सुश्री तृप्ती कुलकर्णी
पुस्तकांवर बोलू काही
☆ “विंचू चावला हो SSS व इतर कथा” …आश्लेषा महाजन☆ परिचय – सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆
पुस्तकाचे नाव : “ विंचू चावला हो SSS व इतर कथा “
लेखिका : आश्लेषा महाजन
प्रकाशक : छात्र प्रबोधन प्रकाशन
किंमत : रु. १३०/-
(स्वत्वाचा विंचू चावतो तेव्हा…)
नुकताच आश्लेषा महाजन लिखित ‘विंचू चावला हो व इतर कथा’ हा कुमार मुलांसाठी लिहिलेला कथा संग्रह वाचण्यात आला.
कुमारवयीन मुलांसाठीच्या पुस्तकाला विंचू चावला हे शीर्षक का दिलं असेल अशी मनात उत्सुकता होती. त्यामुळे कथा संग्रह वाचताना या विंचवाचा शोध घेण्याचा प्रयत्न नकळतच झाला. आणि जाणवलं की या कथांमधला विंचू म्हणजे बालपण संपून कुमारवयाकडे वाटचाल करताना जो ‘स्व’चा उगम होतो तो आहे.
कुमारवयात होणारी ‘मी कुणीतरी आहे’ ही जाणीव संपूर्ण व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत महत्त्वाची आहे. चांगलं व्यक्तिमत्त्व घडण्यासाठी ‘स्व’ची ओळख योग्यप्रकारे होणं आणि त्याच बरोबर आपल्या समवयस्कांचा तसेच आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या ‘स्व’चाही आदर करता येणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. स्व-जाणीवेचा असा हा प्रवास सुखकर होण्यासाठी ती कशाप्रकारे जोपासता येऊ शकेल, त्यात काय काय अडथळे येऊ शकतात हे सांगणाऱ्या या गंमतीदार कथा आहेत. यात स्पर्धा आहे, इर्षा आहे, राग आहे आणि प्रेम, आपुलकीही…
कुमारवय हा असा काळ की सर्व नैसर्गिक भावनांना खूप प्रकर्षानं व्यक्त करणं गरजेचं असतं किंबहुना त्या व्यक्त होतातच. या भावनांना समाजात वावरताना आवश्यक असणाऱ्या धूर्तपणानं हाताळण्याची समज या वयात पूर्णपणे आलेली नसते. त्यामुळे चूक आणि बरोबर, शिक्षा आणि बक्षीस अशा दोन टोकांमध्ये निर्णय न देता मधला पर्यायी मार्ग काढून ‘स्व’ची जडणघडण करावी लागते. ती कशी करता येईल याचं उत्तम उदाहरण म्हणजे या कथा. वयात येणे (मुलांचे / मुलींचे…), मैत्रीतले आनंद व ताण, शाळा, स्पर्धा, पिढीतले अंतर, शहरी व ग्रामीण कुमार यांच्यातले अंतर, श्रीमंत व गरीब कुमारांचे भावविश्व, त्यांची मनोवृत्ती, चोरी, विनोद, भंकस… करणे, फजिती होणे, फसवणूक करणे-होणे, व्यसने… अशा अनेक गोष्टी यांत वाचायला मिळतात.
केवळ कुमारांनीच नव्हे तर मोठ्यांनीही त्या वाचाव्यात, कारण एक तर त्या आपल्याला आपल्या कुमारवयात घेऊन जातात. त्या काळात आपल्या हातून घडलेल्या चुका, गमतीजमती यांची आठवण करून देतात. शिवाय काही गोष्टी पुन्हा नव्याने दाखवतात.
यात पुस्तकाची आणखीन वैशिष्ट्ये म्हणजे खुद्द लेखिका आश्लेषा महाजन यांनी काही कथा वाचल्या आहेत. कथेखाली दिलेला क्यूआरकोड स्कॅनकरून त्या थेट ऐकण्याचा आनंद घेता येतो. शिवाय काही कथा मुलांनी वाचून पाठवण्याची सोयही उपलब्ध करून दिली आहे. त्यातल्या निवडक कथांना क्यूआरकोडही देण्यात येणार आहे. मानसी वैद्य या नुकतंच कुमारवय ओलांडलेल्या विद्यार्थीनीची प्रस्तावना वाचनीय आहे. वाचकवीरांसाठी पुस्तकात दिलेली प्रश्नमंजुषा आणि प्रसंगोचित चित्रं या जमेच्या बाजू आहेतच.
खरेतर आपल्याकडे असे कुमार साहित्य खूपच दुर्लक्षित राहिले आहे. विशेषतः मराठीत. त्यामानाने पाश्चात्य व अन्य परदेशी साहित्यात कुमारांसाठी खूप काम केले जाते. बहरत्या, संवेदनशील कुमारवयीन मुलांसाठी आवर्जून लेखन होणे महत्त्वाचे. त्या दृष्टीने असे प्रयोगशील कथासंग्रह आणखीन यायला हवेत.
पुस्तकाला खुप खुप शुभेच्छा !
© सुश्री तृप्ती कुलकर्णी
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
धन्यवाद तृप्ती कुलकर्णी आणि ‘मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ‘
तृप्ती कुलकर्णी, आपण माझ्या “विंचू चावला हो व इतर कथा ” ह्या कुमार कथासंग्रहाची आपल्या ह्या चोखंदळ, दर्जेदार नि सर्वदूर पोचलेल्या पेजवर उत्तम दाखल घेतली आहे. आपण लिहिलेले रसग्रहणपर परीक्षण लक्षवेधी असून कथांचा एकूणच उत्कंठावर्धक धांडोळा घेणारे आहे.
कुमार साहित्यातील अनेक मुद्द्यांना स्पर्श करणारे आपले विवेचन वाचकांना व एकूणच प्रकाशनविश्वाला
विचारप्रवण करणारे आहे.
पुनश्च धन्यवाद.
-आश्लेषा महाजन
खूप सुंदर पुस्तक परिचय