सौ कुंदा कुलकर्णी
वेद व पुराण काळातील महत्वपूर्ण स्त्रिया
☆ ऋषिका जुहू ☆ सौ कुंदा कुलकर्णी ☆
ऋषिका जुहू
वैदिक काळामध्ये लोपामुद्रा, आदिती, विश्वावरा, इंद्राणी, सर्परागिणी, शाश्वती अशा अनेक ऋषिका होऊन गेल्या. वेदांच्या स्तोत्रांच्या किंवा मंत्रांच्या जाणकार, त्यांचे रहस्य समजून घेणाऱ्या, त्यांचा प्रचार करणाऱ्या त्या सर्व स्त्रिया ऋषिका नावाने प्रसिद्ध आहेत. आपण आज जहू या ऋषिके ची माहिती घेऊया.
ऋषिका जुहू ब्रह्मवादिनी होती. ब्रह्मवादिनी म्हणजे उपनयन करणारी आणि अग्निहोत्र करणारी. वेदांचा अभ्यास करणारी आणि घरातील लोकांची निस्वार्थ सेवा आणि स्वेच्छेनं मिळालेल्या अन्नपाणी पैशांनी जगणारी. ब्रह्मा + वादिनी= ब्रम्ह .ब्रम्हाला साक्षात आत्मतत्व म्हणतात. . ब्रह्मतत्त्वाचे अध्ययन करू इच्छिणारी ब्रह्मवादिनी. तिचे उपनयन करुन तिला वेदाध्ययन करता येत असे .खूप तपस्या करून ब्रम्हाचे ज्ञान रसिकांना पोचवण्याचे काम ब्रह्मवादिनी करते.
ऋषिका जुहू आणि ब्रह्मदेव हे पती-पत्नी होते म्हणून तिला ब्रह्म जाया असेही म्हणतात. काही कारणाने ब्रह्मदेवाने तिचा त्याग केला. पण ऋषिका जुहू अजिबात घाबरली किंवा विचलित झाली नाही. ती पतिव्रता होती. धर्मपरायण होती आणि म्हणून तिचा धर्मपरायण निर्णायक मंडलावर पूर्ण विश्वास होता. त्या काळात पत्नीचा त्याग करणे हा मोठा अपराध मानला जात असे .अशा पतीना प्रायश्चित्त घ्यावे लागत असे. वायू अग्नी सूर्य सोम आणि वरुण या देवतानी ब्रह्मदेवाला प्रायश्चित्त दिले. सर्वात प्रथम सोम राजाने ब्रह्मदेवाला या पवित्र चारित्र्याच्या स्त्रीचा निसंकोचपणे स्वीकार करण्यास सांगितले. वरूण देवता आणि मित्र म्हणजे सूर्याने देखील त्यास अनुमोदन दिले. मग अग्नि देवतेने तिचा हात धरून तिला तिच्या पतीकडे सोपवले. सर्व देवांनी ब्रह्मदेवाला सांगितले तुझ्या पत्नीने खूप तपस्या केली आहे. त्यामुळे तिचे रूप अति उग्र झाले आहे. तिला शत्रू कधीच स्पर्श करू शकणार नाही. तिचे चारित्र्य शुद्ध आहे. ती पापी मुळीच नाही.ती तेजस्विनी आहे. निष्पाप आहे. निरपराध आहे.निर्दोष आहे .तिच्यावर अन्याय होता कामा नये. ब्रह्मदेवाला ते पटले आणि ऋषिका जुहूचा पत्नी म्हणून त्याने स्वीकार केला. पण ब्रह्मवादिनी असूनही ऋषिका जुहू ला अन्यायाविरुद्ध लढावेच लागले.
स्त्री जन्मा ही तुझी कहाणी
हृदयी अमृत, नयनी पाणी.
© सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये
क्यू 17, मौर्य विहार, सहजानंद सोसायटी जवळ कोथरूड पुणे
मो. 9527460290
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈