सौ. गौरी सुभाष गाडेकर
जीवनरंग
☆ सोनं -भाग तिसरा ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆
(सुमाने विचारल्यावर, मावशीनी तिला, आपण मुलींसाठी सोनं कसं जमा केलं, ते सांगितलं ….)
“पण काका तुमच्याकडे अख्खा पगार द्यायचे ना? हे तर मला थोडेच पैसे देतात.”
“हरकत नाही. थोडे जास्त मागून घे. आणि खर्च कुठे कमी करता येईल, पैसे कुठे वाचवता येतील, ते बघ. वाटल्यास त्याला सोन्याचं सांगू नकोस. नाहीतर तो तुला नेमकेच पैसे द्यायला लागेल.”
सुमाने पैसे जमवायला सुरुवात केली. मग मावशीच तिला सोनाराकडे घेऊन गेल्या. सुमाने थोडं सोनं विकत घेतलं.
हळूहळू सोनं साठत गेलं, तसतसा सुमाने एकेक दागिना बनवायला सुरुवात केली.
कनक हळूहळू मोठी होत होती. कपड्यांवरचा खर्च कमी करावा,म्हणून सुमा तिला मोठ्ठा फ्रॉक शिवायची. सुरुवातीला तो ढगळ वाटायचा. पण सात -आठ महिन्यांत बरोबर मापाचा व्हायचा. आणखी आठ-दहा महिन्यांनी तोकडा व्हायला लागला, तरी फॅशन म्हणून सुमा चालवून घ्यायची. एका वेळी फारफार तर तीन फ्रॉक असायचे कनकचे. मग वाढदिवसाला, दिवाळीला नवीन फ्रॉक न घेता, वाचलेल्या पैशाचं ती सोनं घ्यायची.
कनकला आंबे खूप आवडायचे. पण त्यात पैसे घालून ते तात्पुरतं सुख मिळवण्यापेक्षा आंब्याच्या रंगाचे दागिने घेतले, तर ते कायमचे आपल्याकडे राहतात, असा विचार करून सुमा आठवड्याला एक आंबा आणायची. त्यातल्या दोन लहान फोडी शरदला देऊन उरलेला आंबा कनकला द्यायची. स्वतः आंबा उष्टवायचीही नाही. या स्वार्थत्यागाची नशा आंबा खाल्ल्याच्या समाधानापेक्षा कितीतरी जास्त होती.
आपण कनकला मनसोक्त आंबे खायला देत नाही, म्हणून मध्येमध्ये सुमाला अपराधी वाटायचं. पण मग ती मनातल्या मनात म्हणायची,’हे बघ, बाबी.आता तुला कळत नाही. पण मोठी झाल्यावर तूच म्हणशील – आई, तू बरोबर केलंस. तुझ्यामुळेच मला सासरी प्रतिष्ठा मिळतेय.’
पुढे कनक शाळेत जायला लागली.
एकदा शेजारच्या घरातला वाढदिवस बघून तिलाही मोह झाला.
“आई, माझाही वाढदिवस करूया ना. माझ्या मैत्रिणींना बोलवूया.”
“नको गं बाई. उगीच नसता खर्च.”
मग कनक गप्पच बसली.
पोर तशी समंजस होती. आपल्या आईकडे जास्त पैसे नसतात, म्हणून ती फारशा मैत्रिणीही जोडायची नाही. उगीच कोणी वाढदिवसाला बोलवणार, त्यांना भेटवस्तू द्यावी लागणार वगैरे.
आपला अभ्यास ती मन लावून करायची. पहिला नंबर असायचा नेहमी. त्यामुळे स्कॉलरशिप मिळायची. पण त्याचंही रूपांतर सोन्यातच व्हायचं.
क्रमशः….
पोर तशी समंजस होती. आपल्या आईकडे जास्त पैसे नसतात, म्हणून ती फारशा मैत्रिणीही जोडायची नाही
© सौ. गौरी सुभाष गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈