सौ. सुनीता पाटणकर

? वाचताना वेचलेले ?

☆ आदर्श ☆ सुश्री सुनीता पाटणकर ☆

एक जण भारतीय लोकशाहीला शिस्त लावणारा तडफदार माजी निवडणूक आयुक्त,  तर दुसरा कोकणरेल्वे, दिल्लीमेट्रो सारख्या चमत्काराचा निर्माता मेट्रो मॅन.– टी.एन.शेषन आणि ई.श्रीधरन— हे दोघंही आपआपल्या क्षेत्रात टॉपचे अधिकारी तर होतेच, पण दोघांनीही आपल्या कामामुळे अख्ख्या देशाची व्यवस्था सुधारून दाखवली.

विशेष म्हणजे हे दोघेही अधिकारी अगदी प्राथमिक शाळेत असल्यापासून एका वर्गात होते, आणि पहिल्या नंबरसाठी त्यांच्यात तुफान स्पर्धा चालायची.

 ई.श्रीधरन यांनी एका मुलाखतीमध्ये त्याकाळातल्या आठवणी सांगितल्या आहेत—–

 दोघेही मूळचे केरळचे. १९४२ साली तिथल्या पलक्कड या गावातल्या सर्वात फेमस असलेल्या बेसल एव्हान्जीकल मिशन हायस्कूलमध्ये श्रीधरन यांनी इंग्रजी दुसरी या वर्गात प्रवेश केला. शेषन आधीपासून त्याच शाळेत होते. वर्गात त्यांचा पहिला नंबर यायचा.

 श्रीधरन यांनी आल्याआल्या त्या वर्षी शेषन यांना मागे टाकले. तिथून या दोघांची स्पर्धा सुरु झाली.  शेषन उंचीला कमी असल्यामुळे वर्गात पहिल्या बेंचवर बसायचे, तर श्रीधरन उंच असल्यामुळे शेवटच्या बेंचवर. शेषन हे अतिशय अभ्यासू, कायम पुस्तकात बुडालेले असायचे. याउलट श्रीधरन फुटबॉल खेळायचे. इंग्रजीमध्ये मात्र टी.एन.शेषन यांच्या तोडीस तोड अख्ख्या शाळेत कोणी नव्हतं.

 बोर्डाच्या परीक्षेत शेषन यांनी श्रीधरन यांना १ मार्काने मागे टाकलं. १९४७ सालच्या ssc बोर्ड परीक्षेत शेषन ४५२ मार्क मिळवून पहिले आले, तर श्रीधरन यांना ४५१ मार्क मिळाले होते व त्यांचा दुसरा क्रमांक आला होता.

 मार्कांसाठी किती जरी स्पर्धा असली, तरी शेषन आणि श्रीधरन  चांगले दोस्त होते.

पुढे इंटरमीजीएटसाठीदेखील व्हिक्टोरिया कॉलेजला दोघांनी एकत्र ऍडमिशन घेतलं. दोघांनी एकत्र झपाटून अभ्यास केला. अख्ख्या मद्रास प्रांतामध्ये इंजिनियरिंगला प्रवेश मिळेल एवढे मार्क मिळवणारे ते दोघेच होते.: पण टी.एन.शेषन यांना आपल्या भावाप्रमाणे आयएएस अधिकारी बनायचं होत.  यामुळे त्यांनी इंजिनियरिंगला प्रवेश घेतला नाही व मद्रास ख्रिश्चन कॉलेजमध्ये फिजिक्स विभागात प्रवेश घेतला. श्रीधरन यांनी मात्र आंध्रमधल्या काकीनाडाच्या इंजिनियरिंग कॉलेजमध्ये सिव्हील इंजिनियरिंग पूर्ण केलं.

पुढे १९५४ साली युपीएससी परीक्षा पास होऊन आयएएस बनण्याचं  स्वप्न शेषन यांनी पूर्ण केलं. याच काळात श्रीधरन हे इंडियन इंजिनियरिंग सर्व्हिसेस एक्झाम पास होऊन रेल्वेमध्ये भरती झाले. 

 योगायोग असा की दोघेही ट्रेनिंगच्या निमित्ताने इंडियन फोरेस्ट कॉलेज, डेहराडून, येथे एकत्र आले. ते २ महिने शेषन व श्रीधरन सोबत राहिले. त्यानंतर मात्र दोघांचे रस्ते कायमसाठी वेगळे झाले. शेषन यांनी प्रशासकीय कारकीर्दीत एकामागून एक यश मिळवत भारताचे मुख्य कॅबिनेट सचिव बनण्यापर्यंत मजल मारली. हे भारतातील सर्वोच्च पद. १९८९ साली रिटायर झाल्यावर त्यांना निवडणूक आयुक्तपदावर नेमण्यात आलं.

 भारतात निवडणूक काळात आचारसंहिता कडकपणे राबवण्यास शेषन यांनी घालून दिलेली शिस्त कारणीभूत ठरली. त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून त्यांना मॅगसेसे पुरस्कार देखील देण्यात आला. तर श्रीधरन यांनी कलकत्ता मेट्रो, कोकण रेल्वे, दिल्ली मेट्रो, कोची मेट्रो, लखनौ मेट्रो असे अशक्यप्राय वाटणारे प्रोजेक्ट स्वतःच्या कर्तबगारीने व नेतृत्वाने पूर्ण केले. विक्रमी वेळेत, सर्वोत्कृष्ट इंजिनियरिंगचे स्कील दाखवत, श्रीधरन यांनी भारतीय रेल्वेचा कायापालट करण्यात महत्वाची जबाबदारी पार पाडली. त्यांना याबद्दल भारताचा सर्वोच्च ‘ पद्मविभूषण ‘ हा सन्मान देण्यात आला.

मैत्रीत अनेकदा लोक स्पर्धा करतात. स्पर्धा असावी तर शेषन-श्रीधरन यांच्या प्रमाणे चांगले  काम करण्याची. देशाला ‘ नंबर वन ‘ करण्यासाठी या दोन दोस्तांनी जे प्रयत्न केले, त्याचा आदर्श प्रत्येकाने घ्यावा हे नक्की.

 

संग्राहिका : – सौ. सुनीता पाटणकर

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
5 2 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

2 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Shyam Khaparde

उत्कृष्ट

Niranjan

Khupch mast