सौ. सुनीता पाटणकर
वाचताना वेचलेले
☆ फक्त प्रेम करा! ☆ सुश्री सुनीता पाटणकर ☆
सख्खा भाऊ, सख्खी बहीण, सख्खी मैत्रीण, सख्खे काका, सख्खी काकू, सख्खी मावशी
नेमकं काय असतं हे “सख्ख प्रकरण?” —–
सख्खा म्हणजे आपला सखा.
सखा म्हणजे जवळचा——जवळचा म्हणजे ज्याला आपण कधीही, केव्हाही, काहीही सांगू शकतो.
त्याला आपलं म्हणावं,— त्याला सख्ख म्हणावं !
सध्याच्या कलियुगात, आपण काय करतोय हे सख्ख्या नातेवाईकांच्या कानावर पण पडता कामा नये इतकी खबरदारी घेतली जाते, तिथे सख्ख्य नसते पथ्य असते.
ज्याच्या जवळ आपण मनातलं सारं काही सांगू शकतो, मोठ्ठ्याने हसू शकतो किंवा काळजातलं दुःख सांगून स्फुंदून स्फुंदून रडूही शकतो त्याला सख्ख म्हणावं, त्याला आपलं म्हणावं !
ज्याच्याकडे गेल्यानंतर आपलं स्वागत होणारच असतं
आपल्याला पाहून त्याला हसू येणारच असतं
अपमानाची तर गोष्टच नसते— फोन करून का आला नाहीस अशी तक्रारही नसते !
पंढरपूरला गेल्यावर विठ्ठल म्हणतो का —-
“ या या फार बरं झालं !”
माहूरवरून रेणुका मातेचा, किंवा कोल्हापूरवरून महालक्ष्मीचा, किंवा तिरुपतीहून गिरी बालाजीचा आपल्याला काही Whatsapp call आलेला असतो का ?’ या ‘ म्हणून !
मग आपण का जातो ?— कारण भक्ती असते, शक्ती मिळते आणि संकटमुक्तीची आशा वाटते —-म्हणून ! – हा ही एक प्रकारचा ” आपलेपणाच !”
लौकिक अर्थाने, वस्तूच्या स्वरूपात देव आपल्याला कुठे काय देतो ?
किंवा आपण नेलेले तो काय घेतो ? —काहीच नाही.
रुक्मिणी काय पाठीवरून हात फिरवून म्हणते का,
“ किती जाड झालीस ? कशी आहेस ? सुकलेला दिसतोस, काय झालं ? “
—-नाही म्हणत.
मग दर्शन घेऊन निघतांना वाईट का वाटतं ?– पुन्हा एकदा मागे वळून का पहावं वाटतं ?
प्रेम, माया, आपुलकी, विश्वास, म्हणजेच ” आपलेपणा !”
हा आपलेपणा काय असतो ?—–
आपलेपणा म्हणजे भेटण्याची ओढ— भेटल्यानंतर बोलण्याची ओढ –-
बोलल्यानंतर ऐकण्याची ओढ—- आणि निरोप घेण्याआधीच—
पुन्हा भेटण्याची ओढ !
ज्याला न बोलताही आपलं दुःख कळतं, त्याला आपलं म्हणावं–
आणि चुलत, मावस असलं, तरी सख्ख म्हणावं !
मी त्याचा आहे आणि तो माझा आहे ही भावना दोघांच्याही मनात सारखीच असणे …..
म्हणजे ” आपलेपणा ! “
एक शब्दही न बोलता ज्याला पाहिल्या पाहिल्या डोळे भरून येतात, आणि निःसंकोचपणे गालावरून ओघळू लागतात—
तो आपला असतो — ” तो सख्खा असतो !”
लक्षात ठेवा,
ज्याला दुसऱ्यासाठी “सख्ख” होता येतं, त्यालाच कुणीतरी सख्ख असतं.
बाकी फक्त परिचितांची यादी असते —-
नको असलेल्या माणसांची गर्दी असते !—-
तुम्हीच सांगा—–
फक्त आईची कूस एक आहे म्हणून सख्ख म्हणायचं का ?—-
ज्याला तुमच्या दुःखाची जाणीवच नाही त्याला सख्ख म्हणायचं का ?—-
आता एक काम करा —–
करा यादी तुम्हाला असणाऱ्या सख्ख्या नातेवाईकांची—-
झालं नं मनात धस्स—-
व्हायला लागली ना छातीत धडधड —-
नको वाटतंय न यादी करायला —-
रडू नका, पुसून टाका डोळ्यातलं पाणी—
आणि मानायला लागा सर्वांना आपलं—- कोणी कितीही झिडकारलं तरी—
कारण —–
राग राग आणि तिरस्कार करून काहीच हाती लागत नाही —-
जग फक्त प्रेमानेच जिंकता येतं —–
म्हणून फक्त प्रेम करा !! फक्त प्रेम करा !!.
संग्राहिका : – सौ. सुनीता पाटणकर
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈