सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? मनमंजुषेतून ?

☆ माझी सेवानिवृत्ती की साठीशांत भाग पहिला… बीना ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

नोकरी नसणारी मी कशातून निवृत्ती घेणार आहे असा प्रश्न पडला नं ! पण तुम्हीच विचार करा, नोकरी व्यतिरिक्तही आपण नात्यातील, समाजातील कितीतरी जणांची वैचारिक ताबेदारी करत असतो. 

‘My Life, My Rules’ हा फंडा उशिरा कळला. आणि साठी पूर्ण होतेय, तेंव्हा निवृत्तीचे विचार घोळायला लागले. कशा कशातून निवृत्ती बरं?—-

सगळ्यात पहिली निवृत्ती वैचारिक ताबेदारीतून. विचार मांडणारा कितीही महान असला तरीही त्याचा विचार मनाला रुचला, प्रकृतीला पचला, प्रवृत्तीला झेपला तर आणि तरच स्वीकारायचा. अन्यथा ‘Sorry Boss’ 

आपल्या आजूबाजूचे लोक, मीडिया ‘ह्या वयात अमुक खा, त्या वयात तमुक होतं’, असं सांगायला लागले, की मी माझ्या मनाला ‘Cancel, Cancel, Cancel’– ‘इदम् न मम’- ‘हे माझं नाही, माझ्यासाठी नाही’ असा संदेश ठळकपणे पाठवत रहाते. कितीतरी ८०-९० वर्षाची माणसं fit n fine असतातच की. मी त्यांच्याकडे बघते. 

बरेच जण आपला हेतू साध्य करण्यासाठी खोटी कारणं दाखवून emotional blackmail करतात. आता अशी माणसं ओळखू येऊ लागली आहेत. त्यांच्यापासून जरा लांब. दुसऱ्यासाठी निर्णय घेऊन स्वतःवर कलंक घेणं बंद. 

आपल्या कपड्यांवरून, sophisticated वागणुकीवरून कोणी जज करू लागलं तर समजावण्यात वेळ घालवत बसायचं नाही आणि आपले कपडे, वागणंही बदलायचंं नाही. ठसठशीत कुंकू आणि ५-१० तोळ्याचं मंगळसूत्र घालणारी बाई पतिव्रता असतेच असं नाही, हे कळण्याएवढा अनुभव आता नक्कीच गाठीशी आहे. 

पुर्वी कोणी नमस्कार केला तर सांगत असे, ‘ निव्वळ वयानी मोठी आहे म्हणुन वाकू नकोस, ज्या दिवशी ‘ नमस्कारासाठी मी योग्य आहे ‘ असं मनापासून पटेल त्या दिवशीच वाक ‘. कारण त्यातला फोलपणा आणि कधी कधी असलेला दांभिकपणा समजायला लागला होता. पण आता कोणी कशाही भावनेनी वाकलं तरी मनापासून शुभाशीर्वाद देते. वाकणाऱ्याची भावना काही का असेना, माझा ताबा माझ्या भावनेवर. ती स्वच्छ असली म्हणजे झालं.

लोकं नाही नाही ते आरोप करतात, मागे बोलतात, समोर येऊन विचारत नाहीत. अशावेळी पूर्वी स्वतः जाऊन स्पष्टीकरण देत असे. पण ‘ तुमचा खरेपणा अगर चांगुलपणा सिद्ध होण्यापेक्षाही लोकांचं स्वतःच्या मतावर जास्त प्रेम असतं. ते चुकीचं ठरणं त्यांना परवडणारं नसतं ‘, हे कळल्यावर, ‘ Don’t give explanation. Your friends don’t need it and others don’t believe it ‘ हे स्वानुभवाने तंतोतंत पटलं. 

मला गॉसिप कधीच करता आलं नाही. मागे जर काही बोललेच तर ते त्या त्या माणसाच्या समोर बोलू शकेन असंच असतं. त्यामुळे कोणी मला निरस समजतात, ‘ गॉसिप नाही तर काही मजा नाही. तू रिस्क घेत नाहीस ‘, असं म्हणतात. पूर्वी असं ऐकलं की चिडचिड व्हायची, वाईट वाटायचं. पण लवकरच त्यातली मजा कळायला लागली. कोणी चुकून जरी माझ्या नावावर काही बिलं फाडायचा प्रयत्न केला तरी त्याचा तोच तोंडघशी पडतो. 

पूर्वी गैरसमज पोसत बसलेल्या माणसाशी वाद घालायची, कधी त्या माणसाकडेच पाठ फिरवत असे, ग्रुपमधे असले तर ग्रुप सोडून देत असे. नंतर आपला राग थोडा शांत झाल्यावर सारासार विचार करून त्या विषयावर बोलण्याचा प्रयत्न करत असे. आता माझं मत मांडते आणि बाजूला होते. कोणी समजून घ्यायला, चर्चा करायला आलं तर बोलते. मात्र कोणी गैरसमज करून घेतले, ओढवून घेतलं, तर चक्क ‘Carry on’ चा green signal देते. 

‘ मला एक से एक शिव्या येतात ‘ हे गर्वानी बोलणारे पुरुषच नव्हे तर स्त्रियाही बघितल्या, तेव्हा 

‘ तू पुस्तकी बोलतेस ‘ ह्या हिणवणाऱ्या वाक्याचं वैषम्य वाटणं बंद झालं. आता ठासून सांगते,

 ‘ तुझा तुझ्या मातृभाषेतलाही शब्दसंग्रह कमी आहे म्हणून तुला राग व्यक्त करायला शिव्यांच्या    कुबड्या घ्याव्या लागतात ‘. 

क्रमशः,,,,

लेखिका – बीना 

संग्राहिका – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments