श्री सुधीर गाडगीळ
मनमंजुषेतून
☆ बोलता बोलता भाग 6 ☆ श्री सुधीर गाडगीळ ☆
बर्मिगहॅमला मुलाखतींच्या राज्यात शिरण्यापूर्वी चंदू बोर्डे, नाना पाटेकर यांच्यासह क्रिकेटदेखील खेळलोय. त्या वेळी बॅटिंग करत होते श्रेष्ठ शास्त्रज्ञ जयंत नारळीकर. वयाचं- कर्तृत्वाचं अंतर असूनही सी. रामचंद्र गळ्यात हात टाकून, गाण्यांच्या जुन्या आठवणी जागवताना मजजवळ फोटो आहे. कन्नडभाषी सुधा मूर्ती स्वच्छ मराठीत कोल्हापुरात माझ्या गप्पाष्टकात सहभागी झाल्यात आणि पुण्यातल्या दर्शन हॉटेलमध्ये नारायण मूर्तीशी झालेल्या नमनाच्या भेटी त्यांनी खुलवून सांगितल्यात. विजय तेंडुलकरांशी गुन्हेगारी जगतावर बोलण्यात रमलोय.
आता माझ्या मुलाच्या वयाचे सारे स्टार्स आहेत. विश्वजीत कदम, पंकजा मुंडे, प्रणिती शिंदे, अमित देशमुख असे राजकारणात आहेत. तर राहुल- महेश काळे, शौनकसारखे गायक गाजतायत. या नव्या पिढीसमवेतही माझे सूर जुळलेत. नुकतंच दुबईला महेश-राहुलशी गप्पा मारत, सुबोध भावेला आठवत आम्ही ‘पाडवा’ साजरा केला.
जाता जाता एक सांगतो मला अजिबात न आवडणाऱ्या माणसांची मुलाखत घ्यायची वेळ आली तरी मी टाळत नाही. कारण त्या निमित्ताने माझं ‘न’ आवडणं, हे गैरसमजावर आधारित आहे का, हे तपासता येतं आणि माझी चूक असेल तर माझीच मनातली ‘मतं’ पुसून टाकून, मैत्र वाढवता येतं. जॉर्ज फर्नाडिस ते बाबामहाराज सातारकर, सिंधुताई सपकाळ ते निर्मलाताई पुरंदरे, पु. भा. भावे ते अनिल अवचट अशा परस्पर टोकाच्या मतप्रणालींशी झालेला संवाद सांगणं म्हणजे स्वतंत्र ग्रंथच होईल. फक्त इथे नोंद घेतो. न नोंदता आलेले हजारभर !
एकच सांगतो, या साऱ्या माणसांशी बोलताना जमा झालेले ‘संदर्भ’ मुलाखतींच्या राज्यात उपयोगी पडलेत आणि संदर्भाची सतर्कता, बोलण्यातली अनौपचारिकता, मांडणीतली उत्स्फूर्तता यामुळे ‘माणसं’ मात्र जगभर जोडली गेली आहेत.’ बोलणं आणि माणसं जोडणं हा अदृश्य पाया ‘ हीच माझी सृष्टीआडची दृष्टी आहे. यातूनच निर्मिलेला एक नवा उद्योग सांगतो नि थांबतो. जगभर ‘आय. टी. कपल’ नोकरीनिमित्त गेली आहेत. मी कार्यक्रमाच्या निमित्तानं जगभरच्या या तरुण तंत्रज्ञांना भेटतो. त्यांचे महाराष्ट्रातले आई-वडील गाठतो. एक दिवस या आजी-आजोबांसमवेत गप्पा मारत त्यांची दैनंदिनी चित्रबद्ध करतो आणि हे सारे चित्रण त्यांच्या परदेशात स्थायिक झालेल्या नातवंडांकडे पाठवतो. या ‘पॅकेजिंग ग्रॅण्डपा’ मोहिमेत मी रमलोय. घरातलं कुणी अचानक गेलं तर ग्रुप फोटोमधला फोटो एन्लार्ज करून त्याला हार घातला जातो आणि ‘हारातलाच चेहरा खरा’ असं पुढच्या पिढय़ा समजतात. त्यामुळे चालते, बोलते, हसते, खेळते आजी-आजोबा असतानाच त्यांना कॅमेऱ्यात बोलकं करत पकडून ठेवा; ही सध्या माझी ‘संवाद मोहीम’ आहे. अर्काइव्हल सेन्स असलेल्यांना या चित्रबद्ध संवादाचं महत्त्व नक्की कळेल.
क्रमशः….
© श्री सुधीर गाडगीळ
पत्रकार, निवेदक
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈