावर घेतला आणि माझ्या पायावर डोकं  ठेवून मला नमस्कार केला. मी तिचे हात धरून तिला उठवलं आणि दिवाणावर बसवलं. तिच्या डोळ्यातून जसा  अश्रूंचा महापूर उसळला. मी तिच्या या वागण्यामुळे चकितच झालो. माझ्या चेहर्‍यावरील हैराणी पाहून नारायणी सांगू लागली,

`काका, जन्म झाला स्त्रीच्या रुपात,  पण जगावं लागलं,  पुरुषाच्या रुपात. तीन धाकट्या बहिणी आणि मी मोठी. आई-वडलांच्या मृत्यूनंतर मी मुलगी म्हणून जगायचा प्रयत्न केला,  पण प्रत्येक वेळी वाटत गेलं, की कुत्र्यांच्या झुंडीत सापडलेलं मी एक हाडूक आहे. प्रत्येकाला ते हवय. जे काम मिळेल,  ते करणं गरजेचं होतं. मग दिवस असो, की रात्र. या दरम्यान एका दुर्घटनेची शिकार झाले. दुकानात काम करताना, रात्रीच्या वेळी एका लालची कुत्र्याने माझ्यावर झडप घातली. ते चौघे सेल्समन होते. त्यांना मी माझे भाऊ समजत होते. त्यानंतर सात दिवस मी स्वत:ला एका खोलीत कोंडून घेतलं. वाटलं, आपण जहर खावं. बहिणींनाही द्यावं. पण तिघी बहिणींनी जागता पहारा ठेवला होता माझ्यावर. त्यानंतर आम्ही अहमदाबाद सोडून पुण्याला आलो. इथे आल्यावर मी पहिल्या दिवसापासूनच नारायणीचा नारायण बनलो आणि या तिघींचा नारायणभाऊ. काया आणि कंठ नशिबाने पुरुषी दिलाच होता. धीर आणि धीटपणा परिस्थितीने दिला. बहिणींनीही मला साथ दिली. त्यांचं शिक्षण सुरू झालं. त्याच बरोबर त्या छोटी छोटी कामेही करू लागल्या. पुण्यात एका फॅशन डिझाईनरजवळ हेल्पर म्हणून मी काम सुरू केलं. पुढे मी नाईट कॉलेजमध्येही जाऊ लागले. माझ्या कामात नलिनी आणि नमिता आधीपासूनच होत्या. पुढे नहुषादेखील मदतीला आली.

पुढे तिघी बहिणींची लग्नं झाली. माझ्याबाबतीत मी आधीपासूनच ठरवलं होतं, की मी लग्नं करणार नाही. जगाच्या दृष्टीने तर मी पुरुषच होते. नलिनी आणि नमिता मला सतत विवाहाचा आग्रह करत,  पण माझा दृढ निश्चय पाहून त्यांनी मला विचारायचं सोडून दिलं. पण नहुषाने हार मानली नाही. तिने जिद्द धरली. तशीही आम्हा सगळ्या बहिणीत ती सगळ्यात जास्त जिद्दी आहे.  नलिनी आणि नमिताने तिला आतून सपोर्ट दिला. त्यामुळे मला माझा निश्चय बदलावा लागला. पुढचं सगळं आपल्याला माहीतच आहे. ‘

माझा अजूनही विश्वास बसत नव्हता, की नलिनी, नमिता आणि नहुषासाठी योग्य वराच्या शोधात माझ्या कार्यालयात वेळी-अवेळी फोन करणारे,  माझ्या वधु-वर संशोधनाच्या कार्यालयात येऊन अधिकारपूर्वक, रजिस्टरमधून नावं आणि पत्ते शोधणारे नारायणभाऊ आणि ही समोर उभी असलेली नारायणी या दोन्ही व्यक्ती एकच आहेत. मी अतिशय प्रभावित झालो.

`काका, अगदी पहिल्यांदा मी आपल्याला नलिनीच्या संदर्भात भेटले होते, तेव्हा का कुणास ठाऊक, मला वाटलं, आपल्या रुपात मला माझे बाबाच भेटताहेत. आमचे बाबा दिसायलाही खूपसे आपल्यासारखेच होते. उंच, गोरे-गोरे, अगदी मिशासुद्धा आपल्यासारख्याच होत्या. माझ्या तिघी बहिणींच्या लग्नाच्या बाबतीत आपण जे सहकार्य दिलंत आणि मार्गदर्शन केलंत,  ते घरातील कुणी वडीलधारी व्यक्तीच करू शकते. या जगात सैतान खूप आहेत, पण माणसाचीही कमतरता नाही,  हे आपली भेट झाल्यानंतरच मला कळलं. पुढल्या महिन्याच्या बारा तारखेला विवाहाचा मुहूर्त काढलेला आहे. आर्यसमाजी पद्धतीने विवाह होईल. यावेळी मात्र आपल्याला उशीर करून चालणार नाही. कन्यादान आपल्यालाच करायचय. काकींना पण घेऊन या. तसंही नहुषा आपल्याकडे निमंत्रण पत्र घेऊन येईलच.’  इतकं बोलून हात जोडून नारायणी उठून उभी राहिली. नमिता आणि नहुषानेही तिचं अनुकरण केलं.

आम्ही नक्कीच येऊ बेटा,  तुझ्यासारख्या कर्तृत्ववान मुलीचं कन्यादान करताना कुठल्या आई-बापाला अभिमान वाटणार नाही?’  मी बस, इतकंच बोलू शकलो. आणखीही खूप काही बोलावसं वाटत होतं,  पण घशात आवंढा दाटून आला. नारायणीला कसं कळणार,  की ज्यांना स्वत:चं काही आपत्य नाही, जो नि:संतान आहे,  मंगल प्रसंगी ज्याची उपस्थिती अवांछित मानली जाते,  त्या दंपतीसाठी कन्यादानाची संधी मिळणं, ही त्याच्यासाठी केवढी मोठी भेट आहे. नजराणाच जणू. विचार केला होता,  की इथून परतल्यावर पुन्हा आपल्या मॅरेज-ब्युरोच्या कार्यालयात जाऊन उशिरापर्यंर बसावं. पण पावलं भराभरा घराच्या दिशेने वळली. जितक्या लवकर जमेल,  तितक्या लवकर कौसल्येला हे कळवायला हवं, की आपल्याला एकाच वेळी चार-चार मुली मिळाल्या आहेत.

क्रमशः….

मूळ हिंदी  कथा – ‘नारायणी नमोsस्तुते’  मूळ लेखक – भगवान वैद्य `प्रखर’

अनुवाद –  श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments