सौ. गौरी सुभाष गाडेकर
कवितेचा उत्सव
☆ वाळूचं घड्याळ ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆
अनादिअनंत वाळूचं
घड्याळ अथक चालू असतं
खाली टपकत एकेक वर्ष
कालगणना करत असतं
काही कण भरभर पडतात
काही मात्र संथगती
माणसागणिक वेगळा वेग
माणसागणिक वेगळी मिती
मास्क लावून धावतानाही
बरंच दिलंय ‘एकवीस’नं
निर्माल्य पाचोळा यासोबत
फुलं फळं कोवळी पानं
वास्तव सांगतं मनाला
सगळंच थोडं बदललंय
एका वर्षाची भर पडून
प्रत्येकाचं वय वाढलंय
बरं-वाईट ठरवायचा
दृष्टिकोन आपल्या हातात
‘थकलो आता ‘ म्हणावं
की ‘वाढ अनुभव ज्ञानात’
वाळूच्या घड्याळातून
एक एक वर्ष पडत राहील
अशी वर्षं सरता सरता
नवी पिढी घडत राहील.
© सौ. गौरी सुभाष गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈