डॉ अभिजीत सोनवणे
@doctorforbeggars
☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ कै. सिंधुताई सपकाळ विशेष – माई….! ☆ डॉ अभिजीत सोनवणे☆
कै. सिंधुताई सपकाळ
माई…ए माई…उठ ना… अगं किती वाजले ?
तू इतका वेळ कधीच झोपून राहत नाहीस… एक हाक मारली तरी ‘ओ रे बेटा’ असं म्हणून सादेला प्रतिसाद देणारी तू…. ! इतक्या हाका मारून सुद्धा ओ का देत नाहीस… ?
आज अशी अचानक पणे शांत का झालीस ?
तू रागावली आहेस का माझ्यावर ? खरं सांगू रागवायचा अधिकार आज माझा आहे, आम्हा सर्व लेकरांचा आहे…
सर्वांना असं उघड्यावर टाकून तू जाऊच कशी शकलीस ?
पुस्तकाची प्रस्तावना देताना, जे तू बोलत होतीस ते शेवटचं असणार आहे… हे मला काय माहित ? नाहीतर तुला बोलण्यात गुंगवून ठेवलं असतं की गं माई…
त्यावेळी डोक्यावर ठेवलेला हात तू असा अचानक काढून घेणार आहेस… हे मला काय माहित ? नाहीतर तो हात मी तसाच गच्च धरून ठेवला असता की गं माई…
दरवेळी तुला भेटायला येताना, तुला आवडतात त्या साड्या मी घेऊन यायचो…. आता इथून पुढे या साड्या मी कोणाला देवू….? गेलीस…. पण जाताना या साड्यांचा भार माझ्या डोक्यावर ठेवून गेलीस की गं माई ….
साड्यांचे बॉक्स मी तुझ्यासमोर उघडताना हि तू अशी… हे बघ अशी…..खुर्चीवर बसलेली असायचीस आणि मी जमिनीवर….
एक एक बॉक्स उघडताना लहान मुलीच्या निरागसतेने, डोक्यावरचा पदर सावरत म्हणायचीस, ‘बेटा गुलबक्षी रंगाची आणली आहेस ना ?’
आज फिकट पडलेल्या या गुलबक्षी रंगाला मी काय उत्तर देऊ माई… सांग की… आज गप्प का ?
मी पुस्तक लिहितो आहे; असं तुझ्या कानावर घातल्यावर, हसत म्हणाली होतीस, फिरकी घेतली होतीस, ‘आता तुम्ही मोठे लेखक होणार बुवा… आम्हाला तुमच्याशी बोलायचं असेल तर अपॉइंटमेंट घ्यावी लागेल आता बाबा तुमची’…
या पुढे म्हणाली होतीस, ‘पहिली प्रत कोणाला देणार आहेस…. ?’
हा काय प्रश्न झाला माई …. ? तुला उत्तर माहीत असून सुद्धा, माझ्या तोंडून तुला वदवून घ्यायचे होते ना …. ?
आता मला सांग…. मी पुस्तकाची पहिली प्रत, तुझ्या पायाशी ठेवायला कुठे येऊ…. ?
जळगावात एकदा एक खूप मोठा… मानाचा… “अविनाशी पुरस्कार” मला मिळाला होता…
तुला कुणी सांगितलं माहित नाही, परंतु मी जळगावात पोचल्याबरोबर तुझा फोन आला होता, ‘बेटा जळगावात रेल्वेस्टेशन समोर अमुक-अमुक झाडाखाली मी सुद्धा एकेकाळी भीक मागत होते, तिथे तु आत्ता जा आणि तिथं भीक मागणाऱ्या या सर्व लोकांना काहीतरी गोड खाऊ घाल आणि त्यांच्यासाठी जे काही करता येणे तुला शक्य आहे ते सर्व… सर्व… सर्व… कर रे बेटा… बाळा…. माज्या सोन्या… असं तू तळमळून सांगितलं होतंस…
तुझी ती तळमळ शब्दात मांडण्याची माझी अजून तरी औकात नाही….!
यानंतर मला जे जमलं होतं, ते मी या सर्व याचकांसाठी केलं होतं…. आणि त्याचा लेखी रिपोर्ट तुला फोटोसह दिला होता…. यावर हे सर्व पाहून “माझा वाघाचा बच्चा” असं म्हणून तू मला पोटाशी धरलं होतंस…. !
तुला आठवतं…. ? मी कधीच विसरणार नाही… !!!
अग मी वाघाचा बच्चा कधीच नव्हतो, मी बच्चा होतो “वाघिणीचा” गं …. !
माझ्यासारख्या अशा किती बच्च्याना मागं सोडून गेलीस गं वाघिणी … ? आणि का… ???
एकदा एका व्यासपीठावर तुझं आणि माझं व्याख्यान ठेवलं होतं…. (माझी लायकी नसतानाही तुझ्या शेजारच्या खुर्चीत मी बसलो होतो)
तुझ्या भाषणात तू पदर पसरून, शेवटी लोकांना म्हणाली होतीस, ‘माझ्या लेकराला…. अभिजीतला पदरात घ्या हो मायबाप…’
तुझ्या या आवाहनाला प्रतिसाद देऊन, समाजाने मला तर पदरात घेतलं ग माई, पण तुझा पदर हरवला…. तो कुठून आणू आता… ??? सांग की आज गप्प का ?
एकदा मोठ्या मनानं म्हणाली होतीस, ‘तू मला माई म्हणतोस, मी तुझी आई झाले…. पण खरं सांगू का ? भीक मागण्याच्या काळात मला तू भेटायला हवा होतास…. तुझी आई होण्यापेक्षा…. तुझी मुलगी होण्यात मला जास्त धन्यता वाटली असती रे बाळा…. !
माई तू शब्द दिला होतास….. सोहमच्या लग्नात मी येईन म्हणून…. !
मोडलास गं हा शब्द माई तू…. सोहमला काय सांगू मी आता…. ? मनीषा ला काय सांगू… ?
तू गेलीस हे समजण्याचं सोहमचं वय नाही गं माई …. पण मी त्याला सांगितलं आहे, आजी परत येणार आहे….!
तो येडा तुझ्या येण्याची वाट बघतोय….
ए माई… ऐक ना…. सोहमच्या पोटी फिरून जन्माला येशील…. ???
ये की गं…. आयुष्यात मी तुझं सारं ऐकलं…. आता तू माझं ऐक ना…. ऐक की… एकदा तरी….प्लीज….!
तुला माझी मुलगी व्हायचं होतं ना …. ?
सोहमच्या पोटी जन्माला ये…. तोपर्यंत वाट पाहिन मी तुझी….माई… !!!!
आज तुझ्या जाण्याने एक मात्र निश्चित जाणीव झाली…. देवाला सुद्धा आई हवी असते…. !!!
तुझे अभागी …
अभिजीत… मनीषा आणि सोहम
चित्र साभार – sindhutaisapakal.org
© डॉ. अभिजित सोनवणे
डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे
मो : 9822267357 ईमेल : [email protected],
वेबसाइट : www.sohamtrust.com
Facebook : SOHAM TRUST
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈