सौ राधिका भांडारकर
आत्मसंवाद –भाग एक ☆ सौ राधिका भांडारकर
मी..कोण आहेस तू?.सारखा वळवळत असतोस…
तो…मी कीडा आहे.तुझ्यातच वळवळत असतो ना मी.तू बेचैन होतेस ..तुझ्या मनात काही झरत असतं..कधी पटकन् कागद लेखणी घेतेस..
आणि मग शब्द टपटप गळतात आणि रचनात्मक अशी शब्दकृती तयार होते….
मी..खरंच..तुझं हे डोक्यात वळवळणं माझ्यासाठी एक विषयच असतो..कधी त्रासदायक पण कृतीशीलही..
तो..आज मात्र मी तुला काही प्रश्न विचारणार आहे ..देशील ना उत्तरं..?मुलाखतच समज की…
मी..मुलाखत..??अरे बापरे!!मी काही इतकी महत्वाची व्यक्ती नाहीय् .की माझं या क्षेत्रांत खूप मोठं योगदानही नाही…मुलाखत वगैरे काय??
तो..अग् !मग आत्मसंवाद समज .कारण मला तरी वेगळं अस्तित्व कुठे आहे?मी तुझ्याच संवेदनांशी ,अस्तित्वाशी जुडलेला आहे ना…
मी..बरं विचार. तुला काय विचारायचे ते..
तो..मला एक सांग तुला मूळातच शब्दांशी दोस्ती का करावीशी वाटली..तू अगदी सर्वात प्रथम काय लिहीलस?
मी..सांगते .मी खूप लहान होते .चवथी पाचवीत असेन.माझ्यात थोडा न्युन गंड होता ..सावळ्या रंगाचा. सगळे गोरे आणि मी सावळी..आईचं माझ्यावर खूप प्रेम होतं..तिला मी छान दिसावं असं आतून वाटायचं..पण त्याच भरात एक दिवस, तिच्याचकडून मी नकळत दुखावले गेले…
आणि जगात आपलं कुणीच नाही अशी भावना निर्माण झाली..हातात खडु होता.समोर पाटी होती..आणि मला जेजे वाटत होतं ते सगळं लिहूनच काढलं…आणि तेव्हांच मला जाणवलं की हे खूपच छान आहे..आणि जशी मोठी होत गेले तशी या लेखणीशी माझी घट्ट दोस्ती व्हायला लागली…तेव्हांपासून मी लिहीतच राहिले…
तो..म्हणजे अशा रितीने तुझा लेखन प्रवास सुरु झाला म्हणायचा की तुला “तू लिहू शकतेस ..”असा साक्षात्कार झाला….”
मी..ते तू काही म्हण…पण तसा मला लेखनाचा वारसा माझे परमप्रिय वडील. कै.ज. ना. ढगे यांच्याकडून मिळाला.ते एक प्रतिथयश लेखक आणि साहित्यिक होते…
तो..हो आणि ते थिअॉसॉफीस्टही होते ना..
स्वप्नसृष्टी,मृतांचे ऋणानुबंध अंतर्जीवन अशी त्यांची पुस्तकेही प्रसिद्ध आहेत..खूप गाजलेली आहेत ही पुस्तके..
मी..हो!शिवाय मेंदुला खुराक ,जरा डोके चालवा अशी गणितावरचीही त्यांची पुस्तके आहेत…
माझे वडील ही माझी पहिली प्रेरणा होती हे नक्कीच..आमच्या घरात कपाटे भरुन पुस्तके होती…कवी कालीदासांच्या महाकाव्यापासून, ते वर्ड्सवर्थ,शेले तेनेसन,शेक्सपीअर ,साॉमरसेट माॅम,हँन्स अँन्डरसन..चेकाव,बर्नाड शाॉ…आणि अशा अनेक इंग्रजी मराठी हिंदी दिग्गजांच्या साहित्याबरोबर माझी जडणघडण झाली…
तो..चांगले वाचन हा लेखनाचा पहिला संस्कार असतो..बरोबर ना?
मी..हो अगदी बरोबर.आधी भरपूर वाचावं मग लिहावं ..हे जाणीवपूर्वक माझ्यावर वडीलांनी बिंबवलं…
तो..तुझं पहिलं छापील साहित्य कुठलं..त्याविषयी सांग ना..तेव्हां तुला काय वाटले..?
मी..त्यावेळी अमृत नावाचं एक मराठी डायजेस्ट होतं…(रीडर्स डायजेस्ट सारखं..)त्यातल्या” याला जीवन ऐसे नाव” यात मी एक किस्सा लिहून पाठवला होता…आता मला तो नीट आठवत नाहीय् ..पण मथुरेच्या सहलीतला ,चहावाल्याकडून आलेला एक खरा अनुभव होता तो…माझं पहिलं प्रसिद्ध झालेलं हे छोटसं लेखन…त्यावेळी बिंबा ढगे या माझ्या माहेरच्या नावाने प्रसिद्ध झालं होतं…आणि अर्थातच माझ्या आयुष्यातला तो अत्यंत आनंदाचा आणि आत्मविश्वास बळावणारा क्षण होता…
आता जरा ब्रेक घेउया का?
परत भेटूया काही नवीन प्रश्नोत्तरासह…
क्रमश:…
© सौ. राधिका भांडारकर
पुणे
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈