सुश्री मंजुषा सुनीत मुळे
संपादकीय व नव वर्ष शुभेच्छा
नववर्षाचा नवदिन आला,
गतसालाचा निरोप घेऊन ।
नवविचार अन नवीन आशा,
साजही मोहक किती हा लेवून —-
आजपासून सुरु होणाऱ्या नव्या वर्षाचे मनापासून स्वागत करतांना, आपल्या ई-अभिव्यक्ती समूहाच्या सर्व समृद्ध लेखक-लेखिका, कवी-कवयित्री, आणि सर्व रसिक वाचकांना नववर्षाच्या खूप मनापासून शुभेच्छा.
१-१-२२.…. किती मस्त, अगदी पाढे असतात तशी लयबद्ध वाटणारी तारीख आहे ना ही.
आज सुरु होणारे हे वर्षही सर्वांसाठी असेच मस्त असू दे. आणि असणारच आहे. गेल्या वर्षभरात सगळे जगच एका अदृश्य दडपणाखाली जगत होते. पण आता परिस्थिती नक्कीच पूर्वपदावर यायला लागली आहे, ही खूप समाधानाची गोष्ट आहे. त्यामुळे आता आपल्या सर्वांच्याच लेखणीला नक्कीच आणखी सुंदर बहर येईल, याची मला आशा— नाही नाही, खात्रीच आहे. आणि त्यासाठीही सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
माझ्यापुरतं सांगायचं, तर गेलं वर्षही माझ्यासाठी खूप आनंददायीच ठरलं होतं, आणि त्याला कारण आहे- “ ई-अभिव्यक्ती “ समूहाशी ‘ संपादक ‘ या नात्याने माझी नव्याने झालेली ओळख. यामुळे माझी अनेक साहित्यप्रेमींशी, आणि आपल्यासारख्या साहित्यिकांशी ओळख झाली आहे– होते आहे. वेगवेगळे विचार मांडणारे- वेगवेगळ्या शैलीतले, आणि वेगवेगळ्या धाटणीचे– वेगवेगळ्या स्वरूपात प्रकट होणारे साहित्य रोज वाचायला मिळते आहे. आणि त्यामुळे आयुष्याला जी एक वेगळीच आणि हवीहवीशी वाटणारी समृद्धी प्राप्त व्हायला लागली आहे, त्याचे सर्व श्रेय आपणा सर्वांना आहे.
आता या वर्षीही आपल्या समूहाला अशाच “ दर्जेदार लिहित्या हातांची “ आणि रसिक वाचकांची अधिकाधिक साथ मिळत राहो, —-
आणि सर्वांना हे नवे वर्ष उत्तम आरोग्याचे, —-
सर्वतोपरी सुख–समृद्धी–शांतीचे जावो, —–
हीच श्री स्वामी समर्थचरणी मनःपूर्वक प्रार्थना.
☆☆☆☆☆
१ जानेवारी २०२२ —
“ किर्लोस्कर “ या लोकप्रिय मराठी मासिकाचे संस्थापक-संपादक श्री. शंकरराव किर्लोस्कर यांचा आज स्मृतिदिन. ( ८/१०/१८९१ – १/१/१९७५ ).
संपादक, लेखक आणि व्यंगचित्रकार म्हणून ‘ शंवाकि ‘ या नावाने ते सुपरिचित होते. शिक्षणानंतर त्यांच्या घरच्याच किर्लोस्कर कारखान्यातील जाहिरात विभाग ते सांभाळू लागले, आणि उद्योगाबरोबरच साहित्याशीही त्यांची चांगलीच गट्टी जमली. आपल्या उत्पादनाची जाहिरात, कारखान्यातील घडामोडी आणि गावातल्या लोकांच्या कथा-कविता अशी सदरे असणारी
“ किर्लोस्कर खबर “ नावाची वृत्तपत्रिका त्यांनी १९२० साली सुरु केली होती. पुढे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सूचनेवरून त्यांनी या पत्रिकेचे “ किर्लोस्कर “ या नावाने नियतकालिक काढण्यास सुरुवात केली. कालांतराने “ स्त्री ‘; ‘ मनोहर ‘ ही त्यांनी संपादित केलेली मासिकेही विशेष लोकप्रिय ठरली.
आत्मप्रभाव, यशस्वी धंद्याचा मार्ग, व्यापाराचे व्याकरण, आणि यांत्रिक यात्रा हे विशेष गाजलेले पुस्तक, अशी त्यांची पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत. “ शंवाकिनी “ या त्यांच्या आत्मकथनपर पुस्तकातून महाराष्ट्रातले पाच दशकांचे सांस्कृतिक जीवन स्पष्टपणे समजून घेता येते. ‘ टाकाच्या फेकी ‘ हे त्याच्या चित्रांचे गाजलेले पुस्तक आहे.
श्री. शंकरराव किर्लोस्कर यांना मनापासून आदरांजली.
सुश्री मंजुषा सुनीत मुळे
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
खूप सुंदर लेख मॅम, नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि किर्लोस्करांना अभिवादन करणारा माहितीपूर्ण लेख ?