सौ राधिका भांडारकर
आत्मसंवाद –भाग चार ☆ सौ राधिका भांडारकर
मी..वाचकांची अनेक पत्रे मी सांभाळून ठेवली आहेत.आता पत्रलेखन हा प्रकारच ऊरला नाही. फोनवर, ईमेलवर वाचकांशी संवाद होतो.
एकदा एकीने मला विचारले,”तुमची माझी काहीच ओळख नसताना, तुम्ही माझ्यावर इतकी जुळणारी कथा कशी काय लिहीलीत..?”
माझ्या मित्र परिवारातले लोकही गंमतीने म्हणतात,हिला काही सांगू नये.ही गोष्टच लिहील…आणि खरोखरच एकदा मी माझ्या मैत्रीणीच्या जीवनावरच कथा लिहीली होती.अर्थात् नावे बदलली होती.मैत्रीण म्हणाली,”कथा चांगली आहे ..पण तू हे लिहायला नको होतंस…”त्यानंतर कितीतरी दिवस तिने माझ्याशी अबोला धरला होता…असे काही अनुभव येतात ,पण म्हणून लिखाण थांबत नाही..
तो..तू नोकरी करत होतीस..नोकरी नसती तर तुझ्या हातून अधिक लेखन झालं असतं, असं नाही वाटत का?
मी…नाही.मी पस्तीस वर्ष बँकेत नोकरी केली.त्या निमीत्ताने मला अनेक माणसे भेटली.
मी विवीध मनोवृत्तीची माणसे पाहिली.त्यांच्याशी संवाद साधले…संवाद साधता साधता मी त्यांना टिपत गेले.माणसातला माणूस शोधण्याचा मला छंदच आहे.खरं म्हणजे मूळात वाईट कुणीच नसतं..
परिस्थिती माणसाला भाग पाडते… त्यातूनच माझ्या कथांमधली पात्रे घडत गेली…मी जेव्हां लिहीते तेव्हा ती पात्र मला दिसतात..त्यांना चेहरा असतो..ती माझ्याशी बोलतात…हे आभासी क्षण माझ्या लेखन प्रवासातले अत्यंत आनंदाचे क्षण.,.त्यावेळी मी आणि शब्द निराळे नसतात…एका अद्वैताचा अनुभव असतो तो..
तो…(मिस्कीलपणे) हो पण तरीही अजुन तू इतकी मोठी लेखिका नाही झालीस…
मी…बरोबर आहे तुझं..पण मी माझ्या आनंदासाठी लिहीते.मला काहीतरी सांगायचं असतं म्हणून लिहीते..पु.भा. भावे कथा स्पर्धेत माझ्या “रंग..” या कथेला पुरस्कार मिळाला होता..तसे अनेक छोटे मोठे पुरस्कार माझ्या कथांना मिळाले..कथाकथनांनाही बक्षीसे मिळाली..विश्वसाहित्य संमेलनातही माझे कथाकथन झाले…पण हे अलंकार मला मिरवावेसे नाही वाटत…माझे वडील नेहमी म्हणायचे,”यश नेहमी मागे ठेवायचं आणि पुढे जायचं..नवे संकल्प करायचे..आणि त्याच्या पूर्तीसाठी झटायचे…”
तो…तुझ्या लेखनाच्या माध्यमातूनच तू काय संदेश देशील..?
मी… बापरे!!संदेश देणारी मी कोण..?
मात्र एक सांगते..?माणसाला एक तरी छंद असावा..एक तरी आपल्या ठायी असलेली कला ओळखावी आणि जोपासावी..कीर्ती ,प्रसिद्धी,नाव ,पैसा यासाठी नव्हे..कलेत स्पर्धा ,ईर्षा नसावीच मुळी…ती मुक्त असावी…स्वानंदासाठी असावी..
।।साहित्य संगीत कला विहीन:
साक्षात् पशु पुच्छ विषाणहीन:।।
कला परांङमुख व्यक्ती ही शेपुट नसलेल्या पशुसारखीच असते..
कला म्हणजे भावनांची अभिव्यक्ती..आपल्या अंतरंगात उमटणार्या भाव ,भावना..,रेखा,रंग ,ध्वनी,शब्द यांतून जेव्हां व्यक्त होतात तेव्हा त्याला कलारुप प्राप्त होते..
अंतरंग जागृत होतं तेव्हां चैतन्याचा आनंद मिळतो…
हा आनंद हेच माझं सर्वोच्च पारितोषिक…
अरे!! कुठे गेलास…?
तो..कुठे नाही .इथेच तुझ्या अंतरंगात आहे..
मी…तुलाच धन्यवाद देते..आज तुझ्यामुळेच मी हा आत्मसंवाद साधू शकले.. पुन्हा भेटू..नव्या चौकटीत..नव्या कल्पना घेऊन…
समाप्त…!!
© सौ. राधिका भांडारकर
पुणे
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈