श्री प्रमोद वामन वर्तक
विविधा
चं म त ग ! श्री प्रमोद वामन वर्तक
अल कपोने आणि दयाळू काल्या दादा !
“अगं ऐकलंस का, चहा टाक बघू फक्कडसा, मग तो घेता घेता तुला आणलेली एक वस्तू दाखवतो !”
“असं बोलून तुम्ही उगाच आशा लावता आणि ती वस्तू नंतर नेहमी फुसका बारच ठरते !”
“अगं आज आधी आणलेली वस्तू एकदा बघ तर खरी, मग ठरव फुसका बार आहे का ऍटोम बॉम्ब आहे ते !”
“ठीक आहे ! फुसका बार निघाला तर खाली इराण्याकडे जाऊन कटिंग पिऊन यायचा आणि ऍटोम बॉम्ब निघाला तर घरच्या आल्याच्या चहा बरोबर क्रीम बिस्कीटं मिळतील तुम्हांला !”
“ठीक आहे ! हा बघ नऊ इंच धारदार पात असलेला, गेल्या शतकातला रामपुरी चाकू !”
“उ s s ठा, ताबडतोब उ s s ठा आणि खाली इराण्याकडे जाऊन कटिंग चहा पिऊन या !”
“अगं पण माझं जरा ऐकून तर…”
“काय ऐकायचं तुमच ? घरात पाच पाच वेगवेगळे चाकू, सुऱ्या असतांना, हा रामपुरी चाकू कशाला आणलाय तुम्ही? त्याने मी काय सगळी कामं सोडून मर्डर करत सुटू की काय ?”
“अगं अशी डोक्यात राख नको घालून घेऊ ! या रामपुरीने पण अनेक खरे खून केले आहेत त्या….”
“आणि असा रामपुरी चाकू तुम्ही मला देताय आणि वर चहा मागताय ? आज आता तुम्हांला दिवसभर चहाच काय, नाष्टा, जेवण काहीच मिळणार नाहीये, कळलं ?”
“अगं जरा बैस आणि शांतपणे मी काय म्हणतोय ते ऐकून तरी घे आणि मग बोल !”
“ठीक आहे, बोला पटपट, मला भरपूर कामं पडली आहेत घरात !”
“अगं हा रामपुरी चाकू साधासुधा नाही ! याची नक्षीदार मूठ बघितलिस का ?”
“त्यात काय बघायचं? सोनेरी रंगाची आहे म्हणून….”
“अगं वेडाबाई ती खऱ्या चांदीवर सोन्याच पाणी दिलेली मूठ आहे !”
“काय सांगताय काय ?”
“मग ? अगं हा रामपुरी खास आहे म्हटलं ! गेल्या शतकात आपल्याकडे होऊन गेलेल्या ‘दयाळू काल्या दादाचा’ आहे हा !”
“अहो पण हा तुम्हाला मिळाला कुठे ?”
“अगं आपल्याकडे जी ‘दानी आणि मनी’ नावाची लिलाव संस्था आहे ना तिथून हा मी लिलावात घेतला, अँटिक पीस म्हणून !”
“मी पण ऐकून आहे त्या संस्थे बद्दल, जी लिलावातून आलेल्या अर्ध्या पैशाचे गरजूना दान करते !”
“बरोब्बर !”
“पण केवढ्याला घेतलात हा रामपुरी चाकू ते सांगा ना ?”
“अगं त्याची एक गंमतच झाली ! त्या संस्थेच्या लीलावातील सगळ्या दुसऱ्या वस्तू खूपच चढया भावाने गेल्या, पण या रामपुरी चाकूला कोणी बोलीच लावे ना !”
“का हो ?”
“अगं असं काय करतेस ? याच रामपुरीने ‘दयाळू काल्या दादाने’ तेरा श्रीमंत सावकारांचे मर्डर केले होते ना ?”
“आणि असा चाकू तुम्ही घरात घेवून आलात ? आधी तो फेकून…..”
“अगं माझं जरा ऐक ! त्या दादाने गेल्या शतकात श्रीमंत सावकारांचे मर्डर केले असले तरी त्याने त्यांचे धन गरीब लोकांतच वाटले ! म्हणून तर त्याला ‘दयाळू काल्या दादा’ म्हणतात !”
“पण हा रामपुरी आपण घ्यावा असं का वाटलं तुम्हांला ?”
“अगं त्याच काय झालं सांगतो. परवाच पेपरात एक बातमी वाचली ! परदेशातल्या जगप्रसिद्ध ‘सदबी’ या लिलाव कंपनीने, गेल्या शतकात इटालीत होऊन गेलेल्या ‘अल कपोने’ या कुप्रसिद्ध ‘गॉडफादरचे’ पिस्तूल अडीच कोटी रुपयांना, कॅलिफोर्नियात झालेल्या लिलावात विकले म्हणून ! अगं त्या पिस्तूलानेच त्या कुप्रसिद्ध ‘अल कपोनेने’ दोनशे जणांचा खून केला होता !”
“बापरे !”
“पण मजा अशी, की त्याच्यावर शेवट पर्यंत एकाही खुनाचा गुन्हा सिद्ध होऊ शकला नाही बोल ! पण हां, त्याला ‘टॅक्स’ चुकवल्या प्रकरणी दोषी ठरवून फक्त साडे सात वर्षाची शिक्षा झाली !”
“कठीणच आहे सगळं!”
“अगं पण तो वर बसला आहे ना तो सगळं बघत असतो बघ ! वयाच्या फक्त ४८ व्या वर्षी एका दुर्धर आजाराने त्याचे निधन झाले.”
“ते सगळं ठीक, पण हा रामपुरी….”
“अगं एकदम स्वस्तात मिळाला !”
“खऱ्या चांदीची मूठ आणि त्यावर सोन्याचं पाणी दिलेला, तरी स्वस्तात कसा काय मिळाला ?”
“त्याच कारण म्हणजे त्या रामपुरी चाकूने गेल्या शतकात झालेले तेरा खून ! त्यामुळे त्या चाकूला कोणी लोकं बोलीच लावायला तयार होईनात, हे मी तुला मगाशी बोललोच.”
“बरोबरच आहे लोकांचं, असा खुनी चाकू कोण कशाला घरात….”
“हो, पण त्यामुळे ‘दानी आणि मनी’ कंपनीचे धाबे दणाणलं आणि त्यांनी त्याच्या बेस प्राईस पेक्षा खालची बोली स्वतःच डिक्लेर केली !”
“बापरे”
“तरी कोणी तो घ्यायला तयार होईना ! शेवटी कंपनीने स्वतःच एकशे एक किंमत डिक्लेर केली तरी सगळे गप्प !”
“मग ?”
“मग शेवटी मीच एक्कावन्न रुपयाची बोली लावली आणि ती कबूल होऊन मी हा अँटिक रामपुरी चाकू घरी घेवून आलो !”
“हो पण आपण याच करायचं काय ?”
“आपण काहीच नाही करायच ! हा असाच शोकेस मधे ठेवून द्यायचा ! जे काही करायच ते आपल्या नातवाने मोठा झाल्यावर !”
“म्हणजे ?”
“अगं तो मोठा झाल्यावर जेंव्हा हा अँटिक रामपुरी तो पुन्हा एखाद्या लिलावात विकेल, तेव्हा त्याला नक्कीच कमीत कमी पन्नास लाख तरी मिळतील बघ !”
“कमाल आहे बाई तुमची ! आत्ता आणते आल्याचा चहा आणि क्रीम बिस्कीटं !”
असं बोलून बायको हसत हसत किचनकडे पळाली आणि मी नातवाला त्याच्या तरुणपणी मिळणाऱ्या पन्नास लाखावर, बोटं कापली जाणार नाहीत याची दक्षता घेत हळुवार हात फिरवत, चहाची आणि क्रीम बिस्कीटांची वाट बघत बसलो !
© श्री प्रमोद वामन वर्तक
(सिंगापूर) +6594708959
मो – 9892561086
ई-मेल – [email protected]
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈