श्री अरविंद लिमये
विविधा
☆ आठवणींचे ठसे ☆ श्री अरविंद लिमये ☆
परखडपणा हा शब्द बोलण्याची पध्दत, वैशिष्ट्य म्हणून सर्रास वापरला जातो.पण त्याचं नेमकेपण एवढ्या मर्यादित अर्थात सामावणारे नाही.
फक्त स्वतःची मते कुणाचाही मुलाहिजा न ठेवता स्पष्ट शब्दात मांडणे हा स्पष्टवक्तेपणा होईल, परखडपणा नाही.
परखडपणा मुख्यतः स्वभाववैशिष्ट्य आणि पर्यायाने व्यक्तिमत्त्वविशेष म्हणूनच ओळखला जातो.स्वभाव या शब्दात विशिष्ट ‘भाव’ अंतर्भूत आहे.’भाव’ म्हणजे मनातील विचारांची, प्रतिक्रियांची व्यक्त होण्यापूर्वीची अव्यक्त अवस्था असे म्हणता येईल. याचाच अर्थ एखाद्या व्यक्तीचा स्वभाव त्याच्या मनोधारणेशी निगडीत असतो हे ओघानेच आले.त्यामुळेच व्यक्तिपरत्त्वे प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत,व्यक्त व्हायची पद्धत वेगवेगळी असते.
परखडपणाला स्पष्ट आणि स्वच्छ विचार अपेक्षित असतात. परखड म्हणजे खरा, सच्चा. अंतर्बाह्य प्रामाणिक.अतिशय प्रांजळ, सरळ आणि मुख्य म्हणजे पूर्वग्रहविरहित. या सारख्या अनेक गुणवैशिष्ट्यांपैकी एखाद्या गुणविशेषाची कमतरतातुध्दा परखडपणाची गुणवत्ता, निखळपणा कमी करणारी ठरत असते.
परखड व्यक्तींसाठी प्रत्येक क्षणच कसोटी पहाणारा असतो. आणि त्या कसोटीला उतरणाऱ्या व्यक्तिंना समाजमनात अत्यंत आदराचे अढळ स्थानही प्राप्त होत असते.
अशा अढळ स्थान प्राप्त झालेल्या अनेक परखड व्यक्तींच्या कार्यकर्तृत्वाच्या आठवणींचे अमीट ठसे समाज मनावर उमटून राहिलेले आहेत. अशा व्यक्ती सत्याची कास धरून कोणत्याही दबावाला बळी न पडता कर्तव्यपूर्तीला सर्वाधिक प्राधान्य देत योग्य निर्णय घ्यायचे धाडस करु धजावायचे. त्या आचार, विचार, साधनशुचिता कर्तव्यकठोरता, सद्सद्विवेक या सर्वांची चाड बाळगणाऱ्या असत.
इतिहासाचा धांडोळा घेताना अशा अनेक व्यक्तींची नावे मनात गर्दी करताहेत. सर्वात प्रथम उल्लेख करावासा वाटतो तो रामशास्त्री प्रभुणे यांचा. त्यांची निर्भीड न्यायनिष्ठुरता ‘रामशास्त्री बाणा’ म्हणूनच अजरामर झाली ती त्यांच्या परखडपणामुळेच. राजकारणासारख्या दलदलीच्या क्षेत्रातही स्वतःच्या परखडपणामुळे अजरामर ठरलेले नाव म्हणजे तत्कालीन रिझर्व बँकेचे गव्हर्नर आणि नंतर पं. नेहरूंच्या पहिल्या मंत्रिमंडळात अर्थमंत्रीपद भूषवणाऱ्या मा.सी.डी.देशमुख यांचे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला पं.नेहरूंचा ठाम विरोध असूनही, सत्याची कास धरून सद्सद्विवेक बुद्धीशी प्रामाणिक रहात त्यांनी संयुक्त महाराष्ट्रच्या चळवळीमागची न्याय्य बाजू परखडपणे पं. नेहरूंपुढे तर मांडलीच,पण त्यांचे मतपरिवर्तन करण्यात यश मिळाले नाही तेव्हा कसोटीची वेळ येताच अर्थमंत्रीपदाचा राजीनामा देऊन संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या पाठीशी ते ठामपणे उभेही राहिले. परखडपणाला तत्कालिक क्षणिक फायदा तोट्याचा विचार कधीच भुरळ घालू शकत नाही ते त्यांनी स्वतःच्या कृतीने असे सिद्ध केले होते. प्रशासनात काम करणाऱ्या परखड व्यक्ती म्हणून गो.रा. खैरनार,टी. एन. शेषन, किरण बेदी, अलिकडच्या काळातले तुकाराम मुंढे यांची नावे सहजपणे आठवतात. पत्रकारितेच्या क्षेत्रात तर न.चि. केळकर, टिळक- आगरकर, नानासाहेब परुळेकर यांच्यासारख्या व्यक्तिंनी त्यांच्या परखडपणामुळेच जनमानसातही आदराचे स्थान मिळवलेले आहे.
साहित्यक्षेत्रातल्या नामवंत लेखिका कै.दुर्गाबाई भागवत यांचाही इथे आवर्जून उल्लेख करावासा वाटतो.आणिबाणीच्या काळात व्यवस्थेविरुध्द ब्र ही उच्चारण्याचे धाडस करायला अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल एरवी असोशीने बोलणाऱ्या तत्कालीन नामवंतांपैकी कुणीही धजावत नसताना परिणामांची पर्वा न करता त्यांनी जाहीरपणे आणिबाणीचा निषेध करण्याचे धारिष्ट्य दाखवले होते. त्यावर्षीच्या कराड येथे झालेल्या साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या.करवीर नगर वाचनमंदिर कोल्हापूरतर्फे झालेल्या त्यांच्या सत्कारप्रसंगी झालेले त्यांचे भाषण हे परखडपणाचे नेमके उदाहरण होते.विशेषत: साहित्य-संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात ‘समाजमनातील खदखद व्यक्त करणे हे साहित्यिकांचे मुलभूत कर्तव्य आहे ‘ अशी ठाम भूमिका घेऊन मा.यशवंतराव चव्हाण यांच्या उपस्थितीतही आणिबाणीवर परखडपणे कडाडून जाहीर टीका करताना त्या डगमगल्या नव्हत्या.
साहित्यिक म्हणून त्या लोकप्रिय होत्याच पण त्यांच्या या परखड,निर्भीड भूमिकेमुळे त्या आदरणीयही ठरल्या होत्या!
परखडपणाला सामान्य- असामान्य,गरीब-श्रीमंत,साक्षर-निरक्षर असा भेदभाव नसतो. सामान्य,गरीब,निरक्षर माणसांचा जगण्याचा परीघ लहान असला तरी त्यांचा निखळ परखडपणा प्रसिध्द व्यक्तींच्या परखडपणाच्या तुलनेत तेवढाच महत्त्वाचा असतो.त्यांच्या मर्यादित वर्तुळात त्यांना आदराचे स्थान असतेच.
आयुष्याच्या वाटचालीत परखडपणाच्या प्रत्येक कसोटीला उतरणाऱ्या अशा व्यक्तीच सुवर्णझळाळी असणारे समाधान प्राप्त करू शकतात. आणि अशाच व्यक्तींच्या आठवणींचे क्षण समाजमनावर उमटणारे ठसेही कधीच न पुसले जाणारे असतात.
©️ अरविंद लिमये
सांगली (९८२३७३८२८८)
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈