सौ.शशी.नाडकर्णी-नाईक
पुस्तकांवर बोलू काही
☆ “लिंकन ऑन लीडरशिप” – अनुवाद गौरी गाडेकर ☆ परिचय – सौ.शशी.नाडकर्णी-नाईक ☆
पुस्तकाचे नाव: लिंकन ऑन लीडरशिप
मूळ लेखक : डॉनल्ड टी. फिलिप्स
मराठी अनुवाद : सौ गौरी गाडेकर
प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे
पृष्ठे :160
किंमत :रु.220/-फक्त
सौ गौरी गाडेकर
‘लिंकन ऑन लीडरशिप’ हे पुस्तक डॉनल्ड टी.फिलिप्स यांचे असून त्याचा मराठी अनुवाद सौ. गौरी गाडेकर यांनी आपल्या मराठी बांधवांसाठी त्यांच्या सोप्या, सुटसुटीत, मनोरंजक भाषेत केलेला आहे.
हल्लीच्या पिढीला काय वाचावं हा मोठा प्रश्न. म्हणून असं नक्की म्हणावसं वाटतं की गाडेकरांचं हे सोप्या ,सुटसुटीत मराठी भाषेतील पुस्तक म्हणजे मेजवानीच आहे.
ह्या पुस्तकाचा विषय खूप उपयोगी, महत्वाचा पण किचकट आहे. ‘खडतर काळासाठी एक्झिक्यूटिव्ह डावपेच ‘ म्हणजे मनोरंजनासाठी वाचण्यासारखे हे पुस्तक आहे का?–असे कोणालाही वाटेल. पण गाडेकरांनी त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने इतका छान अनुवाद केलेला
आहे ! एकदा हे पुस्तक वाचायला घेतले की पुढे पुढे वाचतच रहावेसे वाटते. ज्याप्रमाणे लहान मुलांना हसत खेळत गणित, भाषा, त्याचप्रमाणे ह्या पुस्तकाचा अनुवाद वाचताना वाटते. आणि म्हणूनच लिंकन ह्यांची तत्वे आपल्याला वाचताना पटतात. कंटाळवाणे होत नाही.
हे पुस्तक म्हणजे 1860 च्या काळातले ‘ एक्झिक्यूटिव्ह डावपेच ‘ असले, तरी आजच्या काळात पण ते तितकेच उपयोगी,मार्गदर्शक आहेत.
लिंकन ह्यांचा नेतृत्व हा गुण खूपच वाखाणण्यासारखा होता. 1861 मध्ये त्यांचा शपथविधी झाला होता. बिघडलेल्या परिस्थितीत अल्पसंख्यांकांच्या लोकप्रिय मतांनी निवडून आलेल्या लिंकनना, नेतृत्वाचा अनुभव नसलेला, अडाणी, खेडवळ वकील, असे त्यांचे सल्लागारच समजत होते. तेच लिंकन पुढे आदरणीय, पूज्य राष्ट्राध्यक्ष कसे बनले, हेच ह्या पुस्तकात सांगितले आहे. एखादे राज्य, संस्था चालवायला आजच्या पिढीला हे मार्गदर्शक ठरणार आहे. सर्वाना प्रेरणादायक आहे.
वैयक्तिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही बाबतीत लिंकन आपल्या हाताखालच्या माणसांवर विश्वास दाखवायचे. कोण, किती, कशात प्रवीण आहे, कोणाचीआपल्या कामावर किती निष्ठा आहे, कोण किती कार्यक्षम आहे, हे ओळखून त्याच्यावर जबाबदारी टाकत. त्यांनी ती पूर्ण केली तर त्यांची वाहवा, योग्य मोबदला देत आणि जर तसे केले नाही तर योग्य वेळ बघून त्यांना पदावरून दूर करीत. कारण लिंकनना हाताखालची माणसे आणि राष्ट्र दोन्ही गोष्टी सांभाळायच्या होत्या. त्यांना यशस्वीरित्या नेतृत्व करायचे होते. आपल्या बरोबरच सगळ्यांना पुढे घेऊन जायचे होते आणि ते पण त्यांची मने जिंकूनच. आपली मते कोणावर लादायला त्यांना आवडत नसे. ती मते त्यांना पटवून देण्यावर त्यांचा भर होता. तसेच समोरच्याच्या चुका त्याला दर्शवून अपमान करण्यापेक्षा, छोट्या उदाहरणाने, चुटक्यांनी चूक त्याच्या निदर्शनास आणीत. हुकूम सोडण्यापेक्षा विनंती करण्याचे मोल लिंकन जाणून होते.
मानवाच्या स्वभावाची उपजत जाण नसेल तर त्या विषयाचा अभ्यास केला पाहिजे. कर्मचारी ही संस्थेची मालमत्ता असते. त्यांची मते, समस्या जाणून, त्याच्यावर थोडा वेळ, पैसा, खर्च केला पाहिजे. यशस्वी स्नेहसंबंध निर्माण केले पाहिजेत असं त्यांचं म्हणणं– ‘दुभंगलेल्या पायावर घर कधीच उभे राहू शकत नाही. तसेच प्रामाणिकपणा, सचोटी नसेल तर संस्थेची इमारत कोसळू शकते.’ असे त्यांचे मत होते.
असे नेतृत्वाला गरजेचे आणि रोजच्या दिनक्रमाला पदोपदी उपयोगी पडणारे लिंकन यांचे मार्गदर्शक गुण या पुस्तकात वाचायला मिळतात.
अशीच बोधप्रद,मनोरंजक पुस्तके, अनुवाद करून गौरी गाडेकरांनी आमच्यापर्यंत पोचवावीत.
ह्याच आमच्याकडून त्यांना शुभेच्छा.
– सौ. शशी नाईक-नाडकर्णी
फोन नं. 8425933533
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈