सुश्री मंजुषा सुनीत मुळे
विविधा
☆ रसिका तुझ्याचसाठी… ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
आज २३ डिसेंबर—
“रसिका तुझ्याचसाठी मी एक गीत गाते —
हृदयात दाटलेली भावांजली वहाते —-”
आपल्या रसिक श्रोत्यांप्रती आणि रसिक वाचकांप्रती जणू कृतज्ञता व्यक्त करत, असे भावपूर्ण काव्य लिहिणारे श्री. गंगाधर महाम्बरे यांचा आज स्मृतिदिन.(३१/१/१९३१ – २३/१२/२००५)
प्रतिभावंत कवी, गीतकार, लेखक, बालसाहित्यकार, आणि याच्या जोडीने, अनुवादक, ग्रंथपाल, कोशकार– असे चतुरस्त्र व्यक्तिमत्व लाभलेले श्री. महाम्बरे. ते कोकणातून पुण्यात आल्यावर पूर्ण वेळ साहित्यक्षेत्रात रममाण होण्याआधी, त्यांनी वृत्तपत्र व्यवसाय सुरु केला होता. आणि नंतर फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये बरीच वर्षे ग्रंथपाल म्हणूनही ते कार्यरत होते.
अर्थात ही त्यांची अगदी सुरुवातीची ओळख. खरी ओळख ” एक बहुरंगी बहुढंगी साहित्य-निर्माते ” हीच.,
त्यांच्या साहित्यनिर्मितीतले वैविध्यही खरोखरच थक्क करणारे. त्यांनी अगदी वेगवेगळ्या विषयांवर पुस्तके लिहिली आहेत. ती अशी —-
१ ) साहित्यविश्वाला समृद्ध करणारे लेखन —
आनंदाचे डोही, मराठी गझल, उत्तुंगतेचा सह्जस्पर्श, उषःकाल ( कवितासंग्रह ), किशोरनामा –
( कथासंग्रह ), रंग जीवनाचे ( कादंबरी ), रसिकेषु ( ललितलेखन ), वॉल्ट डिस्ने चरित्र, व्यक्तिचित्रे, सैगल, चार्ली चॅप्लिन : काळ आणि आज, विस्मरणापलीकडील पु.ल., प्रतिभावंतांच्या सहवासात,
बिजलीचा टाळ ( कादंबरी ), भावगीतकार ज्ञानेश्वर, सापेक्षी समीक्षा, प्रवासातील प्रतिभावंत,
माणसं जनातील-मनातील, मौनांकित ( चरित्र ). त्यांनी नाटककार आणि बंगाली वाङ्मयाचे अभ्यासक असणाऱ्या मामा वरेरकर यांचे चरित्र ‘ एक अविस्मरणीय मामा ‘ नावाने लिहिले आहे. तसेच दादासाहेब फाळके यांचेही चरित्र त्यांनी लिहिलेले आहे.
२ ) अगदी वेगळ्या विषयांवरील पुस्तके —
कोकणातले व्यवसाय व त्यासंबंधीचे मार्गदर्शन, ऑटोरिक्षा ( देखभाल व दुरुस्ती ), महिलांसाठी उद्योगव्यवसाय, लाखमोलाचे उद्योगव्यवसाय, चला जाणून घेऊ या ! अंकशास्त्र. मौलिक मत्स्यव्यवसाय, मेडिकल ट्रान्सक्रिप्शन, मोडी शिका, भगवान गौतम बुद्ध आणि बौद्धधर्म, लघुउद्योगाची लक्ष्मणरेषा, महाराष्ट्रातील समाजसुधारक, विद्यार्थ्यांसाठी औद्योगिक कल्पकता, विद्यार्थ्यांसाठी उद्योगव्यवसाय, शुभंकरोती, — आणि असे बरेच काही मार्गदर्शक लेखन. याखेरीज, २१ व्या शतकाचा मराठी-इंग्रजी शब्दकोश, आणि चित्रपट क्षेत्रातल्या तांत्रिक शब्दांचा कोशही त्यांनी तयार केला होता.
श्री. महाम्बरे यांच्या काव्यनिर्मितीतही– भावगीते, चित्रपट गीते, आणि नाट्यगीते, अशी विपुलता होती.—– कंठातच रुतल्या ताना, तू विसरुनी जा रे–, निळा सावळा नाथ, पाण्यातले पहाता प्रतिबिंब, पूर्वेच्या देवा तुझे सूर्यदेव नाव, बोलून प्रेमबोल तू लाविलास छंद, संधीकाळी या अशा, सावलीस का कळे, तूच खरा आधार- देवा, अशी कित्येक उत्कट भावकाव्ये त्यांनी लिहिलेली आहेत.
धाकटी मेहुणी, युगे युगे मी वाट पहिली, सोबती, सौभाग्यकांक्षिणी, अशा चित्रपटातली त्यांची गीते प्रसिद्ध झाली होती. तसेच, गा भैरवी गा, चाफा बोलेना, तेथे कर माझे जुळती, या नाटकांमधली गीते त्यांनी लिहिलेली होती.
त्यांना मिळालेले पुरस्कार —– “ मौलिक मराठी चित्रगीते “ या रसग्रहणात्मक पुस्तकाला ‘ राष्ट्रपती सुवर्णकमळ ‘ – नॅशनल प्रॉडक्टिव्हिटी काउन्सिल दिल्ली तर्फे १९८३ सालचा ‘ पोएट ऑफ दि इयर ‘ पुरस्कार, – चित्रपट महामंडळाचा ‘ चित्ररत्न पुरस्कार’, – गोमंतक मराठी अकादमीची सन्माननीय फेलोशिप,– म.स.प.चा ना.घ.देशपांडे पुरस्कार ‘, –केंद्र आणि महाराष्ट्र सरकारचे अनेक पुरस्कार. मॉरिशस नभोवाणीवर त्यांच्या मुलाखती प्रसिद्ध झाल्या होत्या, आणि ‘ रसिक तुझ्याचसाठी ‘ या गीताची ध्वनिमुद्रिका अमेरिकन कंपनीनेही प्रसिद्ध केली होती, या विशेष गोष्टी सांगितल्याच पाहिजेत अशा.
श्री. गंगाधर महाम्बरे यांना आजच्या स्मृतिदिनी भावपूर्ण श्रद्धांजली.
आज “ कवितेचा उत्सव “ या सदरात वाचूया श्री. महाम्बरे यांची एक सुंदर काव्यरचना.
© सुश्री मंजुषा सुनीत मुळे
९८२२८४६७६२.
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈