सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ

परिचय – सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ

शिक्षण –  मास्टर ऑफ सायन्स 

पती आणि दोन्ही मुलगे इंजिनियर. त्यांनी १९७७ नो्हेंबर ला हेम इले्ट्रॉनिक्स ह्या नावे उद्योग सुरू केला.

त्यांना १९९१ साली पुरस्कार: व्यवसायातील अतिशय प्रतिष्ठीत जी एस पारखे पुरस्कार त्यांच्या एका उपकरणास मिळाला.

स्नेहलता गाडगीळ ना २०१८ साली महिला उद्योजक राज्य परिषदे कडून संजीवनी पुरस्कार त्यांच्या इंजिनिअरिंग मधील योगदान साठी देण्यात आला.

तसेच २०१९ साली लोकमत सखी मंच कडून नवदुर्गा हा पुरस्कार त्यांच्या  इंजिनिअरिंग क्षेत्रात केलेल्या कार्य बद्दल प्रदान करण्यात आला.

स्नेहलता गाडगीळ गेल्या १० वर्षा पासून सांगली मिरज एम आय डी सी च्या डायरेक्टर आहेत .

त्या श्री शिल्प चिंतामणी हौ सोसायटीच्या  डायरेक्टर आहेत.  त्याना नाटकात काम करण्याची आवड आहे. त्यांनी ए डी ए ह्या नाट्य संस्थेतून राज्यं नाट्य स्पर्ध मध्ये भाग घेतला होता. वाचन आणि भरपूर प्रवास करायची ही आवड .

? इंद्रधनुष्य ? 

☆ आजची दुर्गाच…विनीत वर्तक☆ संग्राहिका – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆ 

कधी कधी कर्तृत्वाची उंचीच इतकी असते की सन्मानाचं वजन त्यामुळे वाढते. काहीसा हाच अनुभव २०१८ वर्षीच्या पद्मश्री पुरस्कार विजेत्या सुभासिनी मिस्त्रीमुळे पद्मश्री सन्मानाला आला आहे. सुभासिनी मिस्त्री वय वर्ष ७५, जेव्हा अगदी साध्या साडीत आणि स्लीपर घालून राष्ट्रपती रामनाथ कोविंद ह्यांच्याकडून पद्मश्री पुरस्कार स्वीकारत होत्या, तेव्हा पूर्ण भारतच काय, पूर्ण जग अवाक होऊन बघत होतं. कारण एक स्त्री ठरवलं तर काय करू शकते ह्याचं  मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सुभासिनी मिस्त्री.

अतिशय गरीब कुटुंबात जन्म झालेल्या सुभासिनीचं  लग्न अवघ्या १२ व्या वर्षी झालं. १२ वर्ष संसार आणि ४ मुलं खांद्यावर असताना त्यांच्या नवऱ्याचा मृत्यू झाला. ह्या अकाली मृत्यूला कारण होतं ते म्हणजे वेळेवर न मिळालेले उपचार. अतिशय गरीब आणि पैसे नसल्याने वेळेवर नवऱ्याला हॉस्पिटलमध्ये प्रवेश नाकारला गेला. त्यामुळे त्यांचा मृत्यू ओढवला. त्याच क्षणी सुभासिनी मिस्त्रीनी आपलं आयुष्याचं  ध्येय निश्चित केलं, ते म्हणजे आपण हॉस्पिटल काढायचं— असं हॉस्पिटल जिकडे सगळ्या गरजूंचे उपचार होतील. एकही माणूस उपचार नाही मिळाले म्हणून मृत्युमुखी पडणार नाही. ‘ ज्या गावात आपल्या नवऱ्याला मरण आलं तिकडे मी हॉस्पिटल काढेन ‘ असं त्यांनी निक्षून सांगितलं. लोक त्यांच्यावर हसले, समाजाने त्यांची टिंगल उडवली. एक २३ वर्षाची स्री,  अंगावर ४ मुलं- ज्यात सगळ्यात मोठा ८ वर्षाचा तर लहान ४ वर्षाचा, अशिक्षित आणि गरीब असताना, “ हॉस्पिटल काढायचं तर सोड पण स्वतःच घर नीट करून दाखव “ अशी लोकांनी तिची अवहेलना केली.

हरेल तर ती भारतीय स्री कुठली…. लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत सुभासिनी मिस्त्रीनी आपल्या लक्षाकडे वाटचाल सुरु केली. प्रचंड प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी लोकांच्या घरी काम करायला सुरवात केली. ५ लोकांच्या घरी धुण्याभांड्याची कामं  करून त्यांना महिन्याला १०० रुपये मिळायला लागले. आपल्या मुलाला त्यांनी अनाथाश्रमात ठेवलं आणि बाकीच्यांची जबाबदारी घेत भाजी विकायचा व्यवसाय सुरु केला. त्यांनी बँकेत आपलं खातं सुरु केलं. आपल्या मुलांची शिक्षणं  आणि खर्च करून जे काही पैसे वाचले ते त्या बँकेत बचत करत गेल्या. तब्बल २० वर्ष हे प्रामाणिकपणे करत राहिल्या. 

१९९२ साल उजाडलं . सुभासिनी मिस्त्री यांनी हन्सपुकुर ह्या गावात १०,००० रुपयांना जमीन खरेदी केली. हे तेच गाव होतं जिकडे त्यांच्या नवऱ्याचा मृत्यू झाला होता. २० वर्षात बरचं पाणी पुलाखालून वाहून गेलं होतं. त्यांच्या सगळ्यात लहान मुलाने आईच स्वप्न पूर्ण करण्याचं निश्चित केलं होतं. त्यासाठी आपल्या मेहनतीच्या जोरावर त्याने कोलकत्ता मेडिकल कॉलेजमधून डॉक्टरची पदवी मिळवली होती. जी लोकं २० वर्षापूर्वी तिच्या स्वप्नावर हसली होती, त्याच गावातील लोकांना आपण ही जमीन हॉस्पिटलसाठी दान देत आहोत हे सांगताना गावकऱ्यांनी ह्या हॉस्पिटलच्या उभारणीसाठी आपलं योगदान द्यावं, असं आवाहन त्यांनी गावातील लोकांना केलं. आपल्याच लोकांसाठी ह्याचा फायदा होईल हे बघून गावातील लोकं येत गेले आणि कारवा बनता गया. पुढील २-३ वर्षात ह्यूमॅनिटी हॉस्पिटल ने २५० लोकांना वैद्यकीय मदत दिली होती. ही सगळी मदत एकही रुपया न घेता तिथल्या डॉक्टरांनी केली होती. ज्यात सुभासिनी मिस्त्री ह्यांचा डॉक्टर मुलगा अजय मिस्त्री ह्यांचा समावेश होता.

ह्यूमॅनिटी हॉस्पिटल हे नाव आजूबाजूच्या गावात पसरलं. त्यांच्या कार्यात खारीचा वाटा उचलण्यासाठी अनेक लोक आणि संस्था पुढे आल्या. एका वर्षाच्या आत ह्यूमॅनिटी हॉस्पिटल ट्रस्टकडे १० पट पैसा जमा झाला, जो हॉस्पिटल उभारणीच्या पहिल्या टप्प्यात गरजेचा होता. आज हे हॉस्पिटल पूर्णतः अद्ययावत असून ह्यात ऑपरेशन थिएटर, सोनोग्राफी, एक्स रे अश्या, तसेच इतर विविध उपकरणांनी सुसज्ज आहे. ह्या हॉस्पिटलचं  एक युनिट त्यांनी प्रथारप्रतिमा, सुंदरबन इकडे सुरु केलं. ज्याचा उद्देश प्रत्येक माणसाला वैद्यकीय सेवा देणं हाच आहे.

अशिक्षित, गरीब आणि वयाच्या ऐन उमेदीच्या काळात ४ मुलांची आई असून पण समाजातील प्रत्येकाला वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील एक एक पैसा वाचवून ह्यूमॅनिटी हॉस्पिटलचं स्वप्न बघून ते प्रत्यक्षात उतरवणं, हे शब्दात व्यक्त करता येणार नाही इतकं मोठं काम त्यांनी केलं. भारताचा ४ था सगळ्यात मोठा नागरी सन्मान पद्मश्री मिळाल्यावर त्यांचे शब्द होते—

“I am very happy to get the award, but I would like to request all hospitals in the world, please don’t refuse a patient who needs immediate medical attention. My husband died because he was refused admission and I don’t want anyone else to die in a similar way.”

पद्मश्री पुरस्कार स्वीकारताना सुद्धा अगदी साध्या वेशात आणि स्लिपर वर सुभासिनी मिस्त्री राष्ट्रपती भवनात गेल्या होत्या. पद्मश्री पुरस्कार मिळाल्यावर पण गर्वाचा एक लवलेश सुभासिनी मिस्त्री ह्यांच्या बोलण्यात नव्हता. त्यांच्या मते माझ्या कामाचा पुरस्कार मला तेव्हाच मिळाला जेव्हा आमच्या हॉस्पिटलमधून पहिला रुग्ण बरा होऊन घरी गेला. तेव्हा माझं स्वप्न पूर्ण झालं. 

सुभासिनी मिस्त्री ह्यांना पद्मश्री देऊन सरकारने त्यांचा गौरव नाही केला– तर त्या सन्मानाची शान वाढवली आहे. गरीब, अशिक्षित, उमेदीच्या काळात विधवा होऊन ४ मुलांची जबाबदारी वयाच्या २३ वर्षी असणारी एक स्त्री एक स्वप्न बघते की आपण हॉस्पिटल काढायचं, आणि ह्या समाजात एकाही व्यक्तीचा मृत्यू हा वैद्यकीय मदतीशिवाय होता कामा नये– ते पूर्ण करण्यासाठी आपल्या आयुष्याची सगळी पुंजी त्यांनी हॉस्पिटल काढण्यासाठी लावून नुसतं हॉस्पिटल काढून न थांबता आपल्या मुलाला डॉक्टर करून समाजाच्या सेवेसाठी रात्रंदिवस कार्यरत राहण्याचे संस्कार त्यांनी केले. स्त्रीने ठरवलं तर तिला काहीच अशक्य नाही, आणि कोणाच्या आधाराशिवाय ती आपली स्वप्नं  पूर्ण करू शकते हा आत्मविश्वास भारतात आणि जगातील सगळ्याच स्त्रियांना आपल्या विनम्र वागणुकीतून देणाऱ्या दुर्गाशक्ती पद्मश्री सुभासिनी मिस्त्री ह्यांना माझा दंडवत. त्यांना माझा कडक सॅल्यूट. 

जय हिंद!!!  

आजची दुर्गाच —–

— शब्दांकन (विनीत वर्तक) 

संग्राहिका – सुश्री स्नेहलता गाडगीळ

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments