सौ.ज्योत्स्ना तानवडे

?  विविधा ?

☆ इतिहासाचार्य – विश्वनाथ काशिनाथ राजवाडे ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

मराठी इतिहासाचे अत्यंत प्रतिभावान, व्यासंगी, दृढनिश्चयी, निष्ठावान इतिहास संशोधक म्हणजे विश्वनाथ काशिनाथ राजवाडे.  महाराष्ट्रातील इतिहास संशोधनाचे ते पहिले पुरस्कर्ते होत. एवढ्या प्रचंड मोठ्या कार्यामुळे ‘इतिहासाचार्य’ म्हणूनच ते ओळखले जातात. महाराष्ट्राच्या विचार विश्वात त्यांचा मोठा दरारा, दबदबा होता.

विविध विषयांवर त्यांनी संशोधन केले. इतिहास, गणित, मानववंशशास्त्र, विज्ञान, भौतिकशास्त्र, संस्कृत, भाषाशास्त्र अशा अनेक विषयांवर त्यांचे प्रभुत्व होते. इतिहास हा भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवनदर्शन असते. त्यासाठी अस्सल कागदपत्रांच्या आधारे आपला इतिहास आपणच लिहिला पाहिजे ही त्यांची स्पष्ट विचारधारा होती. ऐतिहासिक साधनांच्या आणि प्राचीन साहित्याच्या शोधासाठी त्यांनी अखंड भ्रमंती केली. प्राचीन अवशेष आणि जुनी दप्तरे गोळा केली. त्यांच्या अभ्यासातून, संशोधनातून इतिहास लेखन केले. संशोधन, संकलन, संपादन आणि समीक्षा या इतिहासाच्या सर्व टप्प्यात ते शेवटपर्यंत कार्यरत होते. त्यांचे लिखाण नवीन विचारांचे खाद्य पुरवणारे आणि लोकविलक्षण निष्कर्षांचे असायचे. संशोधनाचा अफाट व्यासंग होता.

‘मराठ्यांच्या इतिहासाची साधने’ या ग्रंथाचे बावीस खंड प्रसिद्ध आहेत.ते मराठा साम्राज्याच्या इतिहास अभ्यासासाठी महत्त्वाचे साधन बनलेले आहेत. त्यातील काही खंडांना त्यांनी लिहिलेल्या प्रस्तावना संपादनापेक्षा जास्त गाजल्या.संशोधनात ज्ञानेश्वरीची जुनी प्रत मिळाल्यावर तिला शंभर पानांची प्रस्तावना लिहिली. ‘ज्ञानेश्वरीतील व्याकरण’ हा ग्रंथ लिहिला.

महाराष्ट्राचा वसाहत काळ’, ‘राधा माधव’, ‘विलास चंपू’, ‘महिकावतीची बखर’ इत्यादी लेखन त्यांच्या प्रतिभा संपन्नतेची साक्ष देते.  प्रसिद्ध वा अप्रसिद्ध कोणत्याच ग्रंथसंपदेवर त्यांनी हक्क राखून ठेवले नाहीत. ही त्यांची निस्पृहता अतुलनीय आहे. संपूर्ण वाङमय संशोधनात्मक असून त्यातून बुद्धिवादी व शास्त्रीय पद्धतीचे धडे दिले.

मराठी भाषा व मराठी वाङमय या विषयी त्यांची जिज्ञासुवृत्ती होती. मातृभाषेतच लिहिण्याचा बाणा त्यांनी आयुष्यभर पाळला. ते म्हणत, “ज्ञानार्जनाची हौस असेल तर माझी मराठी भाषा पाश्चिमात्य लोक शिकतील. माझ्या ग्रंथांची पूजा करतील. मी परकीय भाषेत माझा ग्रंथ लिहिणार नाही. मी कीर्तीला हपापलेलो नाही.”   

मराठीतून इतिहास, भाषाशास्त्र, व्युत्पत्ती, व्याकरण इत्यादी बहुविध विषयांवर व्यासंगी संशोधन आणि लेखन केले. भाषा ही संस्कृतीचे प्रतीक आणि भाषेतील शब्द इतिहासाचे विश्वसनीय साधन वाटे.मराठीचे विवेचनात्मक व्याकरण आणि ऐतिहासिक व्याकरण यांच्या त्यांनी व्याख्या केल्या. ऐतिहासिक व्याकरणाच्या सहाय्याने शब्दांची प्राकृत, संस्कृत, वेदकालीन, पूर्ववैदिक, पूर्वपूर्ववैदिक भाषेतील रूपांचे संशोधन केले. समाजशास्त्राचा ही अभ्यास केला.

स्वभाषेच्या, स्वदेशाच्या इतिहासातून स्वाभिमान जागृत करणे आणि सर्वसामान्यांना संघर्षास प्रवृत्त करणे हे त्यांनी आपल्या कामाचे ध्येय ठरवले होते. असे हे कीर्ती, संपत्ती, अधिकार यांचा हा मोह टाळून अखंड ज्ञानोपासना करणारे, प्रचंड व्यासंग असणारे प्रतिभाशाली व्यक्तिमत्व ३१ डिसेंबर १९२६ रोजी निवर्तले.

त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.?

 

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments