श्री सुहास रघुनाथ पंडित
विविधा
☆ उषाराणी – – निशाराणी ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
“थांब,भास्करा,थांब ! असा जाऊ नकोस.
अरे तू येणार या कल्पनेनच मी किती आरक्त झाले होते. आठवतयं ना तुला, माझं ते रूप? हवेत गारवा सुटला होता. तुझ्या लक्ष लक्ष किरणांतील एखादा किरण, वांड मुलासारखा, तुला न सांगताच, आगाऊपणानं पुढं आला होता. पण ते ही बरंच झालं. त्याच्या येण्यानच मला तुझ्या येण्याची चाहूल लागली. मी लगबगीनं उठले. अंगावरची श्यामल वस्त्रे दूर सारली. त्या नादात चांदण्यांची पैंजणं कुठं विखुरली समजलही नाही. मी तुझ्या स्वागतासाठी सज्ज झाले. तुला आवडेल असं शुभ्र वस्त्र परिधान केलं. पण काय सांगू? त्या धवल वस्त्राला लाल, गुलाबी छटा केव्हा आल्या माझं मलाही समजलं नाही. केवळ तुझ्या येण्याच्या चाहुलीन केवढा फरक पडला होता बघ! तुझं तेजस्वी दर्शन होणार या कल्पनेनच माझी अवघी काया शहारून उठली. चेह-यावर रक्तिमा चढला.तो सा-या आसमंतात पसरला. खरच मित्रा,तुझ्या दर्शनासाठी मी किती व्याकुळ झालेली असते ते तुला कसं समजणार?
सोन्याच्या पायघड्या घालून तुझ्या आगमनाची वाट पहात असते. आणि तू असा निष्ठूरपणे निघून जातोस? नाही, भास्करा तुला थांबावच लागेल. माझ्या प्रेमासाठी तरी थांबावच लागेल.
मान्य आहे मला की तुझ्या मागे फिरता फिरता माझं रूप मला बदलावं लागतं. मला हे ही मान्य आहे की थांबणं, गतिहीन होणं हे तुला मान्यच नाही. तुझ्या तेजाला ते शोभणारही नाही. म्हणून तर तुझी वेडी झालेली ही उषाराणी तुझी पाठ सोडायला तयार नाहीय.पण तू तरी असा निष्ठूर का होतेस? अरे, तुझं तेजच इतकं दिव्य आहे की त्याच्यापुढे माझ्या सौंदर्याचा रक्तिमा. फिका पडून जातो. पण तरीही तुझा सहवास मला हवा आहे.मी अगदी निस्तेज झाले तरी तुझा सहवास मला हवा आहे.
पण तू तर ऐकायला तयारच नाहीस. तुझी पाऊले तर वेगानेच पडत आहेत. क्षणभर मागे वळून पहा. पाहिजे तर मी तुला आवडेल अशा रूपातच पुन्हा येते. तोच रक्तिमा, तोच शितल वारा सारं काही घेऊन येते. तुझी ही उषाराणी, तुझी अभिसारिका बनून, तुझ्या साठी संध्याराणी होऊन आली आहे. आता तरी थांब.माझं हे रूप पाहशील तर तुला नक्कीच आपल्या प्रभातसमयिच्या मंगल भेटीची आठवण होईल.थांब जरासा.
पण नाही, तू थांबणार नाहीस. सा-या विश्वासाठी वणवण भटकशील. पण माझा एक शब्दही ऐकणार नाहीस. ठीक आहे. तुझी मर्जी. तुझ्यासारख्या सामर्थ्यशाली,तेजस्वी प्रियकराला समजावणं माझ्या कुवती बाहेरचं आहे.
पण एक लक्षात घे. तू. निघून चाललायस. आता माझ्या जीवनात काळोखच काळोख आहे.ही शुभ्रवस्त्र मला आता परिधान करवत नाहीत. हा रक्तिमाही मला आता नकोसा झालाय. बघता बघता माझा चेहराही काळवंडेल. तुझ्या विरहात माझी अवस्था दयनीय दयनीय होऊन जाईल. माझेच काय, सा-या जगाचे व्यवहार थंडावतील.
तू ही एक लक्षात ठेव.
मी तुझ्या तेजाची पूजक आहे. तुझ्या तेजानं मी दिपून तर जातेच. पण ते तेज तस मी सहजासहजी हातचं सोडणारही नाही.तुझी वाट पाहीन. मला खात्री आहे,तुलाही माझ्या विरहाची किंमत कळेल. आपलं निघून जाणं चुकलं असं तुला वाटेल आणि तू नक्की परत येशील,तुझ्या तेजाचा ताफा घेऊन येशील मला दिपवायला.
पण……पण मनात अपराधीपणाची भावना बाळगून येशील.माझ्या समोर एकदम येणं तुला जमणार नाही. म्हणूनच आपला एखादा किरण दूत म्हणून पाठवशील, माझा अंदाज घेण्यासाठी.
मला तुझी चाहूल लागेल मी तर काय, प्रेमवेडीच!
तुझ्या येण्याच्या चाहुलीनं मी पुन्हा विरघळेन.
माझ्या कांतिवर पुन्हा एकदा रक्तिमा चढेल.
तुझ्या स्वागतासाठी मी पुन्हा एकदा हसतमुखानं सामोरी येईन.
रानपाखरांना सांगेन मंजुळ गायन करायला.
विरहात तापलेल्या तुझ्या देहाला थंडावा मिळावा म्हणून वा-यालाही आमंत्रण देईन.
मला खात्री आहे, तू नक्की येशील.
उशीरा का होईना, ख-या प्रेमाची किंमत तुला कळेल.
ये, भास्करा, ये.
तुझ्या विरहात काळवंडलेली ही उषाराणी, तिच निशाराणीचं रूप टाकून, चांदण्याचा चंदेरी शालू फेकून, पुन्हा एकदा उषाराणी बनून तुझ्या स्वागतासाठी सज्ज आहे.
मला माहित आहे, हा पाठलाग जीवघेणा असला तरी हे नातं युगायुगांच आहे. कधीच न संपणारं. अगदी कधीच न संपणारं.!”.
© सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈