डॉ अभिजीत सोनवणे

@doctorforbeggars

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ तीन पिढ्या…!!! – भाग-5 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

(पण, नेमकं इथेच कुठेतरी काहीतरी चुकतं आणि नाती तुटतात –  फाटतात आणि लोक रस्त्यावर येतात… !) इथून पुढे —-

अशा तीन पिढ्यातले, हे तीन प्रतिनिधी आज रस्त्यावर होते …! 

प्रसंगी या तिघांचा मी मुलगा झालो… प्रसंगी वडील झालो आणि जमेल तेव्हा यांचा आजोबाही झालो. 

एकाच जन्मात तीन पिढ्या जगलो… ! 

सासवडला निघायची वेळ झाली, तिघांनीही डोळ्यात पाणी आणून मला निरोप दिला.

Paralysis वाल्या बाबांना काही केल्या हात जोडता येईनात…. मी त्यांच्या पाया पडलो आणि जोडू पाहणारे ते हात माझ्या हाताने माझ्याच डोक्यावर ठेवून घेतले…! 

रस्त्यावरून आज हे तिघेही एकाच वेळी, एकाच दिवशी एकाच सुरक्षित घरात जातील…

मला किती आनंद झालाय…. हे सांगण्यासाठी…. कुठून शब्द उधार आणु….? 

श्री मंगेश वाघमारे माझा सहकारी….!

मंगेशला म्हटलं, ‘सासवडला जाताना भारीतल्या भारी हॉटेलमध्ये यांना घेऊन जा आणि खाऊ पिवु घाला… जे हवंय ते.’

आम्ही काय करतोय ते रस्त्यात बघत उभा असलेला एक बिनकामाचा बघ्या छद्मीपणे म्हणाला, ‘पण यांना भारी हॉटेलमध्ये येऊ देतील का ?’ 

मला चीड आली… म्हणालो, ‘का रे ? ते माणसासारखे दिसत नाहीत तुला …? 

का ती माणसं नाहीत… ?

का नाहीत येऊ देणार त्यांना हॉटेल मध्ये… ?

दोन पायांवर उभे असलेले तुझ्या बापाच्या वयाचे हे लोक तुला “माणूस” म्हणून दिसत नाहीत फुटक्या ??? 

रिकामटेकड्या बघ्याने माझा अवतार पाहून पळ काढला. 

मंगेशकडे वळून बघत पुन्हा म्हणालो, ‘मंगेश, हॉटेलमध्ये तुम्हाला कोणीच अडवणार नाहीत, आणि जर कुणी अडवलंच तर सांगा यातला एक डॉ. अभिजित सोनवणेचा “भाऊ” आहे, एक “बाप ” आहे आणि एक “आज्जा” आहे ! 

मंगेशने गालात हसत या तिघांना हाताला धरून गाडीत बसवलं. 

श्री अमोल शेरेकर, श्री गौतम सरोदे आणि श्री बाळू गायकवाड या माझ्या सहकाऱ्यांनी, मी पाहिलेल्या या स्वप्नाला मूर्त रूप देण्यासाठी खूप मदत केली….

अंघोळ घालण्यापासून ते पायातले किडे काढण्यापर्यंत या साथीदारांनी मला मदत केली…… मी ऋणात आहे त्यांच्या ! 

डॉ. भाटे सर, माझ्या कुटुंबातली ही तीन माणसं, आज मी आपल्या स्वाधीन करतोय…. आपल्या छत्रछायेखाली उर्वरित आयुष्य ते नक्कीच आनंदाने जगतील, याची मला खात्री आहे. 

पूर्वी रस्त्यावर पडलेल्या, परंतु आता डॉ. भाटे  दाम्पत्याच्या पदराखाली असणाऱ्या, इतर आई-बाबांची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या, जर कोणाला सेवा करावीशी वाटली तर, ती डॉ. भाटे दाम्पत्याच्या माध्यमातून जरूर करता येईल. 

त्यांचे फोन नंबर मी देत आहे.— 96890 30235 //7276647470

पुढे माझ्या या कुटुंबीयांना, हॉटेलमध्ये ग्राहक म्हणून अत्यंत अदबीने मिळालेली वागणूक… माणूस म्हणून मिळालेला मान… याने हे तिघेही भारावून गेले.

त्यांच्या चेहऱ्यावर कृतज्ञता, तृप्ती, समाधान आणि शांती असे सर्व संमिश्र भाव दाटून आले होते. 

त्यांचे हे भाव म्हणजेच माझी जमा पुंजी….! 

ही सर्व पुंजी मी माझ्या मनाच्या तिजोरीत जपून ठेवली आहे.

आज जगातला सर्वात श्रीमंत माणूस मी असल्यागत मला वाटतंय राव… !!! 

(या तिघांच्याही आत्मप्रतिष्ठेला कोणताही धक्का पोहोचणार नाही अशा पद्धतीने माहितीसाठी त्यांचे फोटो Soham Trust या नावे असलेल्या फेसबुक पेजवर उपलब्ध आहेत)

– समाप्त –

© डॉ. अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments