सौ. पुष्पा चिंतामण जोशी
☆ मी प्रवासिनी क्रमांक १८ – भाग १ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
मोरोक्को – रसरशीत फळांचा देश
मोरोक्को हे आफ्रिका खंडाचे उत्तर टोक आहे पण भौगोलिक दृष्ट्या ते युरोपला जवळचे आहे. स्पेनहून आम्हाला मोरोक्को इथे जायचे होते. मोरोक्कोला विमानाने जाता येतेच पण आम्हाला जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीतून प्रवास करायचा होता. भूमध्य सागर व अटलांटिक महासागर हे जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीने जोडलेले आहेत असा शालेय पुस्तकात वाचलेला भूगोल अनुभवायचा होता.
स्पेनच्या दक्षिण टोकाला असलेल्या अल्गिशिरास बंदरात पोहोचलो. तिथून बोटीने प्रवास केला.’टॅ॑जेर मेड’ या आठ मजली बोटीचा वेग चांगलाच जाणवत होता. बंदर सोडल्यावर जवळजवळ लगेचच भूमध्य सागरातून उगवलेला, मान उंचावून बघणारा, उंचच- उंच सुळक्यासारखा डोंगर दिसू लागला.हाच सुप्रसिद्ध ‘जिब्राल्टर रॉक’! हवामान स्वच्छ, शांत असल्याने जिब्राल्टर रॉकचे जवळून दर्शन झाले.
हा जिब्राल्टर रॉक फार प्राचीन, जवळ जवळ वीस कोटी वर्षांपूर्वीचा मानला जातो. जिब्राल्टरचा एकूण विस्तार फक्त साडेसहा चौरस किलोमीटर आहे. त्यात हा १४०८ फूट उंच डोंगर आहे. हा संपूर्ण डोंगर चुनखडीचा आहे. पाणी धरून ठेवण्याच्या त्याच्या क्षमतेमुळे इथे सदोदित हिरवी वृक्षराजी बहरलेली असते. डोंगराच्या पश्चिमेकडील उतारावर जिब्राल्टर हे छोटेसे गाव वसलेले आहे. बोटीतून आपल्याला तिथल्या हिरव्या- पांढऱ्या, बैठ्या इमारती व हिरवी वनराजी दिसते. सभोवतालच्या सागरात असंख्य छोट्या पांढऱ्या बोटी दिसत होत्या.उंच उसळणाऱ्या डॉल्फिन माशांचे दर्शनही झाले. या खडकाचे उत्तरेकडील भूशिर (आयबेरिअन पेनिन्सुला ) हे एका अगदी चिंचोळ्या पट्ट्याने स्पेनच्या भूभागाला जोडले गेले आहे. तर दक्षिणेला अरूंद अशी ही जिब्राल्टरची सामुद्रधुनी आहे.
अत्यंत मोक्याची अशी भौगोलिक परिस्थिती लाभल्यामुळे ऐतिहासिक काळापासून हे ठिकाण आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. आठव्या शतकापासून चौदाव्या शतकापर्यंत इथे उत्तर आफ्रिकेतील म्हणजे मोरोक्कोतील मूरिश लोकांची लोकांची राजवट होती. त्यांनी या खडकाचे जाबेल तारिक म्हणजे तारिकचा खडक असे नामकरण केले. त्याचे जिब्राल्टर असे रुपांतर झाले. नंतर सतराव्या शतकापर्यंत हे ठिकाण स्पेनच्या ताब्यात होते.इ.स.१७०४ मध्ये ते ब्रिटिश साम्राज्याचा भाग झाले.ते आजपर्यंत ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली आहे. या महत्वपूर्ण ठिकाणी ब्रिटनचा नाविक व व हवाई तळ आहे.
जेमतेम चाळीस हजार लोकसंख्या असलेल्या जिब्राल्टरमध्ये ब्रिटिश, स्पॅनिश, ज्यू,, आशियाई, पोर्तुगीज असे सर्व वंशाचे लोक आहेत. त्यामुळे इथे चर्च, मॉस्क, देऊळ, सिनेगॉग सारे आहे. जिब्राल्टरमध्ये शेती नाही किंवा खनिजांचे उत्पन्नही नाही. पण हा जगातला सर्वात व्यस्त असा सागरी मार्ग आहे. भूमध्यसागर आणि अटलांटिक महासागर यांना जोडणाऱ्या या सागरी मार्गावर दर सहाव्या मिनिटाला एक व्यापारी बोट बंदरात येते अथवा तिथल्या बंदरातून सुटते. या अवाढव्य बोटींची देखभाल,दुरुस्ती करणे,इंधन भरणे अशा प्रकारची अनेक कामे इथल्या डॉकयार्डमध्ये होतात. पर्यटन हाही एक व्यवसाय आहे.
बोटीने दोन तास प्रवास करून आम्ही मोरोक्को मधील टॅ॑जेर बंदरात पोहोचलो. बंदरातून गाईडने आम्हाला समुद्रकिनारी नेले. या ठिकाणाला ‘केप पार्टल’ असे नाव आहे. भूमध्य सागर आणि अटलांटिक महासागर इथे मिळतात असे त्याने सांगितले. तिथल्या समुद्राचा रंग निळसर हिरवा होता. काही भागाचा रंग ढगांच्या सावलीमुळे, धुक्यामुळे काळपट वाटत होता. पण दोन वेगळे समुद्र ओळखता येत नाहीत. मला आपल्या ‘गंगासागर’ ची आठवण झाली. गंगा नदी कोलकात्याजवळील ‘सागरद्वीप’ या बेटाजवळ बंगालच्या उपसागराला मिळते. त्या ठिकाणाला ‘गंगासागर’ म्हणतात. ते बघताना गाईड म्हणाला होता, ‘समोर तोंड केल्यावर तुमच्या उजव्या हाताला बंगालचा उपसागर आहे व डावीकडून गंगा येते. त्या विशाल जलाशयातून आपल्याला सागर व सरिता वेगळे ओळखता येत नाहीत. तसेच इथे झाले असावे.
टॅ॑जेरला वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक स्थान लाभले आहे. त्याचप्रमाणे इतिहासाच्या एका फार मोठ्या कालखंडाचे हे शहर साक्षीदार आहे. युरोप व अरब देशातील कलाकार, राजकारणी, लेखक, उद्योगपती यांचे हे आवडते ठिकाण आहे. मुस्लिम, ख्रिश्चन,ज्यू अशी संमिश्र वस्ती असल्याने इथे बहुरंगी सांस्कृतिक वातावरण आहे. शहरात मशिदी, चर्च याबरोबर सिनेगॉगही आहे. ‘फ्रॉम रशिया विथ लव्ह’ या चित्रपटाचे थोडे चित्रिकरण इथे केले आहे.
केप स्पार्टलजवळील टेकड्यांवर वसलेला कसबाह विभाग ऐश्वर्यसंपन्न आहे. इथल्या भव्य राजवाडयासारख्या बंगल्यांना किल्ल्यासारखी भक्कम तटबंदी आहे. आतल्या हिरव्या बागा फळाफुलांनी सजल्या होत्या. सौदी अरेबिया व कुवेत येथील धनाढ्य व्यापाऱ्यांचे हे बंगले आहेत असे गाईडने सांगितले. इथल्या सुलतानाचा सतराव्या शतकात बांधलेला भव्य पॅलेस व गव्हर्नर पॅलेसही इथेच आहे. इथून समुद्राचे सुंदर दर्शन होते .जुन्या शहरात ग्रॅ॑ड सोक्को म्हणजे खूप मोठे मार्केट आहे.
भाग-१ समाप्त
© सौ. पुष्पा चिंतामण जोशी
जोगेश्वरी पूर्व, मुंबई
9987151890
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈