सौ. अंजली दिलीप गोखले

? वाचताना वेचलेले ?

☆ भेट…डाॅ.शुभा साठे ☆ संग्रहिका – सौ. अंजली दिलीप गोखले ☆

(स्वा सावरकर आणि CDS जनरल बिपीन रावत यांच्यातील काल्पनिक संवाद)

बिपीन – तात्या, तुम्ही इथे बसलाय होय…. कुठे कुठे शोधलं तुम्हाला ! गेले चोवीस तास मी तुम्हालाच शोधत फिरतोय सगळीकडे. तात्या… तात्या… मी तुमच्याशी बोलतोय… तुम्हाला भेटायला आलोय… मी बिपीन… भारतमातेचा सुपुत्र !… तात्या, खरं सांगतो, तुम्ही आखून दिलेल्या मार्गावरून चालतांना मला माझाच खूप अभिमान वाटत होता. तुमचे विचारशिल्प मनात घोळवत चिंतन, मनन केलं की आपोआप समस्येचा उलगडा होऊन मार्ग दिसायचा. तेव्हा प्रत्येकवेळेस मी मनाने तुमच्यासमोर नतमस्तक होत होतो. आज प्रत्यक्ष तुम्हाला भेटण्याचा योग्य आला. तात्या… तात्या…. ऐकताय नं तुम्ही? माझ्याकडे बघत का नाही? मी कुठे चुकलो का? चुकलो असेल तर माझा कान धरा… तुम्हालाच तो अधिकार आहे. पण, खरं सांगतो… मातेच्या रक्षणात मी कणभरही कधीच कसूर केली नाही आणि लेफ्ट जनरल लक्ष्मणसिह रावतांनी म्हणजे बाबांनी पण नाही. १९७८ मध्ये गोरखा रायफलच्या पाचव्या बटालीयनमध्ये रुजू झाल्यापासून माझं एकच स्वप्न होतं….

तात्या – मग ते स्वप्न पूर्ण होण्याच्या आधीच इथे का आलास? कुणी आमंत्रण दिलं होतं तुला इथे येण्याचं? इथे कुणी तुझी वाट पाहत होतं? की इथे कुणाला तुझी खूप गरज होती?

बिपीन – नाही तात्या, तसं नाही… पण…

तात्या – पण काय? अं …. पण काय??? जिथे कुणालाही आपली गरज नाही किंवा जिथे कुणी आपल्याला बोलावलं नाही, तिथे आपण जाऊ नये, इतकंही तुला कळत नाही? जिला तुझी खरी गरज आहे… आपली माता… तिला तू असं एकटं सोडून आलास? अरे, शास्त्रीजी, सुभाष, मी… आमचा गप्पांचा फड जमला की आम्ही तिघंही तुझ्याविषयी खूप अभिमानाने बोलायचो. परम विशिष्ट सेवा पदक, उत्तम युद्ध सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक, युद्ध सेवा पदक…. अशी पदके तुझ्या छातीवर विराजमान होताना पाहून आमच्याच अंगावर मूठ मूठ मास चढत होतं. जेव्हा भारतमातेचं रक्षाप्रमुखपद तू स्वीकारलस तेव्हा तर माझा आनंद गगनात मावेना… चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ !!…. वाटलं, आता मानसच्या काठावर पुन्हा मंत्रघोष होणार !!…

बिपीन – तात्या, याचं खरं श्रेय तुम्हालाच आहे. तुम्ही मार्ग दाखवला तसं तसं मी वागत गेलो. तुम्ही म्हंटल होतं न..” आपलं भूदल, वायुदल, नौदल सुसज्ज बनवा. लढाऊ विमानांनी, आकाशयानांनी नि जेट विमानांनी आकाश आच्छादित होऊ द्या…” आता तर सुपरसोनिक, हायपरसोनिक क्षेपणास्त्र आपल्या जवळ आहेत. पृथ्वी, अग्नी, धनुष या क्षेपणास्त्रांनी आपण सुसज्ज आहोत. ब्राह्मोसला पाहून तर चीनला घाम फुटलाय. आणि हो.. “शत्रूच्या भूमीत घुसून युद्ध चालविणे हा युद्ध जिंकण्याचा प्रभावी मार्ग आहे”… हे तुमचं वाक्य सतत मनात घोळत होतं. म्हणूनच तर उरी सर्जिकल स्ट्राईक करून तुमचे शब्द कृतीत उतरवले.

तात्या – शाब्बास माझ्या वाघा !…

बिपीन – तात्या, तुमच्या डोळ्यात पाणी?

तात्या – एक डोळा हसतोय, एक डोळा रडतोय…. १९६२ मध्ये आपल्या सैन्यदलाची जी स्थिती होती, ती आता नाही याचा आनंद आहे. पण, जेव्हा मातेला तुझी नितांत गरज आहे तेव्हा तू तिला सोडून इथे आलास याचे अतीव दुःख आहे. शौर्य आणि साहस या शब्दांना समानार्थी शब्द म्हणजे ‘बिपीन रावत’ हे समीकरण इतक्यातच मिटायला नको होतं. भारतीय सेनेला एक नवीन वैश्विक ताकद मिळवून देणारा तू…. ५/६ वर्षांपूर्वी पण तू माझ्या काळजाचा ठोका चुकवला होतास.. आठवतंय तुला?

बिपीन – हो तात्या, चांगलंच आठवतंय. तेव्हा नागालँडमध्ये माझं पोस्टिंग होतं.

तात्या – तेव्हा वरची पायरी चढताचढता थांबलास… मातेच्या प्रेमापोटी परत फिरलास.. मग आताही तसं का नाही केलं?

तात्या – तात्या, तुमच्यासारखी मृत्यूला थोपवून धरण्याची शक्ती माझ्यात नव्हती. मृत्युंजयी तुम्ही एकच ! मला तर बोलावणे आल्यावर काहीही कारण न देता निघावंच लागलं. अजून खूप काम करायचं होतं, योजना आखून तयार होत्या आणि सिंधू पण भारतात आणायचीच असा कृतनिश्चयही केला होता… पण, हरकत नाही… तुम्हाला भेटून, तुमच्याकडून अक्षय ऊर्जा घेऊन परत जातो आणि राहिलेलं कार्य पूर्ण करतो की नाही बघाच…! मी पण भारतमातेला शब्द देऊन आलोय..   भेटेन नऊ महिन्यांनी…..

लेखिका– @ डॉ शुभा साठे 

संग्राहक : – सौ. अंजली गोखले

मो ८४८२९३९०११

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments