कवितेचा उत्सव
☆ सांगून सर्व झाले… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆
(वृत्त: अनलज्वाला)
सांगून सर्व झाले,झाली शिळी कहाणी
डोळ्यातल्या धुक्यातुन,झरती अजून गाणी !
भरल्यात सर्व जखमा,मिटल्यात शोकगाथा
दंशाविना फणा हा,विरहाविना विराणी !
श्रोते बधीर दर्दी,बेसूर मैफिलीत
मृगजळ मृगास सांगे,वाळूरणी कहाणी !
आभाळ भास कळता,नभ कोसळून आले
पंखांत गोठलेली,ती झेपही इमानी !
यात्रा त्रिखंड झाली,दिसला न देश माझा
संपन्न ही भ्रमंती,उपऱ्याच पावलांनी !
वाटेस दोष कैसा,दोषी दिशा न दाही
संदिग्ध व्यूह होता,आला न भेद ध्यानी !
जखमांवरी फुलावी,ती पालवी नव्याने
बहरास ये,वसंता!रानात पानपानी !
© श्री हरिश्चंद्र कोठावदे
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
सुंदर कविता